सूर्य संपावर गेला तर मराठी निबंध | Surya Sampavar Gela Tar Essay In Marathi


सूर्य संपावर गेला तर मराठी निबंध | Surya Sampavar Gela Tar Essay In Marathi


सूर्य संपावर गेला तर मराठी निबंध | Surya Sampavar Gela Tar Essay In Marathi : आमच्या एका विज्ञाननिष्ठ आजींनी त्यांच्या अंगणात सूर्यचूल केली होती. ती पाहण्यासाठी आम्ही आजींकडे गेलो होतो. आजींनी आम्हांला चुलीचे प्रात्यक्षिक दाखविले आणि मग आजी म्हणाल्या, “आता गॅसवाल्यांनी संप केला तरी मला चिंता नाही." 

आजीचं वाक्य संपलं नाही, तोच चिमुरडी अस्मिता म्हणाली, “आणि आजी, सूर्यानेच संप केला तर ग-?" सूर्याने संप केला तर आजींची सूर्यचूल पेटणार नाही हे तर खरेच! पण सूर्याने संप केला तर

मात्र आळशी माणसाला काही काळ बरं वाटेल. कारण सूर्य आकाशात येणार नाही म्हणजे दिवसच उगवणार नाही. रात्रीचे राज्य संपणारच नाही. मनसोक्त लोळत पडावे. पण अहो लोळणार तरी किती! आणि लोळत पडलो तरी भूक लागायची ती लागणारच. म्हणजे उठायला हे हवेच. दिवे लावून कामाला सुरुवात केली, तरी असे किती वेळ दिवे लावणार? 

शाळा, महाविदयालये, कचेऱ्या, घरीदारी सगळीकडे सतत विजेचा वापर केल्याने लवकरच विजेचा तुटवडा भासू लागेल. मग सरकारपूढे मोठा प्रश्न पडेल.

असा हा एकच प्रश्न नव्हे. सूर्याच्या संपामुळे अनंत प्रश्न निर्माण होतील. सूर्याचा संप बेमुदत सुरू राहिला तर भूलोकावरील मानवी जीवन दुःसह होईल. अहो, सूर्याला प्रकाश नाही म्हणजे चंद्रालाही प्रकाश नाही. कारण चंद्र पडला परप्रकाशी. सूर्याने सांडलेले तेजोकण वेचून हे रावजी रुबाब दाखविणार. पण सूर्याचीच जर पूर्णपणे अनुपस्थिती राहिली तर सर्वांचेच कार्य स्थगित होईल. 

चंद्र नाही, चांदण्या नाहीत, चंद्रप्रकाशही नाही. मग सागराला भरती कशी येणार? कवींच्या काव्याला स्फूर्ती कोठून येणार? बागेतील फुले, तळयातील कुमुदिनी कशा फुलणार? प्रेमिकांना सुंदर स्थळे कोठे गवसणार? हो, एक मात्र खरे की, यामुळे फावेल फक्त चोरांचे. कारण त्यांना हव्या असणाऱ्या अंधाराचेच सर्वत्र साम्राज्य असेल.

चंद्र, चांदण्या, कवी आणि त्यांच्या कविता या झाल्या साऱ्या रम्य गोष्टी! त्यांच्याविना फार मोठे अडणार नाही. पण जर का मुंबईच्या गिरणी कामगारांसारखा सूर्य जर बेमुदत संपावर गेला तर... हळुहळु या भूलोकावर थंडी वाढू लागेल आणि मग दिवसेदिवस तिचे प्रमाण वाढतच जाईल. त्यामुळे सारी सजीव सृष्टी धोक्यात येईल. कृत्रिमरीत्या आवश्यक तापमान, ऊब निर्माण करण्यासाठी संशोधन सुरू होईल. पण संकटे कधी एकटी येत नसतात. तापमानपाठोपाठ प्रश्नचिन्ह उभे राहील ते प्राणवायूचे. 

सूर्यप्रकाश नाही म्हणजे प्राणवायू नाही. मग श्वासोच्छ्वास कसा करणार? प्रत्येक माणसाला आपल्याजवळ आवश्यक तापमानसाठी सिलिंडर, कृत्रिम प्राणवायूचा सिलिंडर बाळगावा लागेल. त्यामुळे हे सिलिंडर तयार करणाऱ्या कंपन्या वाढू लागतील. मग त्यांचाही काळाबाजार-चक्क काळोखात सुरू होईल.

सूर्यप्रकाश आणि प्राणवायू यांचा अभाव याचा परिणाम सर्व प्राणिजीवनावर होईल. वनस्पती खुरटतील; पाने, फुले, फळे गळू लागतील. वनस्पतींचे जीवन धोक्यात येईल. निसर्गाचा समतोल धोक्यात येईल. सूर्याचे ऊन नाही म्हणजे बाष्पीभवन होणार नाही. त्यामुळे पाऊसही पडणार नाही. मग या भूलोकावर उरेल फक्त संहार. त्यामुळे सृजनतेचा अवशेषही राहणार नाही. पुन्हा ही वसुधा एक निर्जन, ओसाड असा एक गोळा होऊन राहील.

हे सारे टाळायचे म्हणजे सूर्याचा संप संपायला हवा. त्यासाठी कोणाशी बोलणी करायची? विचारवंत विचार करू लागले. त्यासाठी अंतराळाचा वेध घेतला जाऊ लागला. नवीन एखादा सूर्य सापडतो का? नाहीतर आपणच एखादा सूर्य तयार करावा का?

इतका वेळ गप्प राहिलेली वसुधाताई उठली. आपल्या पोरांचा उद्दामपणा तिला असह्य झाला. ती भावनांनी कंपित झाली व पदर पसरून तिने सूर्यदादाला विनविले. तेव्हाच सूर्य परत उगवला आणि माणसाचा दिवस परत सुरू झाला.

वरील निबंध सूर्य संपावर गेला तर मराठी निबंध | Surya Sampavar Gela Tar Essay In Marathi हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत