Essay on newspaper in marathi | वृत्तपत्रांचे महत्त्व चिंतनात्मक मराठी निबंध

Essay on newspaper in marathi |  वृत्तपत्रांचे  महत्त्व चिंतनात्मक  मराठी निबंध 

Essay on newspaper in marathi |  वृत्तपत्रांचे  महत्त्व चिंतनात्मक  मराठी निबंध : महाराष्ट्रात विख्यात असलेला 'महाराष्ट्र टाइम्स' मोठ्या अभिमानाने म्हणतो, “महाराष्ट्र टाइम्स-पत्र नव्हे मित्र!" अगदी शंभर टक्के खरे आहे हे. आज 'महाराष्ट्र टाइम्स' अनेक मराठी माणसांच्या घरांत पोहोचला आहे तो एका मित्राच्या नात्याने. लोक त्याला संबोधतात म. टा. या लाडक्या नावाने. 'म. टा.' आला नाही तर त्यांना करमत नाही. मित्राची व्याख्या करताना संस्कृत सुभाषितकार सांगतात, "आनंदात, दु:खात, संकटात प्रत्येक वेळी जो आपल्याला सोबत करतो तोच आपला मित्र!" आज वृत्तपत्रे हेच काम करीत आहेत.

लोकशिक्षण हे तर वृत्तपत्रांचे जीवनध्येयच आहे. इ. स. १८३२ मध्ये लोकजागृतीसाठीच बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले मराठी वृत्तपत्र काढले. त्याचे नाव होते 'दर्पण'. दर्पण म्हणजे आरसा. तत्कालीन समाजस्थितीचे हुबेहूब दर्शन घडवून निद्रिस्त समाजाला जागे करावे हाच याच्या संपादकांचा हेतू. आणि येथून पुढे प्रत्येक वेळी वृत्तपत्र लोकशिक्षणाचे, समाजप्रबोधनाचे महत्कार्य करीत राहिले, परक्या राजवटीविषयी चीड निर्माण करण्याचे कार्य विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या 'निबंधमाले'ने केले, तो संताप धगधगत ठेवला लोकमान्यांच्या 'केसरी'ने; ती चीड फूलवत नेली शिवरामपंत परांजपे यांच्या काळ'ने. स्वातंत्र्याच्या लढ्यात लोकजागृतीचे काम

जेवढे व्याख्यानांनी केले, त्याच्या कितीतरी पटीने वृत्तपत्रांनी केले. किंबहुना लोकशाहीच्या निर्मितीचे बहुतांश श्रेय हे वृत्तपत्रांकडे जाते. लोकशाहीचे मुख्य घटक आहेत लोक म्हणजेच प्रजाजन. ज्याप्रमाणे स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी सामान्यजनांच्या मनात वृत्तपत्रांनी देशभक्तीची भावना निर्माण केली; त्याचप्रमाणे यशस्वी लोकशाहीसाठी आदर्श लोक, प्रजाजन निर्माण करण्याचे कामही वृत्तपत्रे करीत असतात. प्रत्येक माणसाला त्याच्या हक्कांची आणि त्याच्या कर्तव्यांची जाणीव वृत्तपत्रे करून देतात. मोठमोठ्या विचारवंतांचे विचार त्यांच्या ग्रंथांतून प्रकट होत असतात; पण पुष्कळदा असे ग्रंथ सामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. सर्वसामान्य माणूस वर्तमानपत्रे निश्चितच वाचीत असतो. त्यामुळे वर्तमानपत्र हे फार मोठे लोकशिक्षणाचे काम करीत असते. स्वातंत्र्योत्तर काळातही गोवा म महाराष्ट्रनिर्मितीचा संघर्ष अशा वेळी वृत्तपत्रांनी फार मोठी कामगिरी बजाविली आहे. लोकशाही राज्यपद्धतीत मतदानाला फार महत्त्व आहे, अशा वेळी विविध पक्षांचे धोरण लोकांसमोर मांडून त्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य वृत्तपत्रे करतात.

वृत्तपत्रे समाजशिक्षणाचे काम फार पूर्वीपासून करीत आहेत. आगरकरांनी समाजाचा रोष पत्करून 'सूधारक' चालविला. लोकहितवादींची ‘शतपत्रे', हरिभाऊंची 'करमणक' हेच काम करीत होती. आजही समाजात घडणाऱ्या इष्टानिष्ट गोष्टींची नोंद वृत्तपत्रेच घेत असतात. हंड्याची अनिष्ट चाल, मानवजातीला काळिमा फासणारा स्त्रियांचा चालणारा बाजार, सामाजिक विषमता या समाजाला घातक ठरणाऱ्या गोष्टींना वाचा फोडली वृत्तपत्रांनीच! सर्वसामान्य माणूसही आपले विचार वृत्तपत्रवाचकांसाठी असलेल्या सदरातून मांडू शकतो.

अशा प्रकारे वृत्तपत्र राष्ट्र घडविते, समाज घडविते, म्हणजेच ओघाने समाजातील प्रत्येक माणूस घडवीत असते. वृत्तपत्रवाचनाने आपल्याला साऱ्या जगातील घटना समजतात. भोवतालचे नैसर्गिक बदल कळतात, वस्तूंच्या भावांतील चढउतार, मानवी स्वभावांचे नमुने, उत्कृष्ट साहित्य, नवे विचार या आणि अशा इतर अनेक गोष्टी वृत्तपत्र आपल्यापर्यंत पोहोचविते. वृत्तपत्रांमुळे करमणुकीबरोबर नकळत विविध प्रकारे ज्ञानप्राप्तीही होते. आपण एखादी चांगली गोष्ट केली तर वृत्तपत्र शाबासकी देते, चुकीचे पाऊल टाकले तर धोक्याचा इशारा देते. असे हे वृत्तपत्र आपला मित्रच नाही का?
टीप : वरील निबंध Essay on newspaper in marathi |  वृत्तपत्रांचे  महत्त्व चिंतनात्मक  मराठी निबंध  या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • वृत्तपत्रांचे लोकशाहीतील महत्त्वाचे कार्य 
  • वृत्तपत्रवाचनाचे फायदे 
  • लोकशाहीत वर्तमानपत्राचे स्थान
  • वृत्तपत्रे आणि लोकशिक्षण 
  • वृत्तपत्रांचे शैक्षणिक कार्य 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत