माझी आवडती गायिका निबंध | mazi avadti gayika nibandh marathi

 माझी आवडती गायिका निबंध | mazi avadti gayika nibandh marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  माझी आवडती गायिका मराठी निबंध बघणार आहोत.  उषा मंगेशकर हे नाव घेताच डोळ्यांसमोर येते ते एक कलासक्त, वलयांकित पण साधे, सौजन्यशील व्यक्तिमत्त्व. त्यांची अनेकानेक गाणी आपण ऐकलेली असतात, तीही मनात फेर धरायला लागतात. 
। 'वेळ झाली भर माध्यान्ह, माथ्यावर तळपे ऊन नको जाऊ कोमेजून, माझ्या प्रीतीच्या फुला ॥ 

या गाण्यातील त्यांच्या स्वरातील आर्तता आठवते तर
'काय बाई सांगू, कसं गं सांगू,
मलाच माझी वाटे लाज काहीतरी होऊन गेलेय आज.' 

या गाण्यात त्यांनी बावरलेली नवयौवना आपल्या आवाजातून तन्मयतेने उभी केली आहे.
मास्टर दीनानाथांचे म्हणजे त्यांच्या वडिलांचे संस्कार त्यांच्यावर लहानपणापासून होतेच. त्यांच्या घरातील वातावरण त्यांच्यावर संस्कार करीत होतेच. शिवाय बडे गुलाम अली खाँ, रविशंकर अशा महान व्यक्तींच्या मैफिली त्या नेहमी ऐकत असत. याशिवाय आईनेही त्यांना खूप शिकविले,


त्यांच्याकडून सतत तालीम करून घेतली, याशिवाय तुलसीदास शर्मा, महाबीरजी, सुमंत मास्तर हे त्यांचे गुरू होते, उषा मंगेशकर यांनी भावगीते, भक्तिगीते, लावण्या अशा विविध धाटणीतील गाणी गायली आहेत. विविध भाषांमधली गाणी त्यांनी गायली आहेत. 'पिंजरा' चित्रपट चालला, त्यातील उषाताईंनी गायलेल्या लावण्या खूप गाजल्या. परंतु स्वतः उषाताईंना लोकगीतांचे प्रकार अधिक आवडतात.


आसामी लोकगीतांची सरावट त्यांना खूप आवर्डले, त्याचप्रमाणे राजस्थानी लोकगीतेही त्यांना रसरशीत व जिवंत वाटतात, म्हणून खूप आवडतात. शास्त्रीय गाण्याचा मात्र रियाज करायला त्यांना जमले नाही, म्हणून त्या शास्त्रीय संगीत गात नाहीत,


'रूणझुणत्या पाखरा, जा माझ्या माहेरा, आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा' किंवा 'प्रीतीचे झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजुळ गाणी' अशा विविध गाण्यांमधून त्यांनी आपली लयकारी स्वर प्रतिमा जपलेली आहे.
उषाताईंच्या गायक या प्रतिमेबरोबरच त्या उत्तम चित्रकार व उत्तम छायाचित्रकारही आहेत. चित्रकलेचा वारसाही त्यांना आईकडून मिळाला. पुढे आचरेकरांकडे शिकून त्या पोर्टेटस् काढू लागल्या.


कार्यक्रम सादर करताना त्या शक्यतो साधा, पांढरा पोशाख करतात. कारण लोकांचे लक्ष पोशाखाकडे जाऊ नये तर गाण्याकडे राहावे, अशी त्यांची धारणा आहे. उषाताई म्हणजे, प्रेमळपणा, प्रसन्नता यांचे विलक्षण रसायन लाभलेले व्यक्तिमत्त्व आहे. भक्तिगीतापासून लावणीपर्यंत सारी गाणी सारख्याच यशस्वीपणे गाणाऱ्या त्या कलासक्त किमयागार आहेत. त्यांनी आपले आयुष्यच कलेला वाहून घेतले आहे, त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व वेगळेपणानेच आपल्यासमोर येते.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद