आज शिवाजी महाराज असते तर निबंध मराठी | Aaj Shivaji Maharaj Aste tar Nibandh

आज शिवाजी महाराज असते तर निबंध मराठी | Aaj Shivaji Maharaj Aste tar Nibandh


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शिवाजीराजे आज असते तर मराठी निबंध बघणार आहोत. हा कल्पनात्मक प्रकारचा निबंध आहे . यामध्ये शिवाजी महाराज आज असते तर काय बदल घडवून  आणले असते याला धरून निबंध लिहिला आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 


शिवाजीराजे आज असते तर.... श्री.बाबासाहेब पुरंदरे लिखित 'जाणता राजा' नाटक बघायला गेलो होतो.घरी आल्यानंतरही घोडे, सैन्य, रायगड, सिंहगड, शिवाजीराजे सर्व काही फेर धरून डोळ्यासमोर नाचतच होते.जणू शिवकाळात आपण वावरतो आहोत असा भास झाला. मग भानावर येताच क्षणभर मनात विचार आला.शिवाजी राजे असते तर.....!


राजे-महाराजे आपल्या देशात का थोडे झाले? पण 'न भूतो न भविष्यति' असा हा 'जाणता राजा' आपल्या देशाला लाभला, हे सद्भाग्यच होय. "मानवी सद्गुणांचे प्रतीक' असा उल्लेख पंडित नेहरूंनी शिवाजीराजेंचा केला. शिवाजीराजे स्वराज्यासाठी,सुराज्यासाठी ते जगले.आदर्श राजा कसा असावा , हे त्यांच्या चरित्रावरून समजते.


आजची स्थिती तर फार वाईट आहे.कुंपणानेच शेत खावे तसा प्रकार चालला आहे.ज्या सुराज्याची स्वप्ने शिवाजीराजांनी बघितली, त्या स्वप्नांची पहाट अजून झालेलीच नाही.आज राजकीय अंदाधुंदीचा कहर माजला आहे.भ्रष्टाचार , गुन्हेगारी यांचे खतपाणी मिळत असल्याने देशरूपी वृक्षाला कीड लागली आहे.आज शिवाजीराजे असते तर हे बघून अस्वस्थ झाले असते.


अंधाऱ्या मार्गात प्रकाशाचा एखादा झोत दिव्यत्व देतो तसं राजाचं जीवन होतं. लहानपणापासून त्यांनी फार महागाची माणसे जमविली होती.कितीही रक्कम दिली तरी न मिळणारे हिरे त्यांनी मिळविले होते. कशाच्या जोरावर? तर हृदयातील स्नेहाच्या जोरावर! हृदय अर्पण करून त्यांनी एक एक  दागिना उचलला. त्यांनी कुशल नेतृत्त्व केले. अतुलनीय शौर्य ,धैर्य , द्रष्टेपणा, चाणाक्ष बुध्दी , निर्व्यसनी, सर्वधर्म सहिष्णूता, गुणग्राहकता, ज्वलंत राष्ट्रभक्ती हे सर्व त्यांच्या ठायी होते.


आज ते असते तर देशाचा कायापालट करून टाकण्यासाठी ते अधीर झाले असते. आजच्या नेत्यांना, आजच्या समाजाला, आजच्या नागरिकाला त्यांनी योग्य मार्गदर्शन केले असते. 'स्वच्छ व सुरक्षित राज्यकारभार' हा आदर्श राजाचा आत्मा आहे. हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीने पटवून दिले असते.


रयतेच्या सुखासाठी ते जगले असते. विज्ञानाची कास धरून प्रगतीचे उंच मनोरे त्यांनी गाठले असते.महाराष्ट्र हा आनंदभवन व्हावा हे त्यांचे स्वप्न होते.आज तर रयतेचे रक्षकच भक्षक बनले आहेत.भ्रष्टाचाराचे वारे तुफान सुटले आहे. अन्यायाला उधाण आले आहे. राजकीय डावपेचात सामान्य माणूस चुरगाळला जात आहे. शिवाजीराजे असते तर त्यांचा दृढ दरारा, त्यांची नजर , त्यांचा आत्मविश्वास , त्यांची कर्तव्य कठोरता, त्यांचा न्याय , त्यांचे आदर्श या सर्वांचा ठसा देशावर उमटला असता.


सुराज्याची प्रभात झाली असती. 'पर स्त्री मातेसमान' मानली गेली असती.कल्याणच्या सुभेदाराची सून कल्याणच्या खजिन्यासह जेंव्हा आणली गेली, तेंव्हा महाराजांनी तिला साडी-चोळी देऊन परत पाठविली. असा स्त्रीचा सन्मान आज झाला असता. तिच्यावर अन्याय करणाऱ्याला शिक्षा मिळाली असती.


शिवरायांच्या कार्यरूपी शलाकेने दशदिशा उजळल्या. त्यांचे स्मरण भावी पिढ्यांसाठी एक चिरंतन आदर्श ठरणार आहे.सद्गुणी, धर्माचरणी व संयमशील अशा शिवरायांचे जीवन प्रेरणादायक आहे.शिवरायांचे स्मरण राष्ट्रीय उत्थानासाठी आवश्यक आहे.शिवाजी महाराज आज असते तर आजचा भारत पाहून व्यथित झाले असते.


आज दारिद्र्य , लूट, भ्रष्टाचार, बॉम्बस्फोट , स्वार्थी राजकारण, यात रूतलेली भारतमाता अश्रू ढाळीत आहे. देशासाठी प्रसंगी प्राण देऊन भारत भूचे रक्षण करणारे नेते आपल्या देशातच होऊन गेले. न्यायप्रिय व कर्तव्यकठोर असे शिवाजीराजे आज आपले राजे असते तर आपण मुळी असे रसातळाला गेलोच नसतो.शिस्तबध्द व जनकल्याणकारण राज्यव्यवस्था आज देशाला लाभली असती, सर्वसामान्य जनतेची ससेहोलपट थांबली असती. 

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


निबंधाचे शीषर्क विषय खालील प्रमाणे असू शकतात :

  • शिवाजी महाराज पुन्हा अवतरले तर निबंध
  • छत्रपति शिवाजी महाराज असते तर निबंध
  • शिवाजी महाराज यांचे विचार