शेतकरी मराठी निबंध | shetkari nibandh in marathi

शेतकरी मराठी निबंध | shetkari nibandh in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज शेतकरी  मराठी निबंध बघणार आहोत. भारतात सर्वात अभागी जीव म्हणजे शेतकरी. तो सर्वांना अन्न पुरवितो मात्र स्वतः कुपोषित असतो. वस्त्रासाठी कापूस पिकवितो पण त्याला अंगभर कपडे नसतात. ऊन,पाऊस,वारा, थंडी याची पर्वा न करता शेतात राबतो परंतु त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला त्याला मिळत नाही. लाखो रुपयाच्या शेतीचा तो मालक असतो परंतु वेळ प्रसंगी खिशात रुपया नसतो. वर्षानुवर्ष कर्ज घ्यायची त्याला गरज पडते. कर्जासाठी बँकेत व सावकाराच्या घरी चकरा मारुन दमतो तेव्हा त्याच्या यातना त्याला आत्महत्येस प्रवृत्त करत असतात.भारतीय शेतकरी हा शेतमालाचा केवळ उत्पादक आहे. त्याला शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार नाही. पुढील काही ओळीतून त्याची स्थिती स्पष्ट होते.


राबून राबून रात्रं दिनी घाम गाळुनी

शेतकरी पिकवूनी आणी बाजारी 

भाव मात्र त्या मालाचा ठरवीत असतो व्यापारी


 त्यामुळे भारतीय शेतकरी हा पिढ्यान पिढ्या दरिद्री असतो. परंतु याच शेतकऱ्यांच्या जीवावर व्यापारी मात्र श्रीमंत होत असतो. कोणताही घाम न गाळता, कोणतेही कष्ट न करता. त्यामुळे भारतीय व्यापारी वर्ग हा शेतकऱ्यांना छळणारा ठरत आहे.शेतकऱ्यांना छळणारा आणखी एक वर्ग म्हणजे बियाणे कंपन्या तथा कीटक नाशके व खतांच्या कंपन्या. ह्या सर्व कंपन्यांच्या सर्व उत्पादनाचे भाव सतत वर वर चढत असतात. शेतकऱ्यांजवळून मातीमोल किमतीने घेतलेल्या पिकांवर प्रक्रिया करुन सोन्याच्या भावाने बियाणे विकल्या जाते. 


शेतकऱ्यांचा माल घेतांना मात्र भाव सारखा खाली खाली घसरत असतो. वन्य प्राण्यांचा संरक्षण कायदा हा सुद्धा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. हरीणांचे कळप, नील गाईचे कळप, डुकरांचे कळप शेतात हैदोस घालून हजारो हेक्टर पीक फस्त करत असतात. परंतु कोणतीही तक्रार न करता तो निमुटपणे सहन करतो.भारतात पावसाची अनियमितता ही पिकांच्या नुकसानास कारणीभूत ठरते. तसेच अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, वादळ वाऱ्यासह गारपीट, पिकांवर येणारी कीड, विविध रोग इत्यादी मुळे पिकांचे नुकसान होवून उत्पन्न घटते. एक प्रकारे निसर्ग सुद्धा त्यांच्यावर अन्याय करीत असतो.वरील सर्व अडचणींवर मात करुन मोठ्या हिमतीने परिस्थितीवर शेतकरी मात करीत असतो व आपली तथा देशाची अन्नाची गरज भागवीत असतो. अशा कष्टाळू शेतकऱ्यास माझे अभिवादन!

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध  2


भारतीय  शेतकरी मराठी निबंध


[ मुद्दे- पूर्वीचा शेतकरी, आत्ताची परिस्थिती, सुधारणा, कष्टमय जीवन, अशिक्षित, अंधश्रद्धाळू, समस्या ]

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शेतकरी मराठी निबंध बघणार आहोत. भारत हा खेड्यांचा देश. शेतकरी हा ग्रामीण जीवनाचा केंद्रबिंदू.' परंतु समस्त अधिकारीवर्ग, सरकारी कारकून, वकील, सावकार या सर्वांकडून तो नाडला जात होता. त्याच्या या निःसत्त्व, प्रेरणाशून्य स्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्याला शिक्षणाचा उपाय म. फुले यांनी सुचवला.


भारताचे पंतप्रधान लाल बहाद्दर शास्त्री यांनीही 'जय जवान! जय किसान!' अशी घोषणा करून शेतकऱ्यांचा गौरव केला. महात्मा गांधींनीही स्वातंत्र्यापूर्वीच 'चला खेड्याकडे' असा आदेश दिला होता. स्वातंत्र्यकाळातील शेतकरी आता पूर्वीसारखा राहिला नाही. ज्ञानाची गंगा त्याच्या उंबरठ्यावर येऊन पोचली आहे. त्यामुळे चांगली बी-बियाणे, खते इत्यादींचा वापर करून तो बऱ्यापैकी उत्पन्न काढू शकतो. 


वीज आज त्याच्या घरात आल्यामुळे शेतातील विहिरीवर पंप बसवू शकतो. शेताला पाणी देऊ शकतो. त्यामुळे तो पूर्वीचा दैवाधीन शेतकरी राहिला नाही. त्याची आर्थिक परिस्थिती नक्कीच सुधारली आहे. आपल्या मोटारसायकलवर बसून ऐटीत शेतात जाणारे शेतकरी तुम्हाला देशात दिसतील. कोकणातील शेतकरी मात्र शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने उदरनिर्वाहासाठी मुंबईत नोकरी करत असलेले दिसतात.या 'जगाच्या पोशिंद्याला' कष्ट मात्र खूप करावे लागतात. आपल्याला दुकानात 'हिरे, मोती, पाचू'सारखं उत्तम दर्जाचं, मौल्यवान धान्य दिसतं. परंतु त्यामागचे शेतकऱ्याचे कष्ट दिसत नाहीत. 'साक्षरता' 'सुशिक्षितपणा' शेतकऱ्यामध्ये फक्त पंचवीस टक्यांपर्यंत पोचला आहे. उरलेले पंचाहत्तर टक्के शेतकरी अजूनही अशिक्षित आहेत. अंधश्रद्धाळू आहेत.भरपूर शेती असलेले शेतकरी श्रीमंत झाले आहेत. परंतु कमी शेती असलेले शेतकरी अजूनही गरीबच आहेत. दलाल त्यांच्याकडून 'कवडीमोलानं' माल घेतात व तोच माल शहरात सोन्याच्या भावानं विकतात. त्यामुळे खेड्यात स्वत:चा माल घेऊन जाऊन दिवसभर उन्हातान्हात बसून भाजी, धान्य विकणारे शेतकरी दिसतात. नाहीतर काही शेतकरी आपला माल घेऊन शहराकडे धाव घेतात. समाजातील लोकांनाही त्यांच्याकडून 'स्वस्त' पण 'मस्त' अशाच गोष्टी हव्या असतात. 


गरीब शेतकऱ्याकडून आठ रुपये लिटर दूध घेऊन शहरात सोळा रुपये या भावानं ते विकलं जातं. म्हणून अजूनही शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचा मोबदला मिळत नाही. सरकारने योग्य दराने शेतकऱ्याकडून सर्व माल विकत घेऊन जनतेलाही योग्य दराने पुरवला तर सर्वांना लाभदायक होईल. शेतमजुरांची अवस्था तर यापेक्षाही केविलवाणी! त्यांच्या वाट्याला स्वातंत्र्याच्या काळातही 'गरीबीतच जिणं' नशिबी आलं आहे. वर्षातून चार महिने काम. उरलेले आठ महिने उपासमार. या 'जनावरांच्या' जिण्यातून बाहेर पडण्यासाठी 'आनंद यादव' यांना कशी 'झोंबी' करावी लागली हे सर्वांना माहीत आहेच.शेतकऱ्यांनी उत्पादनात वाढ करून अन्नधान्याच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण बनवलं आहे. साखरेची निर्यात परदेशात मोठ्या प्रमाणावर होते. उसाला व साखरेला भाव जास्त मिळतो. म्हणून बरेचसे शेतकरी उसाची लागवड जास्त करतात. तर हापूस आंब्याला जास्त भाव मिळतो म्हणून कोकणातील शेतकरी रेशनचा तांदूळ खाऊन कलमांच्या बागा तयार करण्याच्या मागे लागले आहेत. मग भारतात अन्नधान्याचे उत्पादन कोण तयार करणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.अण्णासाहेब शिंदेंनी आपल्या शेती व पाणी' या पुस्तकात अमेरिकेतील 'कार्पोरेट फार्मिंग'चा पुरस्कार केला आहे. तसेच 'वनशेती' करण्यास प्रोत्साहन दिले आहे. शेती व अन्नप्रश्न हे व्यापक राष्ट्रहिताशी निगडीत असलेले प्रश्न आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियोजनपूर्वक शेती करावी. परंपरागत पद्धतीने करू नये. शेतीच्या नियोजनात फळबागा, पशुसंवर्धन, शेतीशिक्षण व संशोधन या बाबींकडे खास लक्ष पुरवले पाहिजे. 


शेती व औद्योगिकरण यांचा संबंध जोडला तर काळाबरोबरच्या चढाओढीत 'शेतकरी' व आपला 'शेतीप्रधान' भारत देश मागे पडणार नाही.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध  3

शेतकरी मराठी निबंध

 भारतीय शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आपल्या देशामध्ये ७०% लोक हे शेतीवर अवलंबून आहेत व शेती हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहत व त्याचा शेत हाच व्यवसाय होय, भारतीय शेतकरी बहतेक अडाणी असतात कारण ते दसरा व्यवसाय करू शकत नाहीत, त्यामुळे ते शेतीकडे आपले उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पाहतात. 


आपल्या भारतामध्ये शेतकऱ्यांचे सर्वसाधारण दोन गट पडलेले आहेत. एक म्हणजे बडे शेतकरी जे सधन आहेत. ज्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय व अन्य दुय्यम व्यवसाय आहेत. या लोकांच्या हातामध्ये बराच पैसा व सत्ता एकवटलेली आहे आणि दुसरा म्हणजे गरीब शेतकरी ज्याकडे दुसऱ्या दिवशी भाकरीची तजवीज कशी करावी असा प्रश्न असतो. या शेतकऱ्यांकडे पैसा अगदी अल्प प्रमाणात असतात व यामध्ये बहुसंख्य शेतकरी वर्गाचा समावेश होतो. असा हा बहुसंख्य गरीब शेतकरी वर्ग याकडे पैसे अगदी अल्प प्रमाणात असतात

.

शेतकऱ्यांकडे शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन असते व दुसरे उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे जेव्हा पूर येतो व जेव्हा दुष्काळ पडतो अशा काळात शेतात असलेले सर्व पीक वाया जाते किंवा जळून जाते, शेतकऱ्यांचे साधे भांडवलही भागत नाही. भारतीय शेती ही अनिश्चित स्वरूपाची आहे व ती सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी हा सर्वस्वी पावसाच्या पडण्यावर व न पडण्यावर त्याचे भवितव्य अवलंबू असते, जेव्हा जास्त पाऊस पडतो तेव्हा शेतातील सर्व पिकांची नासधूस होऊन जाते व शेतकऱ्याला खायलाही काही शिल्लक राहत नाही, अशावेळी त्याच्यासमोर प्रश्न असतो काय खायचे ? व पुढच्या वेळेस पीक लावण्यासाठी भांडवल कोठून उभारावयाचे.


 कित्येकदा असे होते की शेतकऱ्यांना शेतामध्ये दोन दोनदा पेरणी करावी लागते. अशावेळेस शेतकरी असा विचार करतो की आपण यावेळेस सावकाराकडून पैसे घेऊ व पुढच्या वर्षी पीक आल्यावर त्याला परत करू, पण दुर्दैवाने असे होतेच असे नाही.


अशा वेळी गरीब शेतकरी सावकाराकडून कर्ज म्हणून पैसे घेतो. दागिने असेल तर ते गहाण ठेवतो व पैसा उभा करतो. पण सावकाराकडून घेतलेले कर्ज त्याला फिटता फिटत नाही. त्या पैशावरचे व्याज फेडण्यातच शेतकऱ्याचे आयुष्य जाते व मुद्दल फेडणे हे तर दूरच. अशा वेळी शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहतात. त्यांना आपल्याजवळ असेल नसेल तेवढी पुंजी सावकाराला द्यावी लागते. 


अशा प्रकारे शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकतात. कर्जाने बेजार झालेले शेतकरी शेवटचा सुटकेचा उपाय म्हणून 'आत्महत्येकडे' पाहू लागतात. मग ते औषध पिऊन, फाशी घेऊन आपली सुटका करवून घेतात. कारण त्यांच्यापुढे कोणताच पर्याय उपलब्ध नसतो. आणि आता आपला जगून काही उपयोग नाही कारण त्याच्यामागे सावकार नावाचे भूत लागलेले असते. त्यामुळे बहुतांश कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. 


त्यात शासनाने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून १ लाख रुपये दिले जात आहेत. त्यामुळे कर्जबाजारी सामान्य शेतकरी असा विचार करतो की आपण जगून तर काही कमावू शकत नाही निदान मेल्यावर तरी आपल्या कुटुंबियांना सुख देऊ. त्यामुळे बरेचसे ज्येष्ठ नागरिक आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात व आपल्या कुटुंबियांना १ लाख रु. मिळवून देतात. पण शेतकरी हा आपल्या देशातील राजा आहे. त्यानेच अशी आत्महत्या करण्यास सुरुवात केली तर आपली पूर्ण अर्थव्यवस्था डळमळेल.


भारताच्या उत्तरेकडील भाग हा सधन आहे. जसजसे दक्षिणेकडे यावे तशी शेतकऱ्यांची परिस्थिती खालावत जाताना दिसते. भारतात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक या राज्यात प्रामुख्याने गरीब शेतकरी आढळतात. शेतकऱ्यांची आत्महत्या कशी रोखायची ? हा मोठा प्रश्न आज शासनासमोर आ वासून उभा आहे.


शासनाने आपल्या परीने उपाय करण्याचा प्रयत्न केला पण तो शेतकऱ्यांकडे पोहोचतोच असे नाही. ज्यांची पिके दुष्काळात गेली त्यासाठी सरकारने भरपाई दिली पण ज्याचे नुकसान झाले आहे त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही. शासनाने शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारावी यासाठी सबसिडी द्वारे त्यांना सवलती उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या फायद्याच्या विविध योजना आखल्या. पिकांवरील घेतलेल्या कर्जाचे व्याज माफ केले.


शेतकऱ्यांना कमी दराने कर्ज उपलब्ध होईल असे उपाय केले. पण हे सर्व कागदोपत्रीच राहिले ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले असे नाही. व आताच शासनाने नागपूर पॅकेज जाहीर केले आहे. पण शेतकऱ्यांसाठी पुरवण्यात आलेला पैसा शेतकऱ्यांपर्यंत येईपर्यंत अनेकांच्या खिशात जातो.


शेतकऱ्यांना फायदा व्हावा व त्याची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी शासनाने उपाय करावयास हवेत. शासनाने आपला कारभार अधिक पारदर्शी करावा. आपल्या येथे असणाऱ्या भ्रष्टाचारी लोकांना काढून टाकावे व शेतकऱ्यांपर्यंत योजना जातील अशी तजवीज करावी. शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे हंगाम सुरू होण्यापूर्वी उपलब्ध करून द्यावे. शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून द्यावे. शेतकऱ्यांना सोईचे होईल अशा ठिकाणी बँकांच्या शाखा काढाव्यात व सावकाराच्या तावडीत सापडलेल्या शेतकऱ्यांची मुक्तता करावी.


शेतीवर पूर्णत: शेतकरी अवलंबून असतो. त्यांना जोडव्यवसाय करण्यास प्रोत्साहन द्यावे व जोडव्यवसायाचे प्रशिक्षण द्यावे व कसे चांगल्या प्रकारे आपला माल विकावा, साठवून ठेवावा याचे प्रशिक्षण द्यावे. जोपर्यंत शेतकरी स्वावलंबी होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या मानेवर आत्महत्येची टांगती तलवार आहे. 


यासाठी शेतकऱ्याने ही आपल्या हिताचा जोडधंदा स्वीकारावा व स्वावलंबी बनावे. मुख्य म्हणजे शासनाने शेतकऱ्यांना शेतीचे नवे तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे जेणेकरून शेतकरी आपले उत्पन्न वाढवू शकतील व पुन्हा एकदा आपला शेतकरी आनंदी होईल व म्हणेल - मेरी देश की धरती सोना उगल उगले हिरे मोती ।मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद