मी शिक्षक झालो तर निबंध मराठी | mi shikshak zalo tar marathi nibandh

 मी शिक्षक झालो तर निबंध मराठी | mi shikshak zalo tar marathi nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज मी शिक्षक झालो तर मराठी निबंध बघणार आहोत. मित्रांनो  शिक्षक होणे खूप जबाबदारीचे काम असते कारण त्यांच्या हाती येणाऱ्या पिढीचे भविष्य असते . या निबंधामध्ये मी शिक्षक झाल्यावर कोणत्या गोष्टी करणार या बद्दल माहिती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


प्रत्येकाची काही ध्येय असतात. ती ध्येये साकारण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. शिक्षक बनणे हे माझे ध्येय आहे. मी शिक्षक झालो तर मी काय करणार ते आताच ठरविले आहे. खरे तर शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे. शिक्षण पद्धतीत बदल होईल तेंव्हा होईल परंतु शिक्षक या नात्याने खूप काही गोष्टी आहेत ज्या मला करता येणे शक्य आहेत.


ज्याही शाळेत मी काम करेल ती शाळा म्हणजे माझी कर्मभूमी समजून मी माझे प्रत्येक कार्य इमानदारीने करेन. वेळेच्या आंत शाळेत जाणे, मनापासून विद्यादान करणे, हे माझे पहिले कर्तव्य समजेन. प्रत्येक विद्यार्थी हा माझ्या स्वत:च्या मुलाप्रमाणे समजून त्याच्याशी आपुलकीने वागेन. माझ्या विषयाचे माझे ज्ञान हे नेहमी अद्ययावत ठेवेन. त्यामुळे माझा विद्यार्थी माझ्या विषयात कुठेही कमी पडणार नाही ही खबरदारी घेईल.


 या व्यतिरिक्त पुढील काही महत्वाच्या बाबी मी करेन. 

१) अभ्यासाची गोडी :- विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावण्यासाठी त्यांना विषय समजणे आवश्यक असते. त्यासाठी तो विषय रंजक बनविणे गरजेचे असते. प्रत्येक विषय आपआपल्या परिने रंजक बनविता येतो. तसा प्रयत्न मी करणार आहे. त्याचप्रमाणे त्या विषयाचे सखोल ज्ञान मी करुन घेणार आहे व विद्यार्थ्यांना सुध्दा देणार आहे.


२) विद्याथ्यांची समस्या :- सामान्यत: विद्यार्थी आपली समस्या सर्वांसमोर सांगायला धजत नाही. त्यामुळे त्याच्या काही वैयक्तिक समस्या असू शकतात ज्यामुळे तो अभ्यासात मागे पडू शकतो. अशा विद्यार्थ्याला शिक्षक कक्षा मध्ये बोलावून त्याची समस्या जाणून घेवून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न मी करेन. काही विद्यार्थी विषय समजला नसला तरी समजला म्हणून सांगतात. आपल्याला इतर मुलं 'ढ' म्हणतील म्हणून ते असे करतात. अशा विद्यार्थ्यांना बोलतं करणे आवश्यक असते. त्यांच्यातील ही भावना दूर करण्यासाठी वर्गात खेळीमेळीचे वातावरण तयार करेन. 


३) धाक-दरारा :- शिक्षकाचा धाक किंवा दरारा असू नये. नैतिक वजन मात्र जरुर असावे. धाक, दरारा असल्यास विद्यार्थी अशा शिक्षकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात व त्यांच्या विषयात गोडी निर्माण होत नाही. शिस्त ठेवण्यापुरता माझा धाक असेल परंतु त्यांच्या विषयी जिव्हाळा सुध्दा तेवढाच ठेवील.


 ४) आपुलकी :- शाळेत मारामारी, भांडणे, होत असतात. अशा वेळेस दोघांनाही शिक्षा करुन शिक्षक मोकळे होतात. परंतु ज्याची चूक नसते त्यालाही जर शिक्षा झाली तर आपल्यावर अन्याय झाला असे त्याला वाटते व असुरक्षिततेची भावना निर्माण होते. अशा वेळेस योग्य चौकशी करुन दोघांचे भांडण होणार नाही अशी खबरदारी घेणे गरजेचे असते. 


तसेच खेळात कुणाला इजा होणे, कुणाचे अचानक पोट दुखणे, चक्कर येणे, डोके दुखणे इत्यादी घटना होत असतात. अशा वेळेला शिक्षक या नात्याने न वागता पालक या नात्याने माझी वागणूक असेल. वेळप्रसंगी त्याच्या दवाखान्याचा किरकोळ खर्च मी करायला तयार असेल. 


५) न्यूनगंड :- न्यूनगंड हा प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये हा थोड्या फार प्रमाणात असतोच. तो दूर करण्यासाठी शिक्षकाला प्रयत्न करावे लागतात. त्याच्यातील आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करुन न्यूनगंड हळू-हळू दूर करता येतो. त्यासाठी मी प्रयत्नशील राहील. 

६) सवयी :- विद्यार्थी हा अनुकरण करीत असतो. त्यामुळे शिक्षकाने आदर्श असणे गरजेचे आहे. त्यामुळे मद्यपान, धुम्रपान, व्यभिचार, खोटे बोलणे इत्यादी वाईट सवयींपासून मी अलिप्त राहीन.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद