बेरोजगारी, बेकारीची भीषण समस्या मराठी निबंध

बेरोजगारी, बेकारीची भीषण समस्या मराठी निबंध

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण बेरोजगारी, बेकारीची भीषण समस्या मराठी निबंध बघणार आहोत.या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. आपला आधुनिक भारत अनेक समस्यांशी झुंजत आहे. त्यापैकीच एक बेरोजगारीची समस्या आहे. राष्ट्रनिर्मिती व विकासामध्ये तरुण पिढीची महत्त्वाची भूमिका आहे. जर तरुणांना त्यांच्या क्षमतेनुसार रोजगार न मिळाला तर एकूणच राष्ट्राची प्रगती मंदावते.


बेकारीचा संबंध मागणी आणि पुरवठ्याच्या असंतुलनात आहे. ही आपल्या आधुनिक समाजाची एक निर्मिती आहे. प्राचीन भारतात अशा प्रकारच्या समस्यांची उदाहरणे सापडत नाहीत. कारण त्यावेळी वर्णव्यवस्था अस्तित्वात असल्यामुळे जो तो आपल्या वर्णानुसार पंरपरांगत काम करीत असे. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्नच निर्माण होत नसे. 


परंतु आता शिक्षणाच्या प्रसारामुळे व वर्णव्यवस्था अस्तित्वात नसल्यामुळे पैतृक व्यवसायाकडे तिरस्काराच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. पुत्र आपल्या पित्याचा व्यवसाय करण्यास तयार होत नाही. पण अशा प्रकारे सर्वांनाच दुसऱ्या प्रकारचा व्यवसाय मिळणे सोपे राहिलेली नाही.


इंग्रजांच्या आगमनानंतर भारतात बेरोजगारीची समस्या सुरू झाली. भारताचे वैभव पाहून इंग्रजांचे डोळे दिपले. त्यांच्याबरोबरच डच, फ्रेंच, पोर्तुगीज, स्पॅनिश लोकही आले होते. इतर फिरंगी निघून गेले पण इंग्रज मात्र इथेच पाय रोवून बसले. आपल्या राजवटीत इंग्रजांनी भारताची मुळे खिळखिळी करून टाकली. भारतातून सर्व कच्चा माल इंग्लंडला पाठविला आणि तिकडून पक्का माल आणून भारतीय बाजारपेठेत विकला. परिणामी भारतीय उद्योगधंदे नष्ट झाले. 


अनेक भारतीय कारागीर बेकार झाले. जे शिक्षण लॉर्ड मेकॉलने भारतात सुरू केले त्यामुळे फक्त कारकूनच निर्माण झाले. कारण त्यात व्यावसायिक शिक्षणाचा अंतर्भाव नव्हता. हाताने काम करण्यात भारतीयांना अपमान वाटत होता. त्यामुळे बेरोजगारी हा कधीही न सुटणारा प्रश्न उभा राहिला. 


भारतात कोट्यावधी तरुण तरुणांनी रोजगार कार्यालयात आपली नावे नोंदवून ठेवली आहेत. त्यांच्यापैकी कित्येक जण खाजगी व्यवसायात कार्यरत आहेत. तरी त्यांना सरकारी नोकरीची आशा आहे. अनेक बेकारांनी आपले नावही रोजगार कार्यालयात नोंदविलेले नाही. त्यामुळे भारतातील बेरोजगारांची नक्की संख्या उपलब्ध होऊ शकत नाही.


वेगवेगळ्या प्रकारची बेरोजगारी दिसून येते. १) शिक्षित/प्रशिक्षित असूनही बेकार, २) अशिक्षित आणि अर्धशिक्षित बेकार, ३) वर्षातून काही महिनेच काम मिळणारे बेकार ही बेकारी ग्रामीण भागात दिसून येते. खेड्यात शेतकरी ६ महिने बेकार असतो. खेड्यामधील लघु व कुटिरोद्योग बंद पडले आहेत. त्यामळे बेकारी वाढली आहे. चौथा प्रकार असंतुष्ट बेकारांचा आहे. ज्यांना काम मिळते पण ते त्यांच्या योग्यतेप्रमाणे नसते.


बेकारीचे मूळ कारण वेगाने वाढणारी लोकसंख्या आहे. या वाढत्या लोकसंख्येसाठी नव्या रोजगाराची सोय करणे. भारतासारख्या गरीब देशाच्या सामर्थ्याबाहेरचे आहे. आपली शिक्षणपद्धतीही बेकारीला तितकीच जबाबदार आहे. या पद्धतीमुळे कारकून मिळाले पण कर्णधार मिळाले नाहीत. ग्रामीण जनता शहराच्या मोहात पडून आपली कामे सोडून शहरात वास्तव्यास येते. भारतात येणारे घुसखोर, यांत्रिकीकरण, प्रशासनाचा गलथानपणा ही पण बेकारीची कारणे आहेत.


बेकारी आपल्या देशाला वाळवीप्रमाणे गिळंकृत करीत आहे. या समस्येमुळे बेशिस्त, भ्रष्टाचार, अराजकता, दहशतवाद इ. उत्पन्न होत आहेत. 'रिकामे डोके सैतानाचे घर' या म्हणीप्रमाणे एक बेकार व्यक्ती स्वत:चा आत्मविश्वास तर गमावतेच त्याबरोबरच कुंटुब आणि समाजावर पण ओझे बनून राहते. त्याच्या मनात सर्वांबद्दल विद्रोहाची भावना निर्माण होते. व ती समाज व देशविरोधी कार्याला लागू शकते, व्यसनाधीन होऊ शकते, बेकार तरुण वर्गाचा स्वार्थी नेत्यांद्वारे वापर होतो.


दहशतवादी कारवायाही त्यांच्याकडून करवून घेतल्या जातात. बेकारीची समस्या सोडविण्यासाठी भारत सरकारने व्यावसायिक शिक्षण,लोकसंख्येवर नियंत्रण, कुटुंबनियोजनाचा प्रचार, कुटिर उद्योगांना प्रोत्साहन, बेकारी निवारण योजना इ. कार्यक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. बँकांमार्फत उद्योग-व्यवसायासाठी कर्जे, आर्थिक उदारीकरणाची नीती अवलंबिल्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. 


भारत सरकारच्या अथक प्रयत्नानंतरसुद्धा ही समस्या सुटलेली नाही. त्यासाठी जनतेचेच मनोपरिवर्तन करावे लागेल. शिक्षणाचा उद्देश केवळ नोकरी मिळविणे हा न राहता बौद्धिक विकास हा असला पाहिजे. एका पातळीपर्यंत बौद्धिक विकास झाल्यावर त्यानुसार रोजगार शोधला पाहिजे. लोकांना श्रमाचे महत्त्व कळाले पाहिजे. परिश्रमाने अन्न खाण्यात जो आनंद आहे तो इतर कशात नाही. खोटा स्वाभिमान सोडून वास्तवात जगावे. 


शहराकडे धावू नये. श्रमिकांच्या अधिकारांचे रक्षण करावे. संप, टाळेबंदीवर नियंत्रण ठेवावे. मजूर संघटनेने यासाठी तयार असावे.एकापेक्षा एक चांगली ध्येये, उद्दिष्टे जनतेसमोर ठेवावीत. ज्यामुळे जनतेला उत्साह वाटेल. जर आपण आपल्या क्षमतेचा उपयोग समजून उमजून केला तर आपला देश एक महाशक्ती बनेल.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 2

बेरोजगारी, बेकारीची भीषण समस्या मराठी निबंध

“या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे" या ओळी खोट्या वाटू लागतात जेव्हा वर्तमानपत्रात आपल्या वाचनात येते की, या जीवनास वैतागून, त्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी तरुण बेरोजगारांनी आत्महत्या केल्या ! क्षणभर वाटते की, जीवन म्हणजे कडू औषधाचा घोटच आहे ! सर्व राष्ट्रांना त्यातील एक भारताला भेडसावणारा ज्वलंत प्रश्न -बेरोजगारी हा आहे.


बेरोजगारी म्हणजे अशी स्थिती की, इच्छा असूनही, क्षमता असूनही काम न मिळणे रोजगारापासून वंचित असलेली व्यक्ती बेरोजगार म्हणवली जाते. देशाच्या राजकारणात कितीही सत्तांतरे घडली तरी ही वाढल्या संख्येबरोबर ही समस्या आ वासून उभीच आहे. 


सुशिक्षित बेरोजगार तरुण वर्ग अर्जावर अर्ज खरडत असतो तरीही नकारघंटा वाजायची बंद होत नाही. त्याचे मन आनंदून म्हणत असते,भारत हा कृषिप्रधान देश आहे. परंतु देशातील बहुतांश शेती निसर्गावर अवलंबून आहे. चांगला पाऊस पडला तरच उत्पन्न चांगले मिळते तसेच शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा कमी अवलंब आहे.


पारंपरिक पद्धतीनेच शेती केली जाते त्यामुळे नोकरीसाठी शहरामध्ये या ग्रामीण भागांतून बऱ्याच लोकांचे स्थलांतर होत आहे. कृषीमधील मागासलेपणा, लघू व कुटीरोद्योगांचा न्हास, औद्योगिक विकासाची मंदगती, लोकसंख्येचा भस्मासुर शिक्षणातील दोष, हे बेरोजगारीस कारणीभूत घटक, भारताच्या दृष्टीने आहेत. 


खाजगीकरण व जागतिकीकरण यांची लाट आली असल्याने सार्वजनिक उद्योग व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहेत त्यातूनही बेकारांत भर पडत आहे. तसेच वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविल्या जाऊ शकत नाही त्यास आळा बसणे अत्यावश्यक आहे. 


अन्यथा जशी लोकसंख्या वाढेल, तशी बेकारांची संख्या वाढेल.महागड्या शिक्षणामुळेदेखील पात्रता असणाऱ्या तरुणांना त्यापासून मुकावे लागते नो व्हेकन्सी, भ्रष्टाचार, वशिलेबाजी आरक्षण यांस तोंड द्यावे लागते, नोकरीची हमी देणारा अभ्यासक्रम निवडावा तर डोनेशन, धंदा करावा तर त्यासाद भांडवल, असे कितीतरी अडथळे असतात,म्हणूनच म्हटले जाते. 


'सर्वे गुणा : कांचनम् आश्रयन्ते' तसेच भारताताल शिक्षणपद्धतीही तितकीच जबाबदार आहे. ज्ञानावर आधारित शिक्षण दिले जाते, व्यायसायधिष्ठि शिक्षण असावे की ज्याचा जीवनात उपयोग होईल बेरोजगारीचे अनिष्ट परिणाम सर्व समाजावर होत असतात 'Empty mind is devil's workshop' या उक्तीप्रमाण अशा व्यक्ती वाईट मार्गाला सहज आपलेसे करतात. 


त्यामुळे गुन्हेगारी, वाईट व्यसन, अनैतिक व्यवसाय यांची मुळे खोलवर रुजू लागतात, राष्ट्राचा आर्थिक विकास खुंटतो या बेरोजगारीतून निर्माण होते. व्यसनाधीनता वृत्ती, व्यसने दिवसेंदिवस अधोगतीकडे घेऊन जातात. काही ठिकाणी या वैफल्यग्रस्त तरुणांना आर्थिक मदतीचे आमिष दाखवितात. 


हे तरुण अशा संघटनांकडे आकर्षित होतात व हातात बंदूक घेतात. तसेच कमी प्रतीच्या बेरोजगारीमुळे भारतास ब्रेनडूनच्या समस्येस तोंड द्यावे लागत आहे. कारण अनेक तरुण शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ आपल्या योग्यतेचे काम येथे मिळत नाही म्हणून परदेशी जातात व तेथेच स्थायिक होतात.


बेरोजगाराची समस्या दूर करण्यासाठी सरकार दरबारी विविध स्वरूपाचे प्रयत्न होत आहेत. सध्याची ग्रामीण रोजगार हमी योजना ज्यामध्ये प्रतिदिनी ६० रु. वेतन व वर्षातील किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध करून देणे हे आहे.


परंतु बेरोजगारीचा प्रश्न मुळात सर्वांसाठी शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात आहे, ही काळाची गरज आहे. व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याचा सरकार प्रयत्न करतच आहे. परंतु त्यातून खाजगी महाविद्यालयांची संख्या वाढल्याने अकुशल लोकांचा लोंढाच बाहेर पडत आहे.


सध्याचे युग माहिती तंत्रज्ञानाचे आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे कोणत्याही देशास महाग पडणार आहे. संगणक शिक्षण सर्वांना सक्तीचे केले पाहिजे. केपीओ, बीपीओच्या माध्यमातून तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला आहे. माहितीतंत्रज्ञानाचे युग तरुणांना हाच इशारा देत आहे की,

'कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला.'


शेतीच्या क्षेत्रात आधुनिक पद्धतीचा वापर, हरितगृह, नवीन अवजारांचा वापर, पाण्याचा पर्याप्त वापर करून शेतीचे उत्पादन वाढविता येईल जेणे करून तेथील बेरोजगारांचे शहरांकडे होणारा स्थलांतर थांबेल. तसेच देशातील नद्या जोडण्याची अमृत क्रांती योजना आत्ता नकोत तर निश्चित दूरगामी व भरीव असा कार्यक्रम सरकारने आखला पाहिजे. 


त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती व प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळे आपण अशी अपेक्षा करू या की वाढत्या लोकसंख्येस आळा बसून बेरोजगारीची समस्या काही प्रमाणात कमी होईल - 'रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषःकाल'."कधी संपायची वाट? कधी लाभेल विसावा ?


तुला एकट्याला ठावे, आकाशातल्या रे देवा" दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या वाढत आहे. सातवी पंचवार्षिक योजना यात मुख्य भर उत्पादक रोजगार निर्मितीवर होता. बेकारी हटाओ ही घोषणा दिली गेली.


 तसेच नव्या योजना काळात प्रतिवर्षी ७ टक्के दराने रोजगारनिर्मितीत वृद्धी घडवून आणणे उद्दिष्ट होते परंतु तसे घडलेच नाही. यास अनेक कारणे आहेत केवळ सरकारला केंद्रस्थानी ठेवून त्यावर आरोपांचा भडिमार करणे योग्य नाही.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद