मातृभाषेचे ऋण मराठी निबंध | Essay On Loan Of Maatrubhasha


मातृभाषेचे ऋण मराठी निबंध | Essay On Loan Maatrubhasha 

मातृभाषेचे ऋण मराठी निबंध | Essay On Loan Maatrubhasha : माणूस जन्माला येतो तोच मुळी माथ्यावर काही ऋण घेऊन. त्या अनेक ऋणांपैकी एक म्हणजे मातृभाषेचे ऋण अशी कल्पना करा की, माणसाला मातृभाषा गवसलीच नसती तर त्याने काय केले असते? बाळाने आईजवळ हट्ट कसा केला असता? बाबांजवळ आपली शंका कशी व्यक्त केली असती?


 बाळाला ही मातृभाषा लाभते आपल्या आईबाबांकडून, आजोबा-आजीकडून. बाळ पाळण्यात असते तेव्हा त्याच्या कानांवर अंगाईगीत पडते ते या आईच्या भाषेतूनच. तो चिऊकाऊच्या गोष्टी आजीकडून ऐकतो त्याही आपल्या मातृभाषेतूनच. मग तो आपल्या बोबड्या बोलातून गाऊ लागतो, 'चांदोबा, चांदोबा भागलास का?' अशी ही मातृभाषा आपल्या जन्मापासून आपली साथीदार असते.


प्रत्येक माणसाच्या जीवनात माती, मायभूमी आणि मातृभाषा या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. माती त्याला अन्न देते. मातीच्या सान्निध्यात त्याला सुरक्षितता लाभते. मायभूमी त्याला आसरा देते. मायभूमीपासून दूर फेकला गेलेला माणूस निराधार होतो. मग त्याला परक्या देशात केवढेही धन मिळाले, तरी तो तेथे परकाच राहतो. 

तेथे त्याला आपलेपणा गवसत नाही. माती व मायभूमीचे माणसाला जेवढे महत्त्व असते तेवढेच त्याला मातृभाषेचेही असते. कारण मातृभाषा त्याच्यावर योग्य संस्कार करीत असते. मागच्या अनंत पिढयांच्या अनुभवांचा वारसा ती त्याच्यासाठी घेऊन येते. या संस्कारांतून त्याचे जीवन संपन्न होते.


ज्ञानदेवांनी मातृभाषेचे हे सामर्थ्य जाणले होते म्हणूनच त्यांनी मराठीतून ज्ञानाचा प्रसार करण्याचा संकल्प सोडला. नाथांना मातृभाषेचे हे ऋण मान्य होते. म्हणून तर त्यांनी समाजाचा विरोध सहन करूनही मातृभाषेतच रचना करण्याचा आग्रह धरला. मातृभाषेतून आपले रोखठोक विचार व्यक्त करताना तुकाराममहाराजांना शब्दांची कधीच उणीव भासली नाही आणि लोकानुनय साधण्यासाठी समर्थांना मातृभाषाच उपयोगी पडली. 


 भाषाच जर अस्तित्वात नसेल तर आजच्या युगात मानवी जीवन फार दुष्कर होईल आणि सर्व भागांत मातृभाषेतील व्यवहार हा फार स्वाभाविक आहे. असे असताना आपण व्यवहारात कित्येकदा परक्या भाषेचा आग्रह धरतो; कारण ती अधिक समृद्ध आहे असे आपण मानीत असतो. पण हा आपल्या मनाचा दुबळेपणा आहे.

 आपल्या या विचारसरणीत गुलामगिरीचे अदयापि अंश आहेत असेच समजावे. म्हणजे राजकीय दृष्टया आपण स्वतंत्र झालो तरी मानसिक दृष्टया आपण गुलामच आहोत. म्हणूनच आपण मायबोलीला दूर ठेवून इंग्रजीला जवळ करतो, म्हणजे आईचा अपमान करून परक्या बाईचा गौरव करण्यासारखे हे आहे.


 आज अनेक पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांत घालण्यासाठी धडपडत असल्याचे दिसून येते. पण हे चूक आहे. कारण शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषाच असले पाहिजे. कारण आपण जेव्हा कोणत्याही गोष्टीचे चिंतन करतो तेव्हा ते च करतो. परक्या भाषेतून शिक्षण घेताना ती भाषा अभ्यासण्यात आपल्या शक्तीचा व्यय होतो. आजची प्रगत शास्त्रे व त्यांच्या परिभाषा आपण आपल्या मातृभाषेत आणू शकणार नाही ही 
आपली विचारसरणी अगदी चुकीची आहे. 


अणुबॉम्बने उद्ध्वस्त झालेल्या जपानसारख्या छोट्या राष्ट्राने देखील आपली प्रगती साधली ती आपल्या मातृभाषेतूनच. कोणत्याही परकीय भाषेचा पांगुळगाडा त्यांनी पत्करला नाही.आपल्या देशाचा आणि आपला व्यक्तिगत विकास आपणांस साधावयाचा असेल तर मातृभाषेचे ऋण मानले पाहिजेत व या मातृभाषेतील थोर ठेवा जपला पाहिजे, वाढविला पाहिजे.

मातृभाषेचे ऋण मराठी निबंध | Essay On Loan Maatrubhasha हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद