बेकार तरुणाचे आत्मकथन निबंध मराठी | bekar tarunache atmakathan nibandh marathi

बेकार तरुणाचे आत्मकथन निबंध मराठी | bekar tarunache atmakathan nibandh marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण बेकार तरुणाचे आत्मकथन मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून 4 निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. मित्रांनो बेकारी आज जगासमोर एक मोठी समस्या बनलेली आहे. याच संकटात सापडलेल्या एका तरुणाचे आत्मकथन (मनोगत) आपण  या निबंधामध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


 एका गरीब कुटुंबात माझा जन्म झाला. हृदयानं श्रीमंत आई-वडिल मला लाभले. त्यांचे संस्कार व माझे प्रयत्न यातून मी घडत गेलो.शाळा, महाविद्यालय यातून 'एक आदर्श विद्यार्थी' म्हणून माझी प्रतिमा साकारली गेली.खरं तर डॉक्टर होऊन रुग्णसेवा करण्याचे माझे स्वप्न होते.परंतु पैशाची तरतूद होऊ शकली नाही.



विज्ञान शाखेची पदवी हाती आल्यानंतर मला नोकरी शोधणे भागच पडले.कारण प्रसंगी उपाशी राहून माझ्या मातापित्यांनी माझे शिक्षण पूर्ण केले होते. म्हणून माझे कर्तव्य माझ्यासमोर दत्त म्हणून उभे टाकले. या आव्हानासाठी मी सज्जही झालो. अन् मग सुरू झाली माझी वाटचाल .


नोकरीच्या शोधात शाळा, महाविद्यालयातली प्रशस्तिपत्रके , गुणपत्रके, बक्षिसे सारी फेर धरून माझ्याभोवती नाचू लागली.या साऱ्यांसह अर्जावर अर्ज खरडूनही , मुलाखती देऊनही नोकरी मात्र अजूनही मिळत नाही. मन अगदी बधिर झाले आहे.'



“थकत चाललेल्या माता-पित्यांचा मीच एक आधार आहे.पण या बेकारीच्या भस्मासुराने माझी वाटच गिळली आहे. मी शून्य झालो आहे. मन विचार करून थकले आहे.फिरून फिरून पाय थकले आहेत. आशा मात्र जिवंत आहे.


“संपलं सारं तरी सुरू करायचं असतं भरकटलं तारू तरी पोहायचं असतं

डोळ्यांत प्राण घेऊनहीनवं क्षितिज शोधायचं असतं

 

ही माझ्या माऊलीची शिकवण! स्वप्नांचा चुराडा हातात लपवून मी आशेने ध्येयाचं क्षितिज शोधित आहे. भ्रष्टाचार मात्र आ ऽ ऽ वासून माझ्यासारख्यांना गिळू पाहत आहे. 'टेबलाखालून' बंडल पुढे सरकावले जात आहेत. आदर्श गहाण पडला आहे. खिसे भरले जात आहेत. आपल्या शिक्षण पध्दतीत गुणवत्तेला काय किंमत आहे? 


पैसा, वशिला , सत्ता यापुढे गुणवान माणसांना काय स्थान? या देशात सर्वांना समान संधी आहे का? कोठवर सोसू हा तोंड बांधून बुक्क्यांचा मार? पोटावर लाथा बसत आहेत.वशिल्याचे राज्य आले आहे.सोन्याला कस लागत आहे.लोखंडावर सोन्याचा चढवलेला मुलामा सोन्याचा आभास निर्माण करीत आहे.गुणवत्तेची हेळसांड होत आहे. संधी न मिळाल्याने हुशार युवक हताश झाला आहे. जीवघेणी स्पर्धा , फुगलेले भांडवल , भ्रष्टाचार, लुटालूट यांच्या जीवघेण्या विळख्यात आजचा युवक गुरफटला गेला आहे.


अंगी हुशारी, सचोटी बाळगून हाती मात्र धुपाटणे उरले आहे. माझी ही अवस्था माझ्या मनाला घरे पाडीत आहे. मी ‘मोठा' होईल म्हणून दुःख गिळून आशेने जगणारे माझे माता-पिता , त्यांच्या आशा-आकांक्षा याविषयी माझे कर्तव्य मला करायचे आहे पण नोकरीची दारे बंद फक्त आश्वासने मिळतात .


निराश मनाची वाटचाल उषःकालाची प्रतिक्षा करीत आहे. सळसळणारे माझे तरुण रक्त उफाळत आहे. बर्फासारखे थंड जग त्याला वाकुल्या दाखवीत आहे. निराशेच्या खाईत माझ्यासारखे अनेक बेकार तरुण आत्महत्या करीत आहेत. काय ही आजच्या युवकाची कथा अन् व्यथा? काही अपात्र तरूणांना पैसा भरल्यामुळे नोकरीची संधी मिळते म्हणजे पर्यायाने देशाच्या प्रगतीचा मार्ग खिळखिळा झालाच समजा.


ओरडणाऱ्यांचा आवाज बेमालूमपणे दफन केला जात आहे.वीतभर खळगीसाठी वणवण हिंडणे बेकारांच्या नशिबी आले आहे.'' गुन्हेगारीकडे नकळत काही जण वळत आहेत.

"मी खूप जिद्दी आहे. 'चोच तिथे दाणा' ही निसर्गाची तरतूद आहे असे समजून मी शोध चालू ठेवला आहे.नोकरी नाही मिळाली तर कर्ज काढून छोटा उद्योग मी सुरू करीन.मी आशावादी आहे.

"होऊनि शिल्पकार, घडवीन आयुष्याचे अपूर्व लेणे अथक परिश्रमाने करील, लोखंडाचेही सोने!"

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


निबंध 2


बेकार तरुणाचे आत्मकथन निबंध मराठी | bekar tarunache atmakathan nibandh marathi




"अरे, पकडा त्याला. त्यानं पाकीट मारलं!
" ऐन दुपारी एस्. टी. स्टँडवर एकच गलका उठला, आणि कोणीतरी त्या चोराला पकडलंच. चोर नवशिका व सजन वाटत होता. त्याच्याबद्दल नकळत आपुलकी निर्माण झाली म्हणून त्याला



विचारलं, "अरे, तू चांगला मुलगा दिसतोस. मग कुठे तरी नोकरी करायची सोडून असे का धंदे करतोस?"'नोकरी' हा शब्द ऐकल्यावर त्वेषानं उसळून तो म्हणाला, "तुम्ही देता का नोकरी? आत्ता करतो. आजकाल 'नोकरी' मिळणं इतकं सोपं आहे का? मिळाली असती तर केली नसती का? अहो, मी पाकीट मारण्याचा धंदा करत नाही.




आज प्रथमच पाकीट मारलं आणि तुम्ही पकडलं. उद्या रत्नागिरीला 'इंटरव्ह्यू'साठी जायचे आहे. पन्नास रुपयांसाठी भीक मागायची लाज वाटली म्हणून ही चोरी करून बघितली.


“मी चांगला बी. ए. झालेलो आहे.
बी. ए. होऊन चार वर्षे झाली. परंतु अजूनही काही कामधंदा मिळत नाही. किती ठिकाणी अर्ज केले, मुलाखतीला गेलो. पण कोठून बोलावणेच आले नाही. टायपिंगच्या परीक्षा दिल्या. तरीही नाहीच. मुंबईत नशीब आजमावायला जावं म्हटलं तर राहायचं कुठे हा प्रश्न व म्हाताऱ्या आई-वडिलांजवळ इथं कोण? हे दुसरं प्रश्नचिन्ह !



“उत्तम शेती व मध्यम नोकरी असं म्हणतात नं? म्हणून आमच्या तुटपुंज्या जमिनीत शेती करून पाहिली. तर उत्पादनापेक्षा मजुरीचाच खर्च जास्त. जेमतेम चार महिने पुरतील एवढे तांदूळ मिळाले. या वाढत्या महागाईत फक्त वडिलांच्या पेन्शनीच्या पैशावर कसं भागवणार? आई तर नेहमी आजारी असते. तिच्या औषधपाण्यात बरेच पैसे खर्च होतात.



“तुमच्या दोन महिन्यांच्या पगाराइतके पैसे फक्त मुलाखतीला जाण्यायेण्यात खर्च झाले आहेत. मजुरी करायलाही माझी तयारी आहे. पण मला कोणी मजूर समजतच नाही व मजुरीही मिळत नाही. विना अनुदान तत्त्वावर चालणाऱ्या शाळेत दोन महिने नोकरी केली. तर दरमहा पगार फक्त ४०० रुपये दिला. 


२५० रुपये तर माझे जाण्या-येण्यात खर्च झाले. नोकरीसाठी कुठून कसा वशिला लावायचा तेच कळेनासं झालं आहे. "कोकण रेल्वेची जाहिरात वाचून अर्ज केला होता. उद्या मुलाखतीला बोलावलं आहे. घरातील पैसे संपले आहेत. कोणापुढे हात पसरण्याची लाज वाटली. म्हणून पाकीटावर हात मारला. पण दुर्दैवानं तुम्ही पकडलं. 



तेव्हा विनंती करतो मला पोलिसांकडे देऊ नका. आई हाय खाईल व वडील घरातून हाकलून देतील.  तो बेकार तरुण काकुळतीनं विनवू लागला, मी त्याला माझ्या पाकिटातून शंभर रुपये काढून दिले व सोडून दिलं. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 3

 बेकार तरुणाचे आत्मकथन निबंध मराठी | bekar tarunache atmakathan nibandh marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण बेकार तरुणाचे आत्मकथन मराठी निबंध बघणार आहोत. नमस्कार मंडळी! मला माहीत आहे, तुम्ही मला ओळखत नाही. अहो, ओळखणार कसे? अजून सामाजिक प्रतिष्ठा मिळावी यासाठी माझे खाते उघडलेच गेलेले नाही. एवढे दिवस माझी विद्यार्थीदशा होती आणि आता माझी अन्नान्नदशा सुरू आहे.



आज मी माझी ओळख करून देऊ शकतो. एक सुशिक्षित बेकार! भारताला स्वातंत्र्य मिळून ६४ वर्षे झाली; पण बेकारीची समस्या मात्र दूर झालेली नाही. त्यामुळे कोट्यवधी बेकारांतील मी एक बेकार. नुसता बेकार नाही; तर सुशिक्षित बेकार!



अहो, पूर्वी शिक्षण पूर्ण झाले, की नोकरी लागायची. त्यामुळे त्या ध्येयाने प्रेरित होऊन शिक्षण पूर्ण केले जायचे. थोडी-फार ओळख असली, तरी चटकन नोकरी लागून जायची. पण आता असे का नाही घडत? माझे शिक्षण पूर्ण झाले, 



मी पदवीधर बनलो, नोकरीसाठी लागणारी पात्रता माझ्यापाशी आहे; पण माझ्यापाशी वशिला नाही की लाच देण्यासाठी पैसा नाही. आणि हो, माझ्याकडे आरक्षण मिळण्याचीही पात्रता नाही. पण मला पोट आहे. माझ्या काही आवश्यक गरजा आहेत. 



मलाही भविष्य आहे. मलाही समाजात स्थान हवे आहे. मला हवी आहे; माझ्या चरितार्थासाठी नोकरी. ती न देता अनेक जण केवळ मला फुकटचे सल्ले मात्र देतात. काही जण मला व्यवसाय कर म्हणून सल्ला देतात; पण भांडवलाचे काय?' विचारल्यावर मूग गिळून बसतात. 



हलकी-सलकी कामे करण्याचाही उदात्त सल्ला मिळतो. बेकार बसण्यापेक्षा चांगले ना? अहो, पण मग मी शिक्षण घेण्यासाठी एवढा पैसा, श्रम, वर्षे का घालवली? काहीही न शिकताच ही कामे करत फक्त पोट भरले असते की ! पण मंडळी, मोठी स्वप्ने बघायचीच नाहीत का? उत्तुंग झेप घेण्याची क्षमता असूनही ती घ्यायचीच नाही का? द्या ना उत्तर!



मंडळी! मी वाट पाहतोय संधीची. योग्य संधी मिळाली, तर मी नक्कीच त्याचे सोने करीन. आता तर मला या जर तर'च्या भाषेचाच कंटाळा आलाय. सध्या मी अभ्यास करतोय बेकारी या समस्येचा. अहो, वाट पाहण्यातही गंमत असते, असे म्हणतात. 



पण माझ्या वाट पाहण्याची मात्र आता सगळे मिळून गंमत करताहेत, त्याचे काय? 'रिकामे मन सैतानाचे घर' म्हणतात. माझी काहीशी तशीच अवस्था होण्याच्या मार्गावर आहे. काही सुशिक्षित बेकार तर देशोधडीला लागलेत. काही वाममार्गाला लागलेत. 



आता मला सांगा यातून देशाचे नुकसानच होईल ना? माझ्या काही मित्रांनी तर परदेशातील नोकरी स्वीकारली आहे. आपल्या देशातील बुद्धिमान तरुण परदेशात नोकरी करून तिथेच स्थायिक होत आहेत. आपल्या देशातील बुद्धिमत्ता आपल्या देशाच्या विकासासाठी उपयोगी पडत नाही. परंतु आपणास त्याबाबत खंत वाटत नाही?



आता बेकारीच्या समस्येचा आढावा घेतला, तर प्रामुख्याने काही कारणे पुढे येतात. त्यातील प्रमुख कारण म्हणजे वाढती लोकसंख्या आणि शिकणाऱ्यांचे वाढते प्रमाण. त्या मानाने नोकऱ्यांची संख्या अल्प आहे. दरवर्षी कारखान्यातील उत्पादनाप्रमाणे सुशिक्षित बाहेर पडत आहेत. 



नोकरीसाठी परीक्षा घेतल्या जातात. त्यात पास झाल्यावर प्रत्यक्ष मुलाखती होतात. तेव्हा' अनुभव आहे का? असे विचारले जाते. अनुभव नाही, या कारणासाठी नोकरीची संधी नाकारली जाते. आता सांगा, नोकरी दिल्याशिवाय अनुभव येणार कसा? अनुभव आणि नोकरी यांच्या दुष्टचक्रात माझ्यासारखे अनेक सुशिक्षित बेकार अडकले आहेत.



ज्यांच्याकडे जमिनी आहेत, ते शेतकीचे शिक्षण घेऊन शेती या व्यवसायाकडे वळत आहेत. पण आमच्यासारख्यांकडे जमीन नाही. मग आम्ही काय करावे? शेतमजूर म्हणून राबावे? व्यवसायासाठी शासन भरपूर साहाय्य करते म्हणे ! पण त्यासाठी असलेल्या जाचक अटींचे काय? तारण नाही, कर्ज नाही. 



कारण आहे; पण कर्ज नाही. अशा परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा? पदरी निराशा येणारच ना? काम करण्याची तयारी, काम करण्यासाठी विशिष्ट पात्रता, ताकद, जिद्द असूनही उपयोग नाही. अल्प जागांसाठी खूप उमेदवार, अशी विषम स्थिती !



परवाच माझ्या एका हुशार मित्राने निराश होऊन नोकरीची आशा सोडलीच; पण पदवीची प्रमाणपत्रेही फाडून टाकली. खरे तर हे चूकच आहे. त्या प्रसंगापासून मी खूप दु:खी आहे. काय करावे, काही सूचेना. 



अशी माझी अवस्था आहे. बघा कोणाला काही सुचतेय का? नोकरी द्याल का कोणी नोकरी? या प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल का? प्रयत्नवाद संपलाय आणि सुरू झालाय आशावाद. बघू या, काय होते ते! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 2

बेकार तरुणाचे आत्मकथन निबंध मराठी | bekar tarunache atmakathan nibandh marathi

पावसाळ्याचे दिवस होते. मी आजीकडे चाललो होतो. पुण्याहून कल्याणला. गेले तीन दिवस पावसाने संततधार धरली होती. त्यामुळे सर्वच रेल्वेगाड्या उशीराने धावत होत्या. जसजसा वेळ होत चालला होता, तसतसा मी अस्वस्थ होत होतो. पण नाईलाज होता. 


'एखाद्या गोष्टीची नुसती वाट पाहणं' किती कंटाळवाणं काम असतं, हे मला त्या दिवशी समजलं. माझ्या शेजारीच फलाटावरच्या बाकावर एक तरूण बसला होता. निळी जीन, पांढरे शूज, पाठीवर सॅक, हातात फाईल्सचा गठ्ठा.



माझं कुतूहल चाळवलं. मी प्रश्नांची सरबत्ती त्याच्यावर सुरू केली. तो सांगू लागला, “अरे मित्रा, ह्या फाईल्स घेऊन गेले सहा महिने मी हिंडतोय! मी मूळचा कोल्हापूरकडचा. 'शिक्षणाच्या माहेरघरी  पुण्यात' मामाकडे शिकायला होतो. चांगल्या कॉलेजमधून ग्रॅज्युएट झालो. नंतर मार्केटिंग व्यवस्थापनात डिप्लोमा केला. 


आईने रोजंदारीने काबाडकष्ट करून मला शिकविले. तिच्या खूप अपेक्षा आहेत माझ्याकडून! पण...शिकून बाहेर पडल्यावर... वास्तव समोर आले. मोठ्या फुशारकीने ... मोठ्या पगाराची नोकरी करून आईच्या कष्टांचे पांग फेडू म्हटलं, पण...नशिब साथ देत नाहीये. जिथे जावं तिथे वशिलेबाजी, निवडीमधला भ्रष्टाचार! 



‘विना वशिला नाही उद्धार' हेच जणू आज नोकरी व्यवसायांचे तत्त्व झाले आहे. 'दाम करी काम' म्हणतात ते काही उगीच नाही! रक्ताचे पाणी करून मुलाने जास्तीत जास्त गुण मिळविले, तरी त्याच्यापेक्षा कमी गुण असणारा विद्यार्थी पैशाच्या जोरावर पुढे जाऊ शकतो. 



लायकी नाही तर लाच द्या, नोकरी मिळवा. पैसा नाही, बेकार व्हा! मग ह्यातूनच नैराश्य व गुन्हेगारी बळावते.
माझी प्रत्येक मुलाखत उत्कृष्ट व्हायची व मी वाट बघत राहायचो अपॉईंटमेंटची! पण तो माझा मूर्खपणाच ठरायचा दोस्ता! आईची सारखी पत्रे येतात. माझ्या उत्तराच्या वाटेकडे ती डोळे लावून बसते. 


मग माझी चिडचिड होते. पण कोणावर रागवू? ह्या परिस्थितीवर की वरिष्ठांच्या भ्रष्ट न्यायबुद्धीवर की लोकसंख्येच्या भस्मासुरावर की संगणकाच्या प्रचंड वापरावर की माझ्या जातीवर? त्यामुळे राखीव जागांमध्ये समाविष्ट न होण्यावर की गरीबीवर की गरीबीकडून गरीबीकडे नेणाऱ्या नियतीच्या दुष्टचक्रावर की अभ्यासाचा ध्यास घेऊन मिळविलेल्या प्रथम श्रेणीवर? 


आई मनातच अश्रू ढाळते, उपास-तापास करते. देवाला म्हणते, 'कधी संपायाची वाट, कधी लाभेल विसावा?
तुला एकट्याला ठावे, आकाशातल्या रे देवा!' या जगात दु:ख माणसाला कुठल्या रूपात भेटेल सांगता येत नाही. मला मात्र बेकारीच्या रूपात भेटले. 


लहानपणी पाहिलेली स्वप्नं आता वाकुल्या दाखवत आहेत. वास्तवाचा विस्तव स्वप्नांची राख करीत आहे. गेल्या २० वर्षांत आपल्या देशात शिक्षणाचं महत्त्व वाढलंय. तळागाळातले सर्वच शाळेत जातात. खप शिकतात, पण गुणवत्ता यादीत येणारी मुले .... पुढे परदेशात जातात. ही मले शिकन इकडे आल्यावर त्यांना संधी नसते. 


परदेशातली प्रलोभने त्यांना ओढीत असतात. शेवटी माणूस लोभी स्वार्थी असतोच. आपली बुद्धिमान गुणवंत मुले तिकडेच स्थायिक होतात हा 'Brain Drain' कधी थांबणार? तू लहान आहेस, तुला माहीत नाही. अमेरिकेत बहुतांश उच्चपदस्थ, संशोधक, शास्त्रज्ञ भारतीय वंशाचे आहेत. वाईट वाटलं ना ऐकून ? 


आता तर वाटतंय गावाकडं जावं. सर्टिफिकेट्स गुंडाळून माळ्यावर टाकावीत नि काही धंदा करावा. पण बेकाराजवळ कुठलं आलंय भांडवल? आणि सर्वे गण: कांचनम आश्रयन्ते । तेवढ्यासाठीच का मी हे व्यवसाय शिक्षण घेतलंय? माझ्या आयुष्याची नाव कुठे जाणार आहे माहीत नाही.


“दुःख ना आनंद ही, अन् अंत ना आरंभ ही नाव आहे चाललेली, कालही अन आज ही” अशीच माझी अवस्था आहे, दोस्ता. केवळ नोकरी नाही म्हणून अब्रूही राहिली नाही. कुणीही वाट्टेल तसा अपमान करतो. टपली मारून जातो.
तेवढ्यात फलाटावर गाडी येण्याची पूर्वसूचना देणारी घोषणा झाली. 


सर्वांनी आपापले सामान एकत्रित करून गाडीत चढायची तयारी केली. शिक्षणावरचा ज्ञानावरचा, कष्टावरचा, कर्तृत्वावरचा, कर्तबगारीवरचा... सगळ्या सगळ्या  जगावरचाच माझा विश्वास उडाला जणू. आज तो तरूण जात्यात होता. पण मी...? सुपात!! असे वाटले. पण क्षणभरच!


मी त्याला मनातून संदेश दिला गीतेतला... सुख-दुःख चक्रवत असतं, माणसाची शक्ती दुःख साहून नवीन स्वप्न पाहण्यात आहे. कर्तृत्वाचे पंख पसरून गरुडभरारी घेऊन भविष्यात झेपावण्यात आहे. धीर सोडू नको. तू बेकार आहेस भिकार नाहीस. तेव्हा,


'धीर धर, धैर्य धर, होऊन यत्न कर, भगीरथ स्मरून अथांग गगनी कर उड्डाण, बळ फिनिक्सचे पंखात भरून!' 
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद