पावसाळा निबंध मराठी

पावसाळा निबंध मराठी

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पावसाळा निबंध मराठी बघणार आहोत. पावसाळा येतो नि ग्रीष्माचा उन्मत्तपणा नाहीसा होतो. पावसाळ्याची कितीतरी रूपे. रिमझिम पडणारा पाऊस, मुसळधार पाऊस, धो-धो कोसळणारा पाऊस, पावसाची रिपरिप, पावसाची भुरभूर, आषाढातील पाऊस, मल्हार आळवताच त्याच्या सुरात नाचणारा पाऊस, 


कवीच्या शब्दांना धार देणारा, ताल देणारा, थेंबाथेंबातून उसळणारा, शब्दाशब्दातून व्यक्त होणारा, हिरव्या रानावनातून सुगंधाचे गीत बरसणारा, धरणीची तृष्णा शमवणारा, सृष्टीला नटवणारा, पाना-पानांतून, फुला-फुलांतून सुवासाची बरसात करणारा, मृगाच्या तृषार्त धारांनी भिजवून टाकणारा, असा हा पाऊस.

पावसाळ्यातील निसर्ग म्हणजे टवटवीत, सुंदर! मृद्गंध दरवळतो, तृणाची पाती धरतीच्या कुशीतून वर येतात, तेव्हा शब्द उमटतात -

“पहिल्या वहिल्या तृणपात्याचा आज असे सत्कार."


 हिरवी माया पाहून चित्तवृत्ती खुलतात, कडे-कपारी चिंब भिजून जातात. कातर आभाळमाया चिंब भिजून जाते, मेघदूताची वेडी आठवण काढत यक्ष जागा होतो आणि पुंगरांचे छुमछुमते चाळ बांधून पाऊस नाचू लागतो. पावसामुळे सारी सृष्टी ओलीचिंब होते. 


पाना-पानांवर मोत्यासारखे चमकणारे टपोरे थेंब, जलधारांत सचैल न्हाणारे रस्ते, सप्तरंगांचा पिसारा फुलवून थुई-थुई नाचणारे मोर, तृप्त होणारा चातक पक्षी, तृणांकुरांचा हुंकार, कडाडणाऱ्या विजा, सारा निसर्ग कसा जिवंत होतो ! सरीवरून सरी कोसळतात, तेव्हा सारी सृष्टी डोलू लागते. 


___________________________

हे निबंध पण वाचा 

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध 

पावसाळयावर  मराठी निबंध

पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध

___________________________

नाले, ओहोळ, निर्झर सर्वचजण कडे-कपारींतून धुंद होऊन उड्या घेतात. गवताची पातीसुद्धा उल्हासाने डुलतात. हिरव्या डहाळीत बसून मैना राघूसमवेत आनंदगाणी गाते. कोकिळेचाही सूर त्यात कधी मिसळतो, कळतही नाही. भ्रमर अमृताचा स्वाद घेण्यासाठी भ्रमंती सुरू करतात.


साऱ्या सृष्टीला चैतन्य प्राप्त होते. सगळीकडे हिरवेगार दिसते. हे पाचूचे वैभव पाहून डोळे तृप्त होतात. कधी-कधी अंधारून येते, काळेकुट्ट मेघ आकाशात गर्दी करतात; पण त्यांतून लखकन् चमकून जाणारी विजेची रेघ डोळ्यांचे पारणे फेडतात. ढगांचे भरून येणे, हीसुद्धा निसर्गाचीच किमया. 


कधी चित्तवृत्ती उल्हसित करणारा, कधी मनाला हुरहुर लावणारा, कधी भीती दाखवणारा निसर्ग फक्त पावसाळ्यातच पाहायला मिळतो.

निसर्गराजा, खरेच तुझी किमया वर्णन करायला आमच्यापाशी शब्द थिटे आहेत. तू खरोखरच थोर आहेस.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद




निबंध  2

पाऊस निबंध मराठी लेखन

पावसाळा (वर्षा ऋतू) जगात सर्वात जास्त ऋतूंची बहार भारतात पाहावयास मिळते. ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, वसंत हे ऋतू दोन दोन महिन्यांनी येतात. ऋतूंचे परिवर्तन जीवनासाठी आवश्यक असते. त्याखेरीज जीवन नीरस होईल. हा प्रत्येक ऋतू पृथ्वीला एक अमूल्य उपहार देऊन जातो. जुलै ते सप्टेंबर हे वर्षाऋतूचे महिने असतात. ग्रीष्मातील प्रखर उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते व हीच वाफ थंड झाल्यावर पाऊस पडतो. पावसाळा हा अतिशय महत्त्वाचा ऋतू आहे.



भारत कृषिप्रधान देश आहे. येथील शेती पावसावर अवलंबून आहे. म्हणून शेतकरी आकाशाकड़े नजर लावून पावसाची वाट पाहत बसतो. पाऊस पडताच पिके तरारून उठतात. फुलझाडांना बहर येतो. फुलांचा सुगंध आसमंतात दरवळतो. नदी नाल्यांना पूर येतो. हेच पाणी मग वर्षभर सिंचनाच्या कामी येते. पाण्याचा साठा जास्त असल्यास जलविद्युत निर्मिती करता येते.


पावसात भिजून लहान मोठे सारेच प्रसन्न होतात. लोक बाहेर जाताना पावसाळी कपडे, छत्री, वापरतात. परंतु पावसाळ्यात अस्वच्छतेमुळे रोगराई वाढलेली दिसते.वर्षा ऋतूत हत्ती मस्त होतात. मोर पिसारा फुलवून नर्तन करतात. शेतात, तलावांत बेड़क डराँव डराँव करतात, आकाशात दिसणारे विविध रंग पाहून आपण आनंदित होतो. 


वर्षा ऋतूतील आल्हादायक वातावरणामुळे लेखक कवींची उर्मी जागृत होते. कलावंतांना कलानिर्मितीची प्रेरणा मिळते. पाऊस पडला नाही तर सर्वत्र हा हा:कार माजेल, दुष्काळ पडेल, शेती पिकणार नाही व भाज्या, धान्य मिळणार नाही, जीवनच धोक्यात येईल. म्हणून वर्षाऋतूचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद