माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध | my first day in college essay in marathi

माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध | my first day in college essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध बघणार आहोत.  कुठल्याही  गोष्टीची सुरुवात करताना  ती कठीण जाणवत असते हीच स्थिती कॉलेजच्या पहिल्या दिवशी होत असते.  दहावी संपल्यानंतर अकरावीत जाताना मनात अनेक प्रश्न असतात. मन गोंधळलेले असते. पण या प्रश्नांची उत्तरे आपले गुरुजन देत असतात अश्या या मार्गदर्शक गुरुजींना अभिवादन  करूया आणि सुरुवात करूया निबंधाला.


प्राथमिक शाळेतून मी माध्यमिक शाळेत गेलो. आणि काय झाले कोण जाणे! मला शाळा आवडू लागली. म्हणजेच शाळेचा अभ्यास मला खूप प्रिय झाला. झपाटल्याप्रमाणे मी अभ्यास आणि अभ्यासेतर कार्यक्रमात बुडून गेलो. त्यामुळेच ती मंतरलेली सहा वर्षे कशी, केव्हा संपली, ते कळलेच नाही. दहावीचे वर्ष संपताना मीही पुढील शिक्षणाचे बेत आखत होतो. 


दहा वर्षे शिक्षण घेऊन आज अकरावीत जाताना छातीत धडधडत होते. कारण महाविदयालयातील नवीन वातावरण! त्या वातावरणात मी घाबरलो  होतो ; पण उसने अवसान आणून धिटाई दाखवत होतो. सूचनाफलकांपाशी विदयार्थ्यांनी खूप गर्दी केली होती. पण त्या गर्दीत घुसून आम्हांला आमची तुकडी आणि वर्ग-खोली कोणती हे पाहावेच लागले. गंमत म्हणून महाविदयालयात फेरफटका मारला. आमचा वर्ग पाहून आम्ही आश्चर्यात पडलो.पंखे, दिवे, फळा, प्राध्यापकांसाठी छोटेसे व्यासपीठ होते. ती सारी व्यवस्था पाहून मला अतिशय आनंद झाला. आता आम्हाला आमच्यासारखेच गोंधळलेले दोन-तीन मित्र  भेटले. मग आम्ही संपूर्ण महाविदयालय भटकलो. प्रयोगशाळा पाहून थक्क झालो. ती भव्य प्रयोगशाळा पाहून मला स्वत:लाच शास्त्रज्ञ बनल्यासारखे वाटले.


 जिमखाना पाहून झाल्यावर मी कॅन्टीनला भेट दिली. कॅन्टीनमधील ते उत्साही वातावरण पाहून मी हरखूणच  गेलो . पण सगळ्यांत माझ्या मनात ठसले ते महाविदयालयातील ग्रंथालय! त्या भव्य ग्रंथालयातील पुस्तकांनी गच्च भरलेल्या कपाटांवर माझी नजर खिळली. जणू कपाटातील पुस्तके मला खुणावत होती आणि मग मनातल्या मनात मी त्यांना वचन दिले, 'पुस्तकांनो, यापुढे तुमची आमची मैत्री. अगदी खास मैत्री.' 


प्राचार्यांच्या स्वागत-व्याख्यानाची वेळ झाली, म्हणून आम्ही घाईघाईने महाविदयालयाच्या सभागृहाकडे वळलो. तो हॉल गच्च भरला होता. पण गेल्यागेल्या मला धक्काच बसला. फळ्यावर काही नावे लिहिली होती आणि त्यांत माझे नाव होते. ९० टक्के वा जास्त गुण मिळवणाऱ्या विदयार्थ्यांसाठी पहिल्याच रांगेत काही बेंच राखून ठेवले होते. मी माझ्या  मित्रांना  सोडून त्यांपैकी एका खुर्चीवर  बसलो. विशेष आनंदाने माझे मन उचंबळत होते आणि भीतीने पाय लटलटत होते.


प्राचार्य व प्राध्यापक आल्यावर सर्व सभागृह शांत झाले. अगदी मोजक्याच शब्दांत प्राचार्यांनी सर्व विदयार्थ्यांचे स्वागत केले आणि गोड शब्दांत विदयार्थ्यांना त्यांच्या कर्तव्यांची व हक्कांची जाणीव करून दिली. नंतर प्राचार्यांनी ९० टक्के व त्याहून अधिक गुण मिळालेल्या विदयार्थ्यांचा सत्कार केला. मला पहिल्या वर्षाची सर्व पुस्तके बक्षीस मिळाली होती. 


कार्यक्रम संपल्यावर महाविदयालयाच्या मैदानातून मी मित्रांबरोबर  घरी निघालो. तेव्हा मनात होते की 'शाळेसारखीच या महाविदयालयाशी माझी गट्टी होणार !' असा हा महाविदयालयातील पहिला दिवस मी कधीच विसरणार नाही.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


महत्‍वाचे मुद्दे : 

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

 • शालान्त परीक्षेचा निकाल
 • महाविदयालयीन जीवनाचे आकर्षण
 • वेगळ्या वातावरणाची अपेक्षा
 • प्रवेशासंबंधी सूचनांच्या फळ्याजवळील गर्दी
 • प्रवेशमुले-मुली-पोशाखांतील
 • भाषेतील विविधता
 • बावरलेले मन
 • प्राचार्यांचे प्रारंभिक भाषण
 • त्यांचे मार्गदर्शन
 •  नवीन मैत्री-मित्रांसह ग्रंथालय
 •  प्रयोगशाळा, जिमखाना इत्यादी विविध विभागांना भेटी
 • कॅन्टीनची फेरी
 • नव्या जीवनाची सुखावहता
 • नव्या स्वप्नांची, ध्येयाची चाहूल.

1 टिप्पणी: