माझा आवडता क्रिकेटपटू मराठी निबंध | maza avadta cricket pattu essay in marathi

माझा आवडता क्रिकेटपटू मराठी निबंध | maza avadta cricket pattu essay in marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता क्रिकेटपटू  मराठी निबंध बघणार आहोत. सर डॉन ब्रैडमन यांच्या तेजस्वी क्रिकेट कारकीर्दीची आठवण झाली की पुढील ओळी नकळतच ओठावर येतात - 'झाले बहु, होतील बहु, परंतु यासम हा!' वेगाने विपुल धावा काढणारा बॅडमन यांच्यासारखा फलंदाज अजून तरी झाला नाही. इंग्लंडसारख्या पावसाळी हवामानात ओलसर विकेटवर आपल्या चारही दौऱ्यांत त्यांनी दोन हजाराच्यावर धावा केल्या. यावरून त्यांच्या फलंदाजीतील सातत्य व नैपुण्य दिसते. कसोटी सामन्यात एका दिवसात स्वतःच्या वैयक्तिक ३०० धावा काढण्याचा भीम पराक्रम त्यांनी केला. असा विक्रम आजतागायत कोणी केलेला नाही.


बॅडमन यांचे संपूर्ण नाव डोनाल्ड जॉर्ज बॅडमन. परंतु सर्वजण त्यांना डॉन बॅडमन म्हणूनच ओळखतात. त्यांचा जन्म ऑस्ट्रेलियात १९०८ मध्ये झाला. अठराव्या वर्षी त्यांनी एका सामन्यात ३०० धावांचा विक्रम केल्याने प्रथम श्रेणीच्या सामन्यात खेळण्याची संधी त्यांना लाभली. १९३० मध्ये विलायतेत इंग्लडविरुद्ध खेळलेल्या कसोटी मालिकेत बॅडमननी 'न भूतो न भविष्यति'असा पराक्रम केला. 


त्यांनी दहा शतके काढून २९६० धावा केल्या. तेव्हापासून जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. सतत वीस वर्षे कसोटी क्रिकेटमध्ये त्यांचे नाव गाजत राहिले. १९३४च्या दौऱ्यातही त्यांनी दोन हजारांच्यावर धावा काढल्या. १९४७-४८ ला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला गेला असता त्यांनी भारतीय संघाविरुद्ध दोन्ही डावात शतके काढण्याचा विक्रम केला. प्रथम श्रेणी सामन्यात शंभरावे शतक त्यांनी भारतीय संघाविरुद्ध काढले. अखेरच्या विलायतेच्या दौऱ्यातही त्यांनी २००० च्या वर धावा काढल्या. उत्कृष्ट संघनायक असा लौकिकही त्यांनी या दौऱ्यात मिळविला.


बॅडमन यांच्या क्रिकेटमधील पराक्रमाचा सन्मान करण्यासाठी इंग्लडच्या राज्यकर्त्यांनी त्यांना 'सर' ही बहुमानाची पदवी दिली. १९२८ ते १९४८ ही वीस वर्षे त्यांच्या फलंदाजीच्या पराक्रमांनी क्रिकेटक्षेत्र उजळून टाकणारी होती. त्यांनी आपल्या कारकीर्दीत केलेले अनेक विक्रम अजूनही कोणी मोडलेले नाहीत. एम.सी.सी.ने त्यांना आपल्या क्लबचे आजीव सभासदत्व देऊन त्यांचा सन्मान केला.


क्रीडांगणावर सतत पराक्रम गाजविणाऱ्या बॅडमन यांचे खाजगी जीवनही आदर्श होते. त्यांनी आपल्या क्रिकेट कारकीर्दीत आपली प्रकृती सदैव चांगली ठेवली. कसोटीच्या आदल्या दिवशी ते मेजवान्यांना उपस्थित राहत नसत. खाणेपिणे, दैनंदिन आचरण या सर्वांत ते अतिशय संयमी होते. ते सदैव निर्व्यसनी राहिले. त्यामुळे त्यांची शरीरयष्टी काटक, चपळ व सुदृढ राहिली. त्यामुळे त्यांच्या फलंदाजीचा बहर सदैव कायम राहिला, आणि त्यांना धावांचा डोंगर रचता आला. कुशल आणि यशस्वी संघनायक अशी त्यांची मोठी कीर्ती होती. त्यांचे फटके जोरकस असत. 


क्रिकेट खेळत असतानाच त्यांनी क्रिकेटसंबंधी छोटी मोठी पुस्तके लिहिली. त्यांचे आत्मवृत्त 'फेअरवेल टू क्रिकेट' हे खूप गाजले. त्यांनी क्रिकेटचा सर्वांगीण अभ्यास व व्यासंगही केला होता. कुस्तीत गामा पहिलवान, हॉकीत ध्यानचंद त्याप्रमाणे क्रिकेटच्या खेळात डॉन ब्रैडमन यांचे नाव फलंदाज या नात्याने जगभर गाजले. त्यांच्यासारखा फलंदाज शतकात एखादाच होतो. म्हणून त्यांची गणना युगप्रवर्तक क्रिकेटपटू म्हणून करण्यात येते.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद