कमवा आणि शिका मराठी निबंध | learn and earn essay in marathi

 कमवा आणि शिका मराठी निबंध | learn and earn essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण कमवा आणि शिका  मराठी निबंध बघणार आहोत.  शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे असे म्हणतात परंतु  प्रत्येकालाच ते मिळते असे नाही कारण ज्या लोकांना दोन वेळचे जेवण नशिबी  नसते असे लोक शिक्षणाबद्दल विचारही करू शकत नाही . अशाच  लोकांसाठी कमवा आणि शिका योजना आणली गेली होती. या बद्दल आणखी माहिती घेऊया आणि सुरुवात करूया निबंधाला   



'वाचाल तर वाचाल' हा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना देऊन ठेवला आहे. शिक्षणाचे महत्त्वही आज सर्वमान्य झाले आहे. त्याचबरोबर हेही मान्य आहे की, आजकाल कोणतेही शिक्षण घ्यायचे ठरवले तर त्यासाठी खर्च खूप येतो. प्राथमिक शिक्षण सरकारने मोफत केले आहे. मुलींसाठी माध्यमिक शिक्षणही मोफत आहे. परंतु यशस्वी जीवन जगण्यासाठी केवळ शालेय शिक्षण पुरेसे नाही. त्यासाठी उच्च शिक्षण किंवा काहीतरी व्यवसाय शिक्षण किंवा धंदेशिक्षण घेणे नितांत आवश्यक असते. 



सगळ्याच विदयार्थ्यांच्या पालकांना आर्थिकदृष्ट्या हे शक्य नसते. शिक्षण तर घ्यायचे आहे; पण 'दामाजीची कृपा' नाही. मग काय करायचे? या प्रश्नाचे उत्तर आहे, 'कमवा आणि शिका'.


'कमवा आणि शिका' ही कल्पना काही आपल्याला नवीन नाही. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खेडोपाडी हिंडून मुले गोळा केली आणि त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. तेव्हा त्या योजनेचा पाया होता, 'कमवा आणि शिका.' कष्ट करा, शेतात राबा, स्वतःचे पोट भरण्याची व्यवस्था करा आणि शिक्षण मिळवा, अशी त्यामागील कल्पना होती.


प्राचीन काळी विदयार्थी ज्ञानसंपादन करण्यासाठी गुरुच्या  घरी  जात. या आश्रमांना राजाचा व धनिकांचा आश्रय असे. मात्र शिष्यांना तेथे कष्ट करावे लागत. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णालाही सांदिपनी ऋषींच्या आश्रमात कष्ट करावे लागले होते. या शिष्यांना गुरुगृही घरातील कामांपासून ते शेतीपर्यंतची अंगमेहनतीची सर्व कामे करावी लागत. साहजिकच या कामात ते कुशल बनत असत. जीवनाला आवश्यक असे प्रशिक्षणच तेथे मिळे.



अनेकदा बेकारांच्या बाबतीत विचित्र परिस्थिती उद्भवते. कामाचा अनुभव नसल्यामुळे त्यांना नोकरी मिळत नाही आणि नोकरी नसते म्हणून अनुभव मिळत नाही. परिणामी त्यांना घरीच बसावे लागते. यातून मार्ग काढण्यासाठी म्हणून सुद्धा 'कमवा आणि शिका' ही संकल्पना राबवली जाते.


 अशी सुविधा असलेल्या संस्थेत अननुभवी तरुणांना 'शिकाऊ उमेदवार' म्हणून नेमतात. त्यांना विशिष्ट प्रकारचे काम शिकवले जाते. त्यात त्यांना कुशल बनवतात. या काळात त्यांना पगार मिळत नाही; पण बऱ्यापैकी रक्कम विदयावेतन म्हणून देतात. त्यामुळे शिकणाऱ्याला हुरूप येतो. शिकण्याचे काम अगदीच फुकट गेले असे वाटत नाही आणि शिकल्यानंतर नोकरी नक्की मिळेल, याची खात्री असते. खरे तर हीच पद्धत सर्वच ठिकाणी वापरली पाहिजे; अगदी बँका, सरकारी कचेऱ्या येथेसुद्धा. यामुळे बेकारीची समस्या सुटण्यास मदत होईल.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व शिक्षण प्रसारासाठी याव्यतिरिक्त आणखी कोणते उपाय सरकारने वापरले पाहिजे  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . व  या निबंधाला शेयर केल्याने  गरीब विद्याथ्याची मदत होईल   व  हा निबंधरूपी हा  सर्वांपर्यंत पोहचवण्यात मदत  करा.  धन्‍यवाद

महत्‍वाचे मुद्दे : 

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • शिक्षणाचे महत्त्व
  • उच्च शिक्षण, धंदेशिक्षण आवश्यक
  • स्वतः धनप्राप्ती करून शिक्षण घेणे
  • पाश्चात्त्य देशात स्वावलंबी विदयार्थी 
  • कर्मवीर भाऊराव पाटील यांची योजना
  • प्राचीन काळी गुरुगृही सेवा करून शिक्षण
  • नंतर धनिकांच्या आश्रयाने शिक्षण
  • कष्ट करण्यात संकोच नसावा
  • कष्ट करून शिक्षण घेणाऱ्यालाच ज्ञानाची व धनाची किंमत कळते.