विद्यादेवी शारदा देवी मराठी निबंध | Vidyadevi Sharda Devi Essay In Marathi

विद्यादेवी शारदा देवी  मराठी निबंध | Vidyadevi Sharda Devi Essay In Marathi

विद्यादेवी शारदा देवी  मराठी निबंध |  Vidyadevi Sharda Devi Essay In Marathi : हे विदयादेवी, आम्ही सारे तुझे उपासक तुला वंदन करतो. तू प्रसन्न व्हावीस यासाठी तर ही सारी धडपड. वयाच्या दुसऱ्या-तिसऱ्या वर्षापासून आम्ही तुझ्या उपासनेला आरंभ करतो आणि मग ही आमची आराधना आयुष्यभर चालते. तरीपण शैशव, कुमारवय व तारुण्य हा तुझ्या पूजनाचा प्रमुख कालखंड. वयाची वीस-बावीस वर्षे तरी आम्ही तुझ्या सेवेत घालवितो. कारण हे विदयादेवी, तुझे सामर्थ्य, तुझा प्रभाव आज काळाला मान्य झाला आहे. तु ज्याच्यावर प्रसन्न झालीस त्याला काहीही कमी नाही; पण तू ज्याच्याकडे पाठ फिरविलीस त्याचे हाल काय वर्णावे !


हे शारदे, तुला कोणत्या नावाने संबोधावे? कारण तुझी अगणित नावे! कविजनांची तू मोठी आवडती आहेस. त्यांनी तुझे किती सुंदर वर्णन केले आहे, पाहा ना. तुझ्या शुभ्र, गौर वर्णाचे वर्णन करताना कवींच्या वाणीला तर नुसते भरते येते! तुझा हा वर्ण पाहून त्यांना जाईची फुले, कापूर, चंद्र, हिम व मुक्ताहाराची आठवण येते. हे शारदे, तुला धवलतेची मोठी आवड खरीच! तू धारण करतेस ते वस्त्रही धवल. म्हणूनच आमच्या कविजनांनी यशाचा रंगही धवल ठरवून टाकला आहे. हे विदयादेवी, तु स्वतःसाठी आसन निवडलेस तेही श्वेतकमलाचे. तुझा हा श्वेतरंग निर्मलतेचा आणि प्रसन्नतेचा सूचक आहे. वीणा हे तुझे आवडते वादय. त्यातून निघणारे झंकार आम्हांला विदयेचे महत्त्व पटवून देतात.हे वागीश्वरी, तुझी भूपाळी गाताना आमचे कवी गोविंद तुला ‘परमात्म्याचे चित्सौंदर्या' असे संबोधतात. तू आमच्या चित्तमयुरावर विश्वकाव्य वाचीत बसली आहेस. हे सरस्वती, आमच्या या ज्ञानप्राप्तीच्या मंगल यज्ञप्रसंगी आम्ही नित्यनियमाने तुझे स्मरण करतो. त्यामुळे तुझाआमचा परिचय जुना आहे. तुला वंदन केल्याशिवाय आमच्या अध्ययनाला प्रारंभच होत नाही. आमच्या वह्या-पुस्तकांतही आम्ही तुझे रूप पाहतो. विजयादशमीच्या मंगल दिवशी पाटीवर आम्ही तुझे प्रतीकरूप चित्र काढतो आणि तुझे पूजन करतो.


 हे भारती, तुझा खजिना, तुझे कोषागारही किती अपूर्व आहे पाहा! इतर कोणत्याही खजिन्यांप्रमाणे खर्च केल्याने तो संपत नाही; तर उलट संचय केल्याने मात्र तो नाश पावतो. विदयादेवी, तुझ्या कृपेने प्राप्त झालेली विदया दुसऱ्यांना दिली की सतत वाढत जाते आणि जर ती दुसऱ्यांना दिली नाही, केवळ आपल्याजवळच ठेवली तर ती कुंठित होते, असा तुझा अगाध महिमा आहे.हे शारदे, एकदा तुझा कृपाप्रसाद लाभला की मात्र कशाचीही उणीव भासत नाही. तुझ्या प्रसादप्राप्तीतील आनंदाची तुलना तर कशाशीही होणार नाही. घरात तू स्नेही आहेस, प्रवासात मित्र आहेस, परदेशात तर सर्वस्व आहेस. विदयाविहीन माणूस हा शेपूट, शिंग नसलेला पशूच ठरतो. म्हणूनच शारदे, तुझे हे माहात्म्य जाणूनच प्रत्येक मगल प्रसगी तुझे पूजन होते. चौदा विदया आणि चौसष्ट कला यांची तू अधिष्ठात्री देवता. त्यामुळे रंगमंचावर नाटकाला सुरुवात होण्यापूर्वीही तुलाच आवाहन केले जाते.

हे विदयादेवी, आजकाल काही विदयार्थी तुझी अवहेलना करतात, तुझी मनोभावे उपासना न करता चोरून कॉपी करणे, परीक्षकांना लाच देणे, प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी मिळविणे अशा वाममार्गाने ते परीक्षा देतात. हे विदयादेवी, अशा वेळी तुझ्या मनाला किती वेदना होत असतील बरे! विदयादेवी, तुझ्या प्रांगणात कोणताही भेदभाव नाही. श्रीमंत-गरीब, लहानमोठे, स्पृश्य-अस्पृश्य असे काहीही तुला माहीत नाही. पण हे मूठभर उच्चभ्रू लोक स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी इतरांना तुझ्या मंदिराची दारे बंद करतात तेव्हा तुझ्या मनाला किती वेदना होत असतील!


हे विदयादेवी, तुझ्या उपासनेचा मार्गही किती सोपा! त्यासाठी षोडशोपचारांची गरज नाही. आपल्या अभ्यासाची पुस्तके एकाग्रचित्ताने वाचली की तू प्रसन्न होणारच! 
वरील निबंध विद्यादेवी शारदा देवी  मराठी निबंध |  Vidyadevi Sharda Devi Essay In Marathi हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद