रम्य ते बालपण मराठी निबंध

रम्य ते बालपण मराठी निबंध

महत्‍वाचे मुद्दे : 

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  1. माणसाकडे जी गोष्ट नसते, तीच त्याला हवीहवीशी वाटते-
  2.  उदा., लहान मुलांना आपण मोठे व्हावे असे वाटते आणि मोठ्या माणसांना बालपण संपल्याबद्दलचे दुःख होते
  3. खरोखरच बालपण हे अत्यंत निरागस, मोह-माया, राग, लोभ इत्यादींपासून दूर
  4. स्वच्छंद जीवन
  5. मातापित्याच्या प्रेमळ छत्राखाली निश्चित
  6. लहान मुलांचे लहानपणी लाड, मोठेपणी जबाबदारीची जाणीव
  7. कितीही अश्रू ढाळले तरी कालचक्र उलटे फिरू शकत नाही

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण रम्य ते बालपण  मराठी निबंध बघणार आहोत.  माणसाकडे जी गोष्ट नसते, नेमकी तीच त्याला हवीहवीशी वाटते. मुलांना आपण मोठे व्हावे असे वाटते; पण मोठी माणसे मात्र 'बालपणीचा काळ सुखाचा' असेच म्हणत राहतात.खरेच ! किती निरागस असते बालपण ! 


या जगातील मोह, माया, राग, लोभ, मत्सर, हेवेदावे या सर्वांपासून अगदी दूर दूर! आपल्याच स्वच्छंदी जगात एखादया फुलपाखराप्रमाणे आनंदाने बागडणे हे लहान मुलांचे जीवन ! कसली भीती नाही; कसली चिंता नाही. आईवडलांच्या प्रेमळ छत्राखाली दुःखाची झळ त्यांच्यापर्यंत पोचत नाही. 


सर्वचजण त्यांचे लाड करतात. खाऊ, कपडे, खेळणी आणून देतात. फिरायला घेऊन जातात. ना भूतकाळाचा विचार, ना भविष्यकाळाची चिंता ! केवढी विलक्षण जादू असते या बालपणात ! त्यामुळेच वास्तव जगात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी बालकांच्या जगात सहज शक्य असतात. 


ते भोलानाथाला प्रश्न विचारू शकतात. इसापनीती आणि पंचतंत्रातील प्राणी, पक्षी यांच्याशी मनसोक्त गप्पा मारतात. पऱ्यांशी त्यांची गट्टी जमते. त्यांच्या बागांमध्ये झाडांना फळांऐवजी बॅटी आणि चेंडू लटकतात. त्याचप्रमाणे गोळ्या आणि चॉकलेटच्या बंगल्यात राहण्याचे भाग्यही त्यांनाच मिळते. साऱ्या जगातील घडामोडींविषयीचे कुतूहल त्यांच्या स्वप्नाळू डोळ्यांत साठलेले असते.


मोठमोठ्या नेत्यांनाही बालपणाचे मनस्वी आकर्षण वाटत असावे. म्हणूनच की काय चाचा नेहरू, महात्मा गांधी यांसारख्या थोर व्यक्ती बालकांमध्ये स्वत:चे बालपण औटघटकेसाठी परत मिळवत असाव्यात. 'करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे' असे पूज्य साने गुरुजी म्हणत.


 शाळा-कॉलेजांतील अभ्यासाची सक्तमजुरीची शिक्षा, नोकरीचे ओझे, मोठेपणी माणसावर पडणारी कुटुंबाची जबाबदारी यांमुळे बालपणीच्या कोमल फुलांचे मोठेपणी पार निर्माल्य होऊन जाते. मात्र त्या आकर्षक फुलांचा सुगंध तेवढा आठवणींच्या रूपाने मनात दरवळत राहतो. 


पण असा रम्य व निखळ आनंद देणारा बालपणीचा काळ सर्वांच्याच नशिबात नसतो. काही मुलांना तर बालपणीच मोलमजुरी करणे भाग पडते. मग कुठले लाड, कुठली खेळणी आणि कुठले हट्ट? .


मूल हे देवाघरचे फूल असते. मूल म्हणजे राष्ट्राची संपत्ती. जीवनातल्या सर्वच अवस्था चांगल्या असतात. ती ती अवस्था सुंदर करणे आपल्या हातात असते आणि


त्यासाठी बाल्यातील निरागस आनंदी वृत्ती ही आयुष्यभर जपली, तर जीवनातल्या सर्वच अवस्था सुंदर होतील; म्हणूनच बाल्य हरवले याची खंत करत बसता कामा नये. केशवसुतांच्या शब्दांत सांगायचे तर 'प्रौढत्वी निज शैशवास जपणे' असा बाणा ठेवला, तर आयुष्यातले काव्य कधीच हरवणार नाही.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


रम्य ते बालपण मराठी निबंध 2


“सावळा ग रामचंद्र, करी बोबडे भाषण । त्यासी करिता संवाद, झालो बोबडे आपण ॥"

बोबड्या रामचंद्राशी संवाद करताना फक्त घरदारच बोबडं होतं असं नाही तर वेद पठण करणाऱ्या विप्रांचे मंत्रोच्चारही बोबडे येतात. श्रीरामांच्या बाललीलांचं कौतुक वर्णिताना ग. दि. मां. च्या प्रतिभेला स्फुरलेली कल्पना किती काव्यमय आहे!


थोड्याफार फरकाने सर्वचेच  बालपण असं लोभसवाणं असतं. घरादाराला बोबडं करणारं, वेड लावणारं. कधी ते आकाशातील चंद्रासाठी लडिवाळ हट्ट करतं. आरशातील चंद्र पाहन खदकन हसतंही. लोण्यानी माखलेल्या मखानी "मैं नही माखन खायो." अशी शपथ घेता घेता “मैने ही माखन खायो' असा निष्पाप कबुलीजबाब देऊन टाकतं. अकबरासारख्या बादशहाला ‘पाठीचा घोडा' करायला लावून गुडघे टेकायला लावतं. त्याच्या पाठीवर ऐटीत सवार होताना सम्राटपद त्या बालकाकडे असतं हे निर्विवाद. 


बाल्यावस्था म्हणजे जीवन ग्रंथाचं सोनेरी पान! या काळात लाभणारी सुखं कोणती म्हणून विचारता? 'बालहट्ट' या सबबीखाली बहुतेक सर्व हट्ट पुरविले जातात. चांदोमामाकडे पाहता पाहता, आईने वत्सल हाताने भरविलेल्या, काऊचिऊच्या घासात अमृताची गोडी असते. 


शंभर रुपयांच्या नोटेपेक्षा एक रुपयाचं चॉकलेट हातात आलं की होणारा आनंद किती अवर्णनीय असतो म्हणून सांगू? लुटुपुटीच्या खेळातील गंमत काही औरच! आजी आजोबांच्या गोष्टी नि गाणी ऐकणे म्हणजे मेजवानीच असते. धडपडत चालणाऱ्या, अडखळत बोलणाया तान्हुल्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. 


आईच्या मांडीवर बसल्यावर त्रैलोक्यातील सारी सुखं तुच्छ वाटतात. 'आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे' अशी अवस्था असते.अज्ञानात सुख असतं ना ! लहानपणीची काही सुखं अशीच अज्ञानातून लाभणारी असतात. कोणतीही आवडती वस्तू ‘काऊने नेली' म्हटलं तरी खरं वाटतं आणि हो, काऊचा मुळीसुद्धा राग येत नाही.


'बागुलबोवा' ची भीती वाटते तरी आईच्या कुशीत, बालक बिनधास्त झोपते. पीठ कालविलेलं पाणी दूध समजून मिटक्या मारत प्यायलं जातं. बँकेत गेलं की हवा तेवढा पैसा मिळतो असा गोड गैरसमज असतो.


मोठेपणी पैशाचं झाड लावायचं बालिश स्वप्नही बालमन रंगवीत असतं. पडल्यावर त्या जागेला ‘हात रे' केलं की झालेला बाऊ औषधाविना बरा होतो किंवा 'उंदीर पळाला' या वाक्याने वेदना कुठल्याकुठे पळून जाते. बोराची बी चुकून गिळली तर पोटात बोराचं झाड तर येणार नाही ना, अशी शंका त्या निरागस मनात डोकावल्याशिवाय राहत नाही.


प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा हा गोडकाळ केव्हा संपतो ते कळत नाही. उरतात फक्त त्याच्या मधुर आठवणी. वाटतं, पुन्हा ते दिवस परतून यावेत.अज्ञानात सुखाबरोबर थोडंसं दुःखाचं मिश्रणही असतं. लहानपणी मोठं होण्याची खूप घाई होते. मोठेपणामुळे मिळणारं 'घी' दिसत असतं पण 'बडगा' माहीत नसतो. चिमुकल्या विश्वातलं राईएवढं दुःखही पर्वताएवढं वाटतं. नि मनाला वाटून जातं 'नको हे लहानपण!'


लहानपणी न आवडणारं बालपण मोठेपणी इतकं का बरं आठवावं? आवडावं? लहानपणी कोणत्याच काळज्या, चिंता, जबाबदाऱ्या सतावू शकत नाहीत. व्यवहारी जगातील चटक्यांची झळ पोचत नाही. भूक लागली की खावं, खेळावंसं वाटलं की हुंदडावं, झोप आली की झोपावं असं स्वतंत्र जीवन असतं.


अभ्यासाचा ससेमिरा नसतो की पंतोजींचा मार नसतो. कामाची कटकट नाही. ताईची वटवट ऐकावी लागत नाही. दादाने खोडी केली की भोंगा  पसरण्याचे “हुकमी अस्त्र" बाहेर काढायचे. मग आई धावत येते. दादाच्या पाठीत. धपाटा घालते नि बाळाच्या हातावर खाऊ ठेवते. अशा वेळी विजयी मुद्रेने दादाकडे पाहायचे. मग तोही रागारागाने पाय आपटत, काहीतरी पुटपुटत तिथून निघून जातो. काय मज्जा येते त्या वेळी !'


अशी ही रम्य बाल्यावस्था संपते तेव्हा ‘अहा ते सुंदर दिन हरपले' अशी खंत वाटायला लागते. वय वाढतं .चार पावसाळे पाहिले जातात, काळ्याचे पांढरे होतात, जगाची ओळख पटू लागते, अनुभवाची भरगच्च शिदोरी गाठीशी असते, विचारांची परिपक्वता येते. तेव्हा मात्र ‘‘बालपणाचा काळ सुखाचा' असा निर्वाळा सर्वजण देतात.


संत तुकाराम महाराज खूप मोठे होते. 'आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदचि अंग आनंदाचे' असा अनुभव घेऊन त्यांचं जीवन कृतार्थ झालं होतं. तरीही ते देवाजवळ मागणं मागतात.

"लहानपण दे गा देवा".

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 3

रम्य ते बालपण मराठी निबंध

" सरता बालपण येते बहु आठवण

चौफेर नाचलेले मन

रोज साजरा केलेला सण...


" 'बालपण' शब्द उच्चारताच माझे शब्द मी गुंफू लागतो. मानवी जीवनाच्या बालपण, तारुण्य आणि वार्धक्य अशा तीन अवस्था आहेत. बालपणीचा काळ सुखाचा' असे म्हटले जाते. ते सत्य आहे. बालकाच्या पहिल्या नजरेतन पढचा प्रवास जेंव्हा सरू होतो, 


तेव्हा बालपणात त्याचं मन स्वच्छ, सुंदर, निर्मल असत. झऱ्याची खळखळ , पानांची सळसळ, हासऱ्या चंद्राची धावपळ, उडत्या पाखरांची शीळ, सुंदर कुसुमांचा परिमल , उगवत्या सूर्याची प्रकाशफेक , सागराच्या अंतर्मनातली गाज या साऱ्यांचा सुंदर मिलाफ म्हणजे रम्य बालपण!


माणूस कितीही मोठा झाला तरी पावलोपावली त्याला त्याचं बालपण खुणावत राहत. त्या वळणाच्या वाटेवर नकळत त्याचं मन फिरून येतं, सुखावतं, ते मुलायम मयूरी क्षण मुठीत घेऊन बालपणाची माधुरी जिभेवर , हृदयात परत ताजी होते.

" ते रूसवे-फुगवे, 
ते जोरदार गालगुच्चे 
ते नाक मुरडणे, 
ते बालखेळ लुच्चे.... 
ती आतुकली भातुकली,
ती बाहुला बाहुली
ती बोबडी बोली, 
ती खेळायची खोली...."


स्वार्थ,लुटालूट, भ्रष्टाचार अशा शब्दांची ओळखही नसलेल ते स्वच्छ बालपण! प्रत्येक हट्ट पुरवून घेण्याचे दिवसच जणू! घरात सर्वांचा केंद्रबिंदू म्हणजे घरातला बाळ. त्याच्या एका हास्यलकेरीत मातेचं विश्वातलं सर्वात मोठ सदडलेलं! मातेस वाटते की तान्हुला आपला हेच आपल सर्वस्व. ती म्हणते

“जीवनाचे चैतन्य तू जणू हसऱ्या निर्झराचे वाहणे

एका हास्य लकेरीत बाळाच्या माझ्या जीवनाचे अखंड वाहणे....."


बालपण समृध्द असते. चिंता नाही, उणीव नाही, जबाबदाऱ्या नाहीत.फक्त आनंदच आंनद विखुरलेला.दुःखाची जाणीव तेवढीशी नसतेच.खेळायचे, बागडायचे. खायचे, प्यायचे , रूसायचे ते दिवस! सुरक्षित जीवन ! बाहेरही जायचे तर कुणाचे तरी बोट धरूनच ! चूक झाली तरी बोलणी खावी लागत नाहीत. 


'लहान आहे' हे शब्द म्हणजे जणू बचावाची शस्त्रेच! थोड काही छान केले की कौतुकच कौतुक! सुंदर कपडे, रंगीत खेळणी, फुगे, गोड चॉकलेटस् गोळ्या यामुळे अख्ख्या विश्वात श्रीमंत ठरलेलं असं बालपण!


जसजसं बाळ मोठ होऊ लागतं शाळा, अभ्यास, परीक्षा, आईचा धाक, शिक्षकांची छडी , वेळेचा बाऊ यांचा ससेमिरा सुरू होतो.पुस्तकवयांच्या ओझ्याखाली नुसत हुंदडणारं बालपण दबलं जातं.बालपणाच्या नाचऱ्या वाटेत नवनवीन प्रश्न उभे राहू लागतात.मग हळूहळू मोठे होतांना वाटू लागते की आपण उगाचच मोठे होत आहोत. 


आठवू लागतात ते मागे राहिलेले मुग्ध क्षणांचे पिसारे "तो वाटलेला खाऊ, तो गुपचूप घास खाणारा भाऊ तो बिछाना मऊ, तो घास घेणारा काऊ ती आईची काठी, ती भगिनीची मिठी ती दुधाची वाटी, ती ताकाची लोटी


ते मातेचे दोन थोबाडीत देणे

 ते ओढूनि मग कुशीत, पटापट मुके घेणे

ते सुख ते अमर निर्मल प्रेमाचे लेणे

ते मातृमिठीतले अखंड जीवनाचे सोने....


" बालपणाची गोडी अवीटच! दुर्दैवाने आज भारतात स्वातंत्र्य मिळून ५५ वर्षे उलटूनही काही भागात बालकांची स्थिती गंभीर आहे. 'रम्य ते बालपण' लिहितांना माझे मन , माझी लेखणी यांचा थरकाप होत आहे.



कारण मेळघाट, भामरागड , मोखाडा भागात आदिवासी बालके अन्नान्न करत मरत आहेत. धारणी तालुक्यात सव्वातीनशे मुले कुपोषणाने दगावली आहेत.बालपणाला 'बाल श्रमिक' हाही एक कलंक आहे. हे सारे थांबले पाहिजे. 'बालमृत्यू' चा दर घटला पाहिजे. तुकोबांनी म्हटले आहे


"बालपण दे गा देवा । 

मुंगी साखरेचा रवा"


बालपणाला सुरक्षित ठेवले गेले तरच अर्थ आहे. देशात एकही बालक उपाशी राहू नये.तरच म्हणता येईल रम्य ते बालपण!

"ते चॉकलेट, त्या चिंचा, ते थंड गारीगार

 ते खोटे बोलणे कधी, चुकविण्या आईचा मार ....."


अस निष्पाप , निरागस बालपण कधीच विसरलं जाणं शक्य नाही. ते स्मृतीत परत परत येणार.

" ते नाचणे, ते बागडणे, 

ते झोके गोल गोल

 त्या सुवर्णक्षणांना नाव कोणते करू बहाल?...

ते शैशव सुंदर क्षण सुखाचे

 ते रम्य नंदनवन

त्यापुढे सारे जीवन गौण भूतकाळातले ते अनमोल क्षण!...."मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद