मला पंख असते तर मराठी निबंध | mala pankh aste tar marathi essay

मला पंख असते तर मराठी निबंध | mala pankh aste tar marathi essay

निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मला पंख असते तर मराठी निबंध बघणार आहोत.  हा एक कल्पनात्मक प्रकारचा निबंध आहे. या निबंधात पंख असल्यावर कोणकोणत्या गमतीदार गोष्टी होऊ शकतात याचे वर्णन केले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


 त्यादिवशी शाळेत सरांनी आमच्या सर्व वर्गाला शिक्षा केली होती. शाळेच्या पटांगणाला २५ फेऱ्या मारण्याची शिक्षा. त्यामुळे घरी परतत असतांना अतिशय कठीण अवस्था झाली होती. पाय खूपच दुखत होते. रिक्शा करुन घरी जाण्याइतके पैसेही जवळ नव्हते. अचानक मला एक कावळा उडतांना दिसला आणि माझ्या मनात आले, मलाही पंख असते तर?


अहाहा! काय आनंदाचा क्षण असेल तो. कुठलेही वाहन न करता  मी शाळेतुन घरी आणि घरुन शाळेत जाऊ शकेन. अगदी फुकटात. सगळी कामे पटापट होतील. कुठेही जायला पंख पसरले की झाले. पंख मिळाले तर मी सर्वप्रथम सगळे जग फिरुन येइन.


प्रथम आपल्या देशातील सर्व प्रेक्षणीय ठिकाणे पाहुन येईन. कुठे रेल्वेचे तिकीट काढायला नको की गाडी खराब झाली म्हणून अडकून पडायला नको. त्यानंतर मी विदेश सफरीवर जाईन. आयफेल टॉवर, आफ्रिकेतील जंगले, जगातील सातही आश्चर्ये पाहून येईन, पक्षांप्रमाणेच झाडावरच राहीन आणि झाडांवरील ताजी फळे खाईन. वाटेत दिसणाऱ्या शेतांमधील रानमेवा खाईन. तळयातील स्वच्छ पाण्याने तहान भागवीन. डबा नको की पाण्याची बाटली नको. 



याशिवाय मी आणखी एक महत्त्वाचे काम करीन. मी सर्व जगात भारताचा शांतीदूत म्हणून फिरेन. सर्व जगात शांततेचा प्रसार करीन. त्यामुळे देशादेशातील युद्ध थांबतील. सर्व देश एकत्र येतील व जगाचे कल्याण होईल. दहशतवाद दूर होईल. पृथ्वीवर नंदनवन फुलेल. सगळीकडे आनंदी-आनंद पसरेल. तेव्हा कमीतकमी एक दिवस तरी मला पंख मिळावेत अशी मी देवाजवळ प्रार्थना करते.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



मला पंख असते तर निबंध  2


पक्षांना उडतांना पाहून प्रत्येकाच्या मनात उडण्याची इच्छा होतेच. मला खूपखूप उडावेसे वाटते. विमानात बसून प्रवास करतांना जेवढा आनंद मिळतो. त्यापेक्षा जास्त आनंद स्वत: उडण्याने निश्चितच मिळतो. मला पंख असते तर!.... तर या पृथ्वीतलावरील सर्वात आनंदी व्यक्ती मी असते. मला पंख असते तर त्यांना मी छान रंग दिला असता. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा रंग वापरला असता. त्यांना सजविले असते. आणि अशा सुंदर पंखांचा उपयोग मी योग्य कामाकरिता केला असता.


क्षणात गगनी, क्षणात भूवरी,भर्रकन शाळेत, चटकन घरी! किती सुखद अनुभव असता तो!....। आज मला शाळेत जाण्याकरिता स्कूल बसची वाट पहावी लागते. ती येण्यापुर्वीच सर्व तयारी करुन ठेवावी लागते. बसचा प्रवास कंटाळवाणा वाटतो रहदारीतून जातांना प्रदूषणयुक्त वायुंचा वास नकोसा होतो. कधी कधी मळमळ होते, डोके दुखते, कधी कधी चक्कर येतात. परंतु जर मला पंख असते तर?... 



तर ह्या सर्व कटकटीतून माझी सुटका झाली असती. मी तयारी करुन अगदी वेळेच्या आत शाळेत पोहोचले असते. प्रवासाचा शीण नाही. रहदारीचा अडथळा नाही. वाहनातून निघणारा धूर नाही. असा सुखद प्रवास झाला असता.सुटीत नातेवाईकाकडे जायला किंवा उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातांना रेल्वे किंवा बस मध्ये प्रचंड गर्दी असते. अशा वेळेस माझा प्रवास अगदी सुखद व मजेशीर झाला असता.


उडतांना पंख थकून आले असते तर सुंदर अशा बागेत किंवा नदीकाठी विश्राम केला असता. कित्येक पक्षांना जवळून पाहण्याचा आनंद काही वेगळाच असता नाही का? मी तर त्यांच्याशी उडण्याची स्पर्धा सुध्दा केली असती. पंख जर असले मला तर


कशाला हवी सायकल? अन कशाला मोटारगाडी? प्रवास माझा झाला असता ,विना बस, विना रेल गाडी परंतु काय माझ्या उडण्याने पक्षांना त्रास झाला असता? कदाचित मला खूप मैत्रिणी मिळाल्या असत्या, कदाचित नसत्या. काहींनी त्यांना सोबत घेवून उडण्याची मला गळ घातली असती. जर माझे कुणासोबत भांडण झाले असते तर त्यांनी माझ्या पंखांना इजा पोहोचविली असती.


मानव जाती मध्ये आपण एकटेच वेगळे आहोत कदाचित याची मला खंत वाटली असती. काही मिळवायचे असेल तर काही गमवावे लागते हे मी ऐकले आहे. त्याप्रमाणे मला उडण्याचा आनंद मिळाला असता परंतु काही तरी निश्चितच गमवावे लागले असते.आणखी महत्वाचा प्रश्न निर्माण झाला असता तो असा की काहींनी मला पक्षी म्हटले असते तर काहींनी प्राणी, काहींनी परी म्हटले असते तर काहींनी तिसरेच काही. मलाही प्रश्न पडला असता की मी निश्चित कोण?

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद