एकविसाव्या शतकातील मराठीसंबंधी आमच्या अपेक्षा मराठी निबंध

 एकविसाव्या शतकातील मराठीसंबंधी आमच्या अपेक्षा मराठी निबंध

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  एकविसाव्या शतकातील मराठीसंबंधी आमच्या अपेक्षा  मराठी निबंध बघणार आहोत.  

माय मराठीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावा असा तो मंगल  दिवस. १ मे १९६६ . याच कृतार्थ दिनी तिला ‘राज्यभाषा' म्हणून राज्याभिषेक झाला. ते देवदुर्लभ दृश्य पाहून सह्याद्रीचे मस्तक अभिमानाने अधिकच उन्नत झाले. 

गोदा, कृष्णा, भीमा महाराष्ट्राच्या या कुलदेवतेवर अभिषेक करण्यास आतुर झाल्या. रायगड, शिवनेरीच्या डोळ्यात आनंदाणूंनी दाटी केली. आळंदी, चाफळ, देहू, तुळजापूर येथून शुभाशीर्वादाचे संदेश येऊन थडकले. महाराष्ट्रभू रोमांचित झाली. वारा पुलकित झाला मराठी माणसांच्या डोळ्याचे पारणे फिटले. 


स्वातंत्र्यपूर्व काळात झालेली तिची हेळसांड, तिला मिळणारी सावत्रपणाची वागणूक, महाराष्ट्रातील जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिली होती. आता हिच्या अंगावरची लक्तरं जाऊन त्या जागी भरजरी वस्त्रं येतील अशी सोनेरी स्वप्नं ती पाहू लागली. पण ती धुळीला मिळाली. पहिल्या जागतिक परिषदेत कविवर्य कुसुमाग्रजांनी ‘सध्या मराठीच्या डोक्यावर सोन्याचा मुकूट असला तरी तिच्या अंगावर फाटकी वस्त्रे आहेत,' या शब्दात अंतरीचे शल्य जगजाहीर केले.

आज स्वातंत्र्य मिळून अर्धशतक लोटले. आम्ही ‘हिला बैसवू वैभवाच्या शिरी ही प्रतिज्ञा खरी करून दाखविणार आहोत का? मायबोलीच्या जीर्णोद्धाराचं व्रत स्वीकारायचं असेल तर त्या संदर्भात काही अपेक्षांची पूर्ती करणे क्रमप्राप्त आहे. स्वभाषेबद्दलचं प्रेम - आई अशिक्षित, कुरुप, रागीट, कशीही असो, बालकाला तिचाच लळा असतो. 


आमची मायबोली तर उज्ज्वल परंपरेचा वारसा घेऊन आलेली, अमृतातेही पैजा जिंकणारी, रसांचे जीवन. तिच्याबद्दल अंतरंगात प्रेम असायला हवं हे काय सांगायला हवं? 'स्वधर्म, स्वदेश, स्वभाषा याबाबत तडजोड नसावी' या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मोलाचा संदेश सदैव स्मरणात असावा.

मातृभाषेचा अभिमान - पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी जाऊन आम्ही स्वत्व गमावून बसलो, स्वाभिमानाला सोडचिट्टी दिली. इंग्रजीने मातृभाषेची जागा घेतली. हा गमावलेला स्वाभिमान आम्ही केव्हा प्राप्त करणार, यावर केवळ मायबोलीचंच नव्हे मायभूमीचंही भवितव्य अवलंबून आहे. एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्याला 'मी मातृभाषेतून शिकतो' याचा अभिमान वाटायला हवा. दैनंदिन व्यवहार मातृभाषेतच करण्याबाबत आपला कटाक्ष असावा. उदा. कोणी आपलं काम केलं तर ‘धन्यवाद' परिचित व्यक्ती भेटली तर 'नमस्कार' म्हणून तिचा परामर्ष घ्यावा.

भाषा शिक्षकासमोरील आव्हान - सध्या समाजातील तळागाळातील मुलेमुली शिक्षण घेत आहेत, भाषाशिक्षकाला हे आव्हान पेलावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावणं, भाषेबद्दल त्यांच्या मनात आत्मीयता निर्माण करणं, त्यांना वाचनाबाबत मार्गदर्शन करणं शिक्षकाचं कर्तव्य आहे. मातृभाषा हे शिक्षणाचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे' हे विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या गळी उतरवावं. जपान, इस्त्राईल सारख्या चिमुकल्या राष्ट्रांमधून राष्ट्रभाषेतून शिक्षण घेण्याची व्यवस्था होऊ शकते आम्हाला हे का जमू नये? या प्रश्नाकडे शासनाचेही लक्ष वेधायला हवे.

धर्मभाषा - संतांनी धर्मग्रंथांची रचना करून तिला ‘धर्मभाषा' बनविले.  ग्रंथांचे श्रवण, वाचना, मनन, जतन व्हायला हवे.


मातृभाषेचे ऋण - ‘आत्माविष्कार' ही मानवाची मूलभूत गरज. ती भागविण्याचे काम मातृभाषा करते. तिच्या माध्यामातून बालकाचा सर्वांगीण विकास होतो. 


साहित्यसंमेलने - साहित्यसंमेलन एक 'कुळाचार' म्हणून साजरे होऊ नये. त्याद्वारे समाजाला, साहित्यिकांना दिशा मिळावी. काहीतरी ठोस, भरीव कार्य साधले जावे. निवोदित साहित्यकांनी भरमसाट, दर्जाहीन साहित्यापेक्षा मोजके, दर्जेदार, लेखन करावे. भरकटलेल्या जनतेला दिशादिग्दर्शन करण्यांच निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचं काम साहित्याद्वारे व्हायला हवं.''


 दयाघन प्रभूजवळ मागणे मागू या, आकल्प आयुष्य, माय मराठीला ! दिसावा सोहळा, आनंदाचा ।। उपेक्षा न व्हावी, ओठात असावी । हृदयी ठसावी, पुत्रांचिया ।। अवतरो पुन्हा, ज्ञानदेव, तुका । नामदेव एका, रामदास....॥ । जय महाराष्ट्र, जय मराठी ।

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत