शाळा नसती तर मराठी निबंध | shala nasti tar marathi nibandh

शाळा नसती तर मराठी निबंध | shala nasti tar marathi nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शाळा नसती तर मराठी निबंध  बघणार आहोत.  हा कल्पनात्मक  प्रकारचा निबंध आहे. पूर्ण जगात जर शाळा नसती तर काय झाले असते हे या निबंधामध्ये सांगितले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


शाळा जणू हसऱ्या फुलांची, आनंद देणारी बाग. स्वच्छंदपणे हुंदडणारी मुले. हसत-खेळत गुरुजींकडून शिक्षण घेणारी मुले. येथे लहान-मोठी सर्वच वयोगटातील मुले एकत्र येतात आणि एकमेकांवर भावंडांप्रमाणे प्रेम करतात. एकता, समता, बंधुता यांचे धडे मिळतात. देशकार्य, समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळते. शाळेतील गुणी मुले जगभर नावलौकिक पसरवतात. तेव्हा धन्य धन्य होते ती आमची शाळा.



शाळा हा मनुष्याच्या आयुष्यातला अविभाज्य घटक. घराच्या चार भिंतींतून आईचे बोट सोडून प्रथमच मूल बाह्य जगात जाते, ते म्हणजे शाळेत. समाजाची छोटी प्रतिकृती म्हणजे शाळा. काही मुलांना शाळा खूप आवडते; तर काही मुलांना शाळेत जायचा कंटाळा येतो. शाळेला सुटी म्हणजे ह्यांच्या आनंदाला उधाण. शाळेत जायच्या वेळेला काही तरी बहाणे शोधून शाळेत जाण्याचे टाळणारी मुले पाहिली की वाटते, शाळाच नसत्या, तर....



सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? 

शाळेभोवती साचून तळे सुटी मिळेल का? 

उद्या आहे माझा गणिताचा पेपर

पोटात माझ्या दुखून, फुटेल का रे ढोपर? 

या बालगीतातून शाळेबद्दलची नावड दिसते ना? मग हवी कशाला शाळा? मुक्त जीवनाचा आनंद शाळेच्या शिस्तीच्या करड्या चौकटीत गुदमरतो. नावडत्या विषयांच्या संगतीत जीव गुदमरतो. शिक्षकांच्या धाकाने मन धास्तावते. दप्तराच्या ओझ्याने खांदा वाकतो. नापास होण्याची भीती झोप उडवते. अशा वेळी वाटते, शाळा नसत्या, तर...


पण तरीही शाळा नसत्या, तर कितीतरी गोष्टींना आपण मुकलो असतो. शाळेतल्या सहली, स्नेहसंमेलने, सहभोजन, विविध स्पर्धा त्यात मिळविलेली बक्षिसे, पाठीवर पडलेली कौतुकाची थाप, जिवाभावाचे सोबती, क्रीडास्पर्धा, प्रदर्शने, कलागुणांना मिळालेला वाव, समाजात कसे वागावे, याचे शिक्षण, झालेले मोलाचे संस्कार, शिक्षकांना दिलेला त्रास, त्यांच्या केलेल्या नकला, गप्पांचा रंगलेला फड, अनेक छंद, देव-घेव - वस्तूंची, विचारांची, अनुभवांची, समाजप्रियता, या आणि अशा कितीतरी गोष्टींना मुकावे लागले असते. 


माणूस म्हणून झालेली जडण-घडण शाळेतच होते. या साऱ्या गोष्टी घडल्याच नसत्या, जर शाळा नसत्या तर....

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद