सीमेवरील जवानाचे सैनिकाचे मनोगत मराठी निबंध | Essay On Soldier In Marathi

सीमेवरील जवानाचे  सैनिकाचे मनोगत मराठी निबंध | Essay On Soldier In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण " सैन्यदलातील युवकाचे मनोगत"  मराठी निबंध बघणार आहोत.  कडाक्याच्या थंडीतही व कितीही विपरीत परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता भारत मातेचे रक्षण करणाऱ्या सैनिकाला अभिवादन करूया आणि सुरुवात करुया निबंधाला 


भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी घोषणा केली – 'जय जवान, जय किसान'. आम्ही जवान आणि किसान दोघेही देशाचे महत्त्वाचे घटक आहोत, याची जाणीव त्यामुळे झाली. आज मी एक जवान या नात्याने तुमच्यापुढे माझे मनोगत व्यक्त करणार आहे. माझी आत्मकथा रंगभरी नसून रोमहर्षक आहे. त्यात विलास नाही, तर साहस आहे; कारण मी भारतीय जवान आहे.  माझा जन्म झाला, तो एका पहाडी प्रदेशात. आमच्या गावात शेती-व्यवसाय करण्यासाठी जमीन नाही; त्यामुळे आमच्या प्रदेशातील अनेक तरुण सैन्यात भरती होतात.



माझे वडीलदेखील सैनिकच होते. त्यांनी कित्येक वर्षे देशसेवाच केली आहे. मी लहानपणीच ठरवले होते की, सैन्यातच जायचे. म्हणून मी लहानपणापासूनच घोड्यावर बसण्याचा सराव केला. पहाडी प्रदेशातच लहानपण गेल्यामुळे पहाडावर चढणे मला विशेष कठीण वाटले नाही. मी पोहायलाही शिकलो.



डेहराडून येथील सैनिकी शाळेत मी सैनिकी शिक्षण घेतले. तेथे रायफल, बंदूक, तोफ कशी चालवायची, याचे शिक्षण मिळाले. मोटार आणि ट्रक-ड्राइव्हिंगमध्ये अनेक प्रमाणपत्रे मिळविली. नंतर मी सैन्यात भरती झालो.युद्धप्रसंगी प्रत्यक्ष लढावे लागते. पण जेव्हा शांततेचा काळ असतो, तेव्हा आम्हाला देशाच्या सरहद्दीचे रक्षण करावे लागते


'हिंदी-चीनी भाई भाई' अशा घोषणा करीत चीनने भारतावर आक्रमण केले होते. तेव्हा त्यांच्या अचानक झालेल्या हल्ल्याला चोख उत्तर देण्यासाठी आमची एक तुकडी तिथेच सज्ज होती. बर्फाळ प्रदेशात आम्ही चौक्या उभ्या केल्या; मोठमोठ्या छावण्या उभ्या केल्या. चीनी सैनिकांजवळ आधुनिक शस्त्रास्त्रे होती. शिवाय, त्यांनी पूर्ण तयारीनिशी हल्ला केलेला होता. आम्हाला गाफील ठेवून केलेला हल्ला परतविणे मोठे जिकिरीचे होते.



एक दिवस आम्ही पहारा देत होतो. अचानक शत्रूनी चढाई केली. त्या दिवशी मी प्राण पणाला लावून एकट्याने पंचवीस सैनिकांना यमसदनाला पाठविले. ही कामगिरी केल्याबद्दल माझा गौरव झाला. त्या वेळी मात्र वाटले नव्हते, की मी सहीसलामत या हल्ल्यातून बाहेर पडेन. चीन-भारत युद्धविराम झाला होता.


 माझी पत्नी आणि माझा छोटा मुलगा यांचा तर डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता, की खरेच मी घरी परतलोय. गावातील लोक माझे अनुभव ऐकण्यासाठी उत्सुक होते. सुखाचे दिवस पटकन संपतात. परत काही दिवसांतच मला सीमेवर परतावे लागले. पाकिस्ताने काश्मिरवर आक्रमण केले होते. देशाच्या सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी आम्हा जवानांची. 


पाक सैनिकांशी लढताना माझ्या उजव्या पायाला गोळी लागली. पण त्याही वेळेस मी पराक्रमाची शर्थ केली होती. माझ्या शौर्याबद्दल मला भारत सरकारने 'वीरचक्र' देऊन सन्मानित केले. माझ्या देशवासी बांधवांनो, मला तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की, आम्ही जवान सीमांचे रक्षण करतो; म्हणून तुम्ही सगळे सुखाने जगत असता. तुमच्या सुरक्षिततेसाठी आम्ही आमचे प्राण पणाला लावतो. आम्ही आमच्या घरा-दारावर अक्षरश: तुळशीपत्र ठेवलेले असते.



“भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो ओठी सैनिकहो तुमच्यासाठी..." या गाण्याच्या ओळी आम्हाला बळ देतात; आम्हाला लढण्याचे सामर्थ्य देतात.


युद्धभूमीवर गेल्यावर कोणत्याही क्षणाचा भरवसा नसतो. कोणत्याही क्षणी प्राण गमावण्याची शक्यता अधिक असते. तरीही आम्ही आमचा देश, आमचे बांधव असे स्वत:ला बजावत प्राणपणाने हल्ले परतवतो. फक्त आमच्या शहीद होण्यामुळे देशाचे रक्षण होत असले, तरी आमच्या मुलाबाळांना, कुटुंबियांना मदतीचा हात द्या. त्यांना आपले म्हणा. त्यांना वाऱ्यावर सोडू नका, एवढीच विनंती.



मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व आपल्या भारत देशाबद्दल असलेले प्रेम तुम्ही कमेंट करून सांगू शकता. व हा निबंध शेयर करून तुम्ही आपल्या सैनिकाला पाठींबा देऊ शकता. जयहिंद ! भारतमाता की जय!


निबंध 2

सीमेवरील जवानाचे सैनिकाचे मनोगत मराठी निबंध | Essay On Soldier In Marathi


नववीची परीक्षा संपली. दहावीचे वेध साऱ्या घरालाच लागले होते. नव्या दमाने कामाला सुरुवात करायचे म्हणजे अंगात उत्साहाचे उधाण हवे. उत्साहासाठी पर्यटनासारखा दुसरा उपाय नाही, म्हणूनच संधीचा फायदा घेत आम्ही कुलू-मनाली-लेह असा प्रवासाचा जंगी बेत आखला.


रोहतांगपासच्या पुढे गेल्यावर जागोजागी सीमारक्षकांच्या जवानांचे डेरे दिसू लागले. येथे चहाच्या टपरीवर काही जवानांची गाठभेटच झाली. त्यांचा रुबाबदार हिरवा ड्रेस, कॅप, खांद्यांवरचे चांदण्यांचे बिल्ले, शौर्यपदके, खाड-खाड वाजणारे बूट, डोळ्यातली करडी जरब पाहून माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.


त्यातल्या मराठी बोलणाऱ्या तरुणाला तर मी चक्क हात लावून पाहिला. त्याने मान वळवून पाहिले. माझ्या प्रश्नार्थक, गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहात त्यानेच बोलायला सुरुवात केली, 'काय दोस्ता, महाराष्ट्रातून आलास? कसा आहे आपला महाराष्ट्र? मजेत ख्याली खुशालीत नां? तू फिरायला आलास? अरे, गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच आम्ही हा वाहून गेलेला रस्ता परत बांधला. नाहीतर वाहने येऊ शकत नव्हती येथे.


हिमालय पर्वत खूप ठिसूळ, सारखा ढासळतो, कडे कोसळतात. त्यात पावसाची अनिश्चितता. दुर्गम भाग, खडा चढ, तीव्र उतार, साधनांची कमतरता, जिवाला धोका... साऱ्यांवर मात करून हा रस्ता परिश्रमपूर्वक तयार केला. हे सारं करताना सीमेवर सतत गस्त घालून सुरक्षितता पडताळून पाहणे, अचानक गोळीबार झाला तर निधड्या छातीनं तोंड देणे हे काम खूपच! घुसखोर, आतंकवादी कुठून येतील काही पत्ता नसतो.


दिवस रात्र डोळ्यात तेल घालून सावध राहावं लागतं. काय म्हणतोस, भीती? छे! तानाजी मालुसरे, बाज प्रभू देशपांड्यांचे वंशज आम्ही! शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती देव देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती असं म्हणणाऱ्या शूर मावळ्यांचे पुत्रच आम्ही, भीतीचं आम्हाला घाबरून दूर पळते आणि अरे, कधी काळी थोडीशी भीती वाटलीच तर प्रतापराव गुजर, त्यांचे वेडात लढलेले सात मराठी मावळे आठवतात.


'हर हर महादेव ची गजना आठवते. अफजलखान वध डोळ्यासमोर उभा राहतो. 'बचेंगे तो और भी लडेंगे' असं म्हणणारी राणी लक्ष्मीबाई स्मरते. पराक्रमी महाराणा प्रताप, तात्या टोपे. 'मारिता मारिता मरेतो झुंजेन' हा मंत्र देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दूंगा' असं आवाहन करणारे सुभाषबाबू.


'रंग दे बसंती चोला माई रंग दे बसंती चोला' गुणगुणणारा भगतसिंग, अरुणकुमार वैद्य... हे सारे चारी बाजूंनी उभे ठाकतात. मध्यभागी आपला तिरंगा दिमाखानं फडकवतात. भगतसिंग उभा आहे असं वाटतं आणि दहा दहा हत्तींचं बळ अंगी संचारतं. या बळावरच त्वेषानं, नव्या जोमानं आम्ही शत्रूवर तुटून पडतो.


तू बॉर्डर' सिनेमा पाहिला असशील. 'ऑपरेशन विजय' कसे फत्ते झाले. ह्याची झलक ‘एल.ओ.सी. कारगिल' सिनेमात उत्कृष्ट दाखवली आहे. 'खालून आग, वर आग, आग बाजूंनी' अशा प्रसंगातही सैनिकाने फक्त पुढे पुढेच जायचे असते. मागे फिरायचा रस्ता बंद झालेला असतो.


सिनेमावाल्यांनी यामध्ये बरेच कारनामे, कामगिऱ्या चांगल्या कलाकृतींद्वारे देशवासियांसमोर आणल्या. अरे दोस्ता, त्यानंतर अभिनंदनाची शेकडो पत्रे आली. विद्यार्थ्यांनी तर अभिवादनाचा वर्षाव केला. कित्येकांनी खाऊचे, वाढदिवसाचे, बक्षिसाचे पैसे जमा करून आमच्यासाठी मदत पाठवली.


जेव्हा पोलिओमुळे दोन्ही पाय गमावलेल्या एका कॉलेजमधल्या युवकाने त्याच्या एकविसाव्या वाढदिवशी एकवीस बटांचे जोड पाठविले, सोबत चिठ्ठीही पाठवली. 'तुम्ही उभे आहात तोवर मला पाय नाहीत ह्याची खंत वाटणार नाही. तेव्हा मात्र आम्ही हेलावलो. अक्षरश: रडलो. त्यानं कवी चंद्र गुप्ताच्या ह्या काव्यपंक्तीही लिहिल्या,


असंख्य कार्तिरश्मियाँ विकीर्ण दिव्य दाह-सी सपूत मातृभूमि के... रुको न शूर साहसी अमर्त्य वीर पुत्र हो दृढ प्रतिज्ञ सोच लो प्रशस्त पुण्य पंथ है - बढे चलो बढे चलो ।। राखी पौर्णिमेला देशातील कानाकोपऱ्यांतून अनंत भगिनींनी सुंदर सजवलेल्या रंगीबेरंगी राख्या संदेशांसह पाठवल्या.

राखी पाठवतेय दादा, स्वीकार तू करशीलच तूच खरा रक्षणकर्ता, शिरी जबाबदारी घेशीलच! धन्य धन्य वाटतं तेव्हा! एरव्ही आजूबाजूला महिना व महिने खुरटी झुडपे, पाण्याचे ओहोळ, गोठवणारे बर्फाळ वातावरणच असते; पण ह्या पत्रांमुळे, घरून शेणाचा फोनमुळे सर्वत्र हिरवगार दिसू लागते. हृदयात वसंत फुलून येतो. अरे हेच आमचे टॉनिक कधीकधी लांबवरून हे गाणं कानी येतं. 'भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी!' अन्यथा जोडीला असतो सतलज,


कालीच्या प्रवाहाचा सतत चाललेला ध्रोंकार, रारंग तांगातले ढासळणारे दगड, पहाटेची पक्ष्यांची किलबिल, रातकिड्यांची किर्र, विजांचा कडकडाट, वाऱ्याची भणभण, पानांची सळसळ तर कधी नि:शब्द शांतता, कधी मन नैराश्येनं झाकोळून जातं. रौद्र रुपातला निसर्ग कधी डिवचतो तर कधी सत्ताधीश, आम्ही तीळ तीळ मरून तसू तसू भूमीवर विजय मिळवतो.


शत्रूच्या ताब्यातील प्रदेश भारताला जोडतो आणि सहीच्या एका फटकाऱ्यानिशी सत्ताधीश त्या भूमीची मालकी सोडतात. निज रक्ताचे अर्घ्य देऊनि शान राखतो राष्ट्राची आस मनीची नको व्हावया शाई पावन रक्ताची. एवढेच वाटते! भूमी परत दिल्यावर मात्र मनावरचा तोल ढळतो. देशभक्त नि देशद्रोही ह्यांच्या व्याख्याच हरवतात,


शिवाजी महाराजांची, क्रांतिकारकांची आठवण येते. अखंड भारताचं स्वप्न पुरं होणार की नाही ह्या विवंचनेत मन अस्वस्थ होतं. मृत्यूचं भय नाही वाटत, कारण नेहमीच पाहतो आम्ही बेमुर्वतपणे निर्लज्ज होऊन वावरणाऱ्या आणि चारी बाजूंनी नि:शस्त्रावर देखील बेछूट वार करणाऱ्या त्या मृत्यूला! आणि वेड्या, 'लढता-लढता आत्मसमर्पण, मरण नव्हे रे, ते चिरजीवन!' हे आपण शिकलो ना!


मनातली एक गोष्ट सांगतो मित्रा, वाटतं की आपल्या साऱ्या माता भगिनींना जाऊन भेटावं, त्यांना म्हणावं की आपल्या पुत्रांना स्वाभिमान, देशनिष्ठा, राष्ट्रीय भावना, शौर्य, इमानदारीचं दूध पाजा. त्यांच्या नसानसात चैतन्य फुलवा. मनात परिश्रमाची बीज पेरा.


भ्रष्टाचाराला गाडून टाका आणि बघा येणारे नवे दशक काय जादू करील! एव्हाना अर्धा-पाऊण तास होऊन गेला होता. मी सुन्न होऊन गेलो होतो, पण आतून मोठ्याने आवाज येत होता. 'सुनो गौर से दुनियावालो, बुरी नजर ना हम पे डालो चाहे जितना जोर लगालो, सबसे आगे होंगे हिंदुस्थानी!!' मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद