बाबा आमटे मराठी निबंध | baba amte essay in marathi

बाबा आमटे मराठी निबंध | baba amte essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण बाबा आमटे मराठी निबंध बघणार आहोत.  मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे यांचा जन्म इ. स. १९१४ साली झाला. लहानपणापासूनच समाजातील उपेक्षितांचे अंतरंग जाणून घेण्याची त्यांची वृत्ती होती. समाजाला समृद्ध, सुबुद्ध आणि सुसंस्कृत बनविण्याचे काम हे समाजातल्या प्रत्येक घटकाचे असते; परंतु व्यवहारी जग समाजातील दु:खे पाहून व्यथित होत नाही. परंतु बाबा आमटे हे मानवांची दुःखे पाहून अंतर्यामी गलबलून जाणारे जीवनाचे खरे उपासक होते.
डोक्यावरून मैला वाहून नेण्याचे काम करणाऱ्या माणसाचे दुःख पाहून त्याच्याविषयी कळवळा निर्माण झालेला हा पुरुष अंतर्मुख बनला. कुष्ठरोगाने ग्रस्त झालेले बांधव पाहिल्यावर त्यांच्या मनात दयेचा पाझर फुटला. वरोरा येथे अशा कुष्ठरोग्यांना जगण्यासाठी आत्मविश्वास देण्याचे मोलाचे कार्य त्यांनी सुरू केले. कुष्ठरोग्यांच्या उत्थानासाठी अनंत कष्ट सोसले. कुष्ठरोग्यांचा प्रश्न त्यांनी केवळ शारीरिक व्याधीपुरता मर्यादित मानला नाही, हा त्यांच्या कर्तृत्वाचा मोठा विशेष आहे. 
समाजाच्या मरतुकड्या दयेवर या व्याधितांनी जगावे, हे त्यांना रुचले नाही. जगाच्या दृष्टीने या मोडक्या-तोडक्या झालेल्या माणसांच्या पुरुषार्थाला साद घालून त्यांनी माळरानावर नंदनवन निर्माण केले. भग्न मंदिरातही जागृत दैवत असू शकते, हे त्यांनी अंत:स्फूर्तीने जाणले व आपले जीवन या लोकांसाठी पणाला लावले. लोकांनी त्यांना स्वप्नाळू', 'ध्येयवादी' अशी विशेषणे बहाल केली. परंतु त्यांनी आपल्या स्वत:च्या अंतरात्म्याला साद दिली. त्यांनी आपले समाजकार्य नेटाने सुरू ठेवले. तेव्हा एकदाही मागे वळून पाहिले नाही.आदिवासी व युवक यांना विचार आणि दिशा दाखविण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी ओसाड माळरानाचे नंदनवन केले. एवढेच नाही; तर ज्यांच्या जीवनात अंधार होता, तो दूर करून त्यांना जगण्याची नवी प्रकाशवाट दाखवली. त्यांच्यासाठी आनंदवनाची निर्मिती बाबांनी केली. अफाट वैचारिक ताकद आणि प्रचंड कल्पनाशक्ती असलेल्या या असामान्य व्यक्तिमत्त्वाला कशाच्याच मर्यादा पडल्या नाहीत. अनेक ध्येये त्यांनी उराशी बाळगली आणि ती पुरी केली. एका मागोमाग दुसऱ्या ध्येयाकडे त्यांचे मन धाव घेत असे. या ध्येयमार्गावर त्यांची पत्नी सौ. साधनाताई, त्यांचे पुत्र विकास, प्रकाश, कन्या रेणुका, सुना भारती व मंदाकिनी सारेच सहभागी झाले.


सोमनाथ येथील श्रमसंस्कार शिबिरात 'भारत-जोडो' अभियानाचा संकल्प त्यांनी सोडला. त्यांना 'अपंग' या शब्दाची चीड होती. त्यांचे म्हणणे होते की, अपंग हा शब्द नाहीसा करण्यासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. सेवेचा धंदा न करता संस्कृतीवरचा कलंक दूर करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.


आनंदवनात त्यांनी आनंदनिकेतन कॉलेज, महारोग्यांच्या मुलांसाठी प्राथमिक शाळा, भूकबधिरांसाठीच्या शाळा, गोकुळ वगैरे इमारती बांधल्या. त्या इमारती कुष्ठरोग्यांनीच बांधल्या. त्यांचे हे कार्य पाहन परदेशी मित्र ऑर्थर तारनोव्हस्की भारावून गेले. त्यांनी आनंदवनाच्या अपंग बांधवांसाठी ३० लाख रुपयांची ठेव गोळा केली. त्यातूनच अपंगांसाठी वसतिगृहाची भव्य वास्तू उभी राहिली.कुष्ठरोगावर उपाय करण्याचे काम ठरविल्यावर बाबा या रोगाचा अभ्यास करण्यासाठी कलकत्त्याला गेले. बाबांनी यासाठी स्वत:चे शरीर देऊ केले. कुष्ठरोगाचे जंतू स्वत:च्या शरीरात टोचून घेण्यासाठी ते तयार झाले. बाबा शिकले होते वकिली; मात्र झाले डॉक्टर! बाबांचा पहिला दवाखाना 'आनंदवनी' झाडाखाली सुरू झाला. पुढे त्यांचे कार्य त्यांचे सुपुत्र विकास व प्रकाश यांनी सुरू ठेवले. त्यांच्या सुनाही त्यांच्या कार्यात सहभागी झाल्या. भारत सरकारकडून बाबांना ‘पद्मश्री' बहुमान प्राप्त झाला. अनेक आंतरराष्ट्रीय बहुमान व पारितोषिकांचे ते मानकरी ठरले. अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदव्या दिल्या. नर्मदा आंदोलनातही त्यांनी झोकून देऊन कार्य केले.'ज्वाला आणि फुले' 'माती जगवील त्याला मत' व उज्ज्वल यासाठी ही त्यांची पुस्तके. समाजासाठी आयुष्याचे अर्घ्य देणारा हा समाजसेवक युगायुगात एकमेव असेल. त्यांनी निर्माण केलेल्या आनंदवनात जीवनाचे सूत्र गवसते. जे वेदांनाही सांगता येत नाही, हे वेदनेला सांगता येते.

जीवनाच्या अखेरपर्यंत ते समाजकार्यात व्यस्त होते. २००८ मध्ये त्यांचे निधन झाले.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद