शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध | shalecha nirop ghetana nibandh marathi

शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध | shalecha nirop ghetana nibandh marathi

 निबंध 1

आज दहा वर्षापूर्वीच्या काळात मी डोकावतो  तेव्हा डोळ्यासमोर येते माझी बालमूर्ती ! खांद्यावर दप्तर, हातात वॉटरबॅग, डबा अशा थाटात  शाळेत प्रवेश केला होता. शिकण्यापेक्षा डब्यातील खाऊच्या आशेने शाळेत यायचं ते वय ! अनोळखी विश्वात पाऊल टाकताना मनात होती भीती, असुरक्षिततेची भावना ! आणि गंमतच झाली. 


चष्मा लावलेल्या बाई पाहिल्या आणि 'त्या रागीट असणार' असा (गैर) समज करून घेऊन मी रडून गोंधळ घातला. चष्मा आणि रागीटपणा यांचं समीकरण मांडणाऱ्या माझ्या त्या अजाणपणाचं मला आजही हसू येतं ! मनाची कोरी करकरीत पाटी घेऊन आले. 'श्री गणेशा' ने आरंभ केला. आज तिच्यावर बरंच काही कोरलं गेलं आहे. मातीच्या ओबडधोबड गोळ्याला आकार मिळाला.  सुरवंटाचं फुलपाखरू झालं. शाळेचा परीसस्पर्श लाभल्यावर लोखंडाचं सोनं झालं नाही तरच नवल ! याचं श्रेय या विद्यामंदिराला आहे, येथील पुजाऱ्यांना आहे. या शाळेनी आम्हाला काय दिलं नाही ? ज्ञानाचं अमृत दिलं, प्रेमाचं खतपाणी घातलं, मायेची ऊब दिली, प्रोत्साहन दिलं, चुकांची शिक्षा केली, यशाबद्दल शाबासकी दिली. संस्कारांचे पैलू पाडले, महत्त्वाकाक्षांचे पंख दिले. इथेच झाला भावनांचा परिपोष ! मिळाला दुर्दम्य आत्मविश्वास ! कलागुणांना वाव मिळाला. सद्गुणांची संपत्ती आणि अनुभवांची शिदोरी दिली या ज्ञानमाऊलीने ! इथे काय आम्ही चार बुकं शिकायला आलो? छे, छे ! परमेश्वरानी लिहिलेलं जगाचं भलं मोठं पुस्तक कसं वाचायचं ते इथे समजलं.गणितं सोडविता सोडविता जीवनाचं गणित मांडायला शिकलो. यशवंतांच्या 'आई'ने महान मंगलत्वाचा साक्षात्कार घडविला तर स्वातंत्र्यवीरांचे ‘स्वतंत्रतेचे स्तोत्र' ऐकून कान धन्य झाले. 'गर्जा जयजयकार' ने देशभक्तीची ज्योत पेटवली. 'Jolly Miller' ने आनंदी, सुखी जीवनाचा मंत्र सांगितला. भूगोलाने जगातील अनेक आश्चर्यांशी तोंडओळख करून दिली. संस्कृत सुभाषितांनी विचारांची समृद्धता प्रदान केली. तर संतवाङ्मयाने मनात भक्तीचा झरा झुळझुळ वाढू लागला. विज्ञानाने अंधश्रद्धांना मूठमाती मिळाली. आणि हो 'इतिहासाचे अवघड ओझे,डोक्यावर घेऊनि ना नाचा

'करा पदस्थल त्याचे आणिक, 

चढूनि त्यावर भविष्य वाचा'


असा संदेश इतिहासाने दिला. गुरुजनांचे आचरण म्हणजे नीतिमूल्यांचे चालते बोलते पाठ होते.आम्ही घडलो, वाढलो, उमललो, सुसंस्कृत झालो या शाळेच्या साक्षीने ! आमच्या बालविश्वातील चिमुकल्या वादळांची, आनंद व दुःखाच्या क्षणांची साक्षीदार ही वास्तू आहे. तिच्याच साक्षीने 'चिमणीच्या दातांनी' खाऊची वाटणी झाली. रुसवे फुगवे झाले, भांडणे झाली, कट्टीची दोस्ती झाली, एकमेकींच्या खोड्या केल्या, प्रसंगी चहाड्याही केल्या. पण मनं निष्पाप होती म्हणून ती कायमची दुभंगली नाहीत. कट्टीनंतर होणाऱ्या दोस्तीचा आनंद काही आगळाच असायचा. मैत्री अधिक दृढ व्हायची.माझ्या जीवश्चकंठश्च मित्र व  मैत्रिणींनो, तुमचा निरोप कोणत्या शब्दात घेऊ? आज ना उद्या प्रत्येक जण वेगवेगळ्या वाटेने जाणार ! आयुष्याच्या एखाद्या वळणावर, सुदैवाने कोणाची भेट झाली तर तो माझ्या जीवनातील ‘सोनियाचा दिनु' असेल. त्यांनी भरभरून दिलेलं प्रेम माझ्या दृष्टीने एक मोलाचा ठेवा आहे. येथील गुरुजन ! त्यांच्या कृपेने अक्षराबरोबर मनाला वळण लागले. शब्दभांडार समृद्ध झाले. अवांतर वाचनाची आवड निर्माण झाली. पाठांतराची सवय लागली. ज्ञान आणि व्यवहाराची सांगड कशी घालायची ते कळले. गुरुजनांचे ऋणही फेडणे अशक्य आहे. पण त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे अगत्याचे आहे.  शाळा आवडते म्हणून इथेच कायमचे थांबता येणार नाही. मात्र जीवनाच्या प्रवासात इथल्या ज्ञानाची शिदोरी आमच्या बरोबर राहणार आहे. 'Come to learn and go to serve' ही मोलाची शिकवण आम्हाला पदोपदी कर्तव्याचे स्मरण देत राहील.

शाळेच्या पहिल्या दिवशी डोळ्यात अश्रू होते. आजही डोळ्यात अश्रू आहेत. जणू ते खंत व्यक्त करताहेत -

"अहा ते सुंदर दिन हरपले मधुभावाचे वेड जयांनी, जीवाला लाविले ।"

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका  धन्‍यवाद

 निबंध 2


मी शाळेचा निरोप घेताना

महत्‍वाचे मुद्दे : 

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • शाळेतील कालावधी
  • शिक्षक-मुख्याध्यापक
  • इतर सांस्कृतिक कार्यक्रम
  • पुढील आयुष्यास असणाऱ्या गुणांची शिदोरी

आज शाळेत निरोप समारंभ होता. रोज शाळेकडे धाव घेणारी पावले मंद झाली होती. तब्बल बारा वर्षे, एक तप या शाळेत मी काढलं होतं. इयत्ता पहिलीत बावरलेल्या अवस्थेतच मी आईचे बोट धरून या शाळेत प्रवेश केला. इयत्ता पहिलीपासून बारावीपर्यंतची शाळा असल्यामुळे एवढी मोठी शाळा, इतकी प्रचंड विद्यार्थ्यांची संख्या पाहून मी भांबावूनच गेलो होतो. काय करावं काही न सुचत नव्हते  परंतु शाळेतल्या बाईंनी जवळ घेतलं. डोळे पुसले. आणि मनातली भीती पार पळाली. शाळेबद्दल विश्वास वाटू लागला.


तेव्हापासूनची शाळेतील बारा वर्षे कशी उडून गेली समजलं नाही. त्या वेळचा भित्रा, परंतु खोडकर, हुशार परंतु आळशी मुलगा जबाबदार नागरिक झाला होता.बहुढंगी व विविध रंगी व्यक्तिमत्त्वाचे शिक्षक लाभले. सर्वांनी जातीनं लक्ष दिलं. प्रत्येक शिक्षकाचं काही ना काही वैशिष्ट्य होतं. नकळत शिक्षकांशी दोस्ती झाली. शाळा मित्र बनली. शाळेचे मुख्याध्यापक फारसे भेटले नाहीत. त्यांचा दबदबाच फार होता.


 एकदा दंगा केला म्हणून त्यांच्याकडे नेलं होतं. त्यांना बघून लगेच भीतीनं रडायला सुरुवात केली. चूक कबूल केली. त्यांनी मी केलेल्या खोड्यांच्या परिणामांची कल्पना दिली. परत तशी चूक माझ्या पुढील आयुष्यात घडली नाही, घडणार नाही, असा बदल माझ्यात झाला. त्यांचे भाषण मनापासून आवडायचे. पण त्यांच्याबद्दल मनात आदरयुक्त भीतीच घर करून बसली.याच शाळेत मला चांगले मित्र भेटले. एकत्र बसून अभ्यास केला.  एकमेकांना भेटल्याशिवाय चैनच पडायची नाही. शाळेची सुट्टीही नकोशी वाटायची. आता प्रत्येकजण दशदिशांना जातील, परत केव्हा भेटतील कोण जाणे, या विचाराने मन अस्वस्थ झालं. मित्रांबरोबर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम आठवले, अटीतटीचे सामने आठवले. मन सगळ्या आठवणींनी भरून गेले.

शाळेनं आपल्याला काय काय आणि किती किती दिलं यांची मनातल्या मनात यादी तयार झाली. ज्ञान, संस्कार यांचे धन या शाळेत गवसलं होतं. समाजातील चुकीच्या मार्गावर पावले पडणार नाहीत, याची जबाबदारी उचलली होती. भावी जीवनात यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या सर्व गुणांची शिदोरी दिली होती.शाळेत निरोपसमारंभ चालू होता. पण माझे लक्ष तिकडे नव्हतेच. माझे मन भूतकाळात गिरक्या मारत होते. भूतकाळातील रम्य-रम्य आठवणी वेचून आणत होते. नेहमीचा गडबड्या - बडबड्या मी आज मूक झालो होतो. माझ्या शाळेविषयी, शिक्षकांविषयी वाटणाऱ्या आपुलकीनं, कृतज्ञतेनं मन भरून गेलं होतं. मित्रांच्या होणाऱ्या ताटातुटीमुळे अस्वस्थ झालो होतो. पण भविष्यकाळात झेप घेण्यासाठी पंखात बळ आलं होतं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत