पिंजऱ्यातील पोपटाचे आत्मवृत्त मनोगत | popatache manogat in marathi essay

पिंजऱ्यातील पोपटाचे आत्मवृत्त मनोगत | popatache manogat in marathi essay

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पिंजऱ्यातील पोपटाचे आत्मवृत्त मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. गेल्या हिवाळ्यातली गोष्ट आम्ही हैद्राबाद येथे पशु - पक्षी संग्रहालय बघायला गेलो होतो. मला पक्षी - निरीक्षण फार आवडते . एक एक पक्षी न्याहळत मी पुढे पुढे सरकत होतो. एका पिंजऱ्यात एक खूप सुंदर पोपट होता. मी त्याला 'मिठू ऽ ऽ मिठू' हाक मारली उत्तर म्हणून तोही ‘‘मिठू S S ' म्हणेल अशा प्रतीक्षेत असतांनाच अचानक तो बोलू लागला,

"हरवले गगन, हरवली स्वच्छंद भरारी

नको सोन्याचा पिंजरा सोडूनि द्या, मज बोलाविती मुक्तदिशा चारी..."

“मित्रा काय करू रे अशा जगण्याला? गोड फळे , हिरवी मिरची सार खायला मिळतं पण स्वातंत्र्याचे वारे नाही , पायात गुलामीच्या शृंखला , काय करू? सारे येतात , गोड गोड बोलतात . माझं मोहक रूप बघून आनंदित होतात . पण माझी व्यथा तुमच्या नजरेस पडत नाही. माझ्या पिंजऱ्याचे दार उघडून मला स्वच्छंद आकाशात कोणीही नाही. 


मी पराधीन झालो आहे. चाकोरीबध्द या पिंजऱ्यात मी तडफडतो आहे . मुक्त गगन , स्वच्छंद भरारी , मनसोक्त झाडावरचे झोके , मित्रांची मैफिल , सायंकाळचे थव्यासह आकाशातला विहार...... मला खूप आठवतं हे सारं...''


मला माझे ते आनंदी क्षण आठवतात . निसर्गाच्या कुशीत मी जन्मलो, वाढलो. सूर्य-चंद्राच्या किरणात बागडलो. वृक्ष , लता, वेली , चांदणे, झरे यांच्या अंगा-खांदयावर खेळलो. त्याच्या सहवासातले ते आनंदी क्षण का लुप्त झालेत? उंच टेकड्या, मोठे पर्वत , दाट वनराई , निळेशार आकाश, हिरवीगार धरती अशा पार्श्वभूमीवर मुक्तपणे पंखानी भरारी घेत मी विहरत होतो. 


माझ्या मित्रांच्या संगतीने आकाशातला गवसणी घालत होतो. फळांचा येथेच्छ आस्वाद घेत होतो. ती तांबुस संध्याकाळ , तो सूर्यास्त , मंदावलेले झोके, घरट्याकडे परतणारे इतर पक्षी, त्यांचा किलबिलाट हे सारं इथ दिसत नाही. माझं 'मी' पण हरवल म्हणून मी आक्रोश करतो.


"३१ मे तुम्ही जागतिक पोपटदिन म्हणून साजरा करता. ब्रिटनमध्ये पोपटांसाठी विश्वस्त संस्था स्थापन होणार आहे. पोपटांचे जीवनमान सुधारण्याचा हा प्रयत्न पाहून मन सुखावते, पण प्रत्येक पक्षी मुक्त हवा. बंदी नको. माझ्या मित्रांची गगनातली सोबत मला हवी आहे."


माझे सोबती मला भेटतील का? मला मुक्त करणारे कोणी भेटेल का? येथे बरेच जण येतात, प्रेमाने न्याहाळतात , मला खायला देतात. पण माझ्या मनाची भूक भागत नाही. मला बंधनातून मुक्त कोणीच करीत नाही. फासेपारध्याने ज्या दिवशी मला पकडले तो दुर्दिन माझ्या आयुष्यात उगवलाच नसता तर किती बरे झाले असते! गुलामीसारखे दुर्भाग्य नाही! 


मित्रा, माझं मन रडतं रे! पंख असूनही पंख छाटलेला पक्ष्याचा करूण टाहों माझ्या अंतरंगात खळबळत आहे. मित्रा, तुला जर एक खोलीत बंद ठेवले कुणी तर? कल्पनाच सहन होत नाही ना! मग माझे काय हाल असतील? खरा स्वातंत्र्याचा उपासक कुणाला बंदिस्त ठेवूच शकत नाही. असा स्वातंत्र्याचा पुजारी माझ्या दुनियेत कधी बरे अवतरेल? माझ्या मोहक रूपातल्या खिन्न डोळ्यांचा विसर तुम्हाला का पडतो? 


माझी उदासीनता तुम्हाला बोचत कशी नाही? चिरंतन नावीन्य मला आवडते . येथे तर नवीनता नाहीच मुळी! माझ्या नशिबाने माझी थट्टा केली आहे. इथे सगळे ऋतू सारखेच झाले आहेत.''

तो पुढे म्हणला, “मी प्रतिक्षेत आहे मुक्ततेच्या ..... स्वातंत्र्याच्या पहाटेची मी वाट बघत आहे.''

बोलण्याचा आवाज बंद झाला. मी भानावर आलो. पोपट गप्प गप्प झाला होता. त्याचे डोळे बोलत होते. नकळत माझा हात पिंजऱ्याचे दार उघडण्यासाठी पुढे सरसावला........

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत