सिंधुताई सपकाळ निबंध मराठी | sindhutai sapkal essay in marathi

 सिंधुताई सपकाळ निबंध मराठी | sindhutai sapkal essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सिंधुताई सपकाळ  मराठी निबंध बघणार आहोत.  अनाथांची माता समाजाला काहीतरी चांगले देण्याची, त्यांना वळण लावण्याची ताकद असणारे अनेक प्रतिभावंत मराठी मातीत जन्माला आले. त्यांच्या कार्याचा ठसा जनमानसावर पडून त्यांच्या कार्याची दखल समाजाकडून घेतली जाते. स्वकीयांच्या प्रेमाला पारखे झालेल्या, समाजाने झिडकारलेल्या अशा अनेक निरपराध, निराधार लेकरांना मायेच्या स्पर्षाने, जिव्हाळ्याच्या ओलाव्याने आपलेसे करणाऱ्या सिंधूताई सपकाळ म्हणजे अनाथांची माता !
सिंधूताईंचे बालवयातच लग्न झाले. शिक्षणाची आवड असूनही त्यांना शिक्षण घेता आले नाही. अर्धवट शिक्षण, नवऱ्याने धिक्कारले, अशा सिंधूताई पुन्हा अनाथ बनल्या. राहण्यासाठी छप्पर नाही, कोणाचा आधार नाही, पोट भरण्याचे साधन नाही, अशा वेळी वणवण भटकत राहणे त्यांना भाग पडले. थंडीच्या दिवसांत कुडकुडत बसावे लागे. थंडीपासून रक्षण व्हावे म्हणून त्या जळणाऱ्या चितेजवळ जाऊन बसत व त्या ऊबेत राहत. लोक दशक्रिया विधीसाठी भाताचे पिंड करीत. त्या पिंडांचा भात खाऊन त्यांना दिवस काढावे लागले. वाचनाची खूप आवड; पण वाचनासाठी पुस्तके मिळणार कुठून ? मग कसले तरी कागद मिळवून वाचायचे. पाठांतरशक्ती दांडगी; त्यामुळे वाचलेल्या कविता मुखोद्गत होत. बहिणाबाई चौधरी, ग. दि. माडगूळकर यांच्या कविता तोंडपाठ असायच्या. त्या कवितांचा आधार घेत त्या खड्या आवाजात त्या कविता लोकांना म्हणून दाखवीत. भाषणकला अवगत होती. या भांडवलावर लोकांसमोर त्या आपले विचार मांडत. अमेरिकेतल्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून आपले विचार मांडून लोकांना थक्क करणाऱ्या सिंधूताई, म्हणजे खऱ्या धडाडीच्या जिद्दी ! त्या स्वत: चालते-बोलते व्यासपीठ आहेत.त्या अनेक भाषणे करीत आणि लोकांच्या मनाचा ठाव घेत. नंतर 'अनाथांसाठी काहीतरी मदत करा' अशी कळकळीने विनंती करीत. सात-आठशे मुलांची पोटाची सोय करणे सोपे नव्हते; पण तरीही त्यांनी प्रयत्न प्रसन्न सोडले नाहीत. गरुडाचे पंख लाभलेल्या या मातेची झेप उत्तुंग होती. समाजाने दिलेल्या मरतुकड्या दयेवर त्यांनी अनाथांसाठी पहिली संस्था काढली, ती चिखलदरा येथे. वास्तविक जीवितकार्य सांभाळू शकत नाही; म्हणून आत्महत्या करायला गेलेल्या असताना तेथील आदिवासींचे दुःख पाहिले आणि त्यांच्यासाठी जगायचे ठरवून त्यांच्याच साहाय्याने भाकरीच्या बदल्यात मुलांचा सांभाळ करण्याचे आश्वासन त्यांनी त्यांना दिले, अन् ते निभावले. चौथीपर्यंत शिक्षण झालेली ही स्त्री साहित्यसंमेलने कशी असतात, हे पाहण्यासाठी जायची; तेथे संधी शोधायची. संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, बहिणाबाई यांची गाणी म्हणत, भीक मागत त्या खानदेशात पोहोचल्या. भजने म्हणून काहीतरी खायला त्या मिळवायच्या. अशीच भटकंती करताना त्यांना एक मुलगा सापडला. त्याचा शोध घेतल्यावर समजले की, तो सासवडचा आहे. त्या मुलाला घेऊन त्या सासवडला पोहोचल्या. तेथे मुलाच्या आजोबांनी त्या मुलासाठी जमीन ठेवलेली होती. ती जमीन त्यांनी सिंधूताईंना तेथे संस्था सुरू करण्यासाठी दिली.सिंधूताईंना महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार, लता मंगेशकरांकडून आनंदभाई पुरस्कार, सत्पाल मित्तल पुरस्कार, वलुधियाना पंजाबकडून दोन लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला. त्या पुरस्कारच्या रकमेतून त्यांनी हडपसर येथे जमीन खरेदी केली आहे. तेथे त्यांच्या अनाथालयाची, संस्थेची वास्तू साकारतेय.सध्या सिंधूताई पुण्यात वास्तव्यास आहेत. अनाथ लहान मुलांना आईच्या मायेची गरज असते. ती गरज भागावी म्हणून त्यांनी लहान मुलांची सोय पुण्यात केली आहे. मोठी मुले चिखलदरा येथे आहेत. सिंधूताईंनी आपले साऱ्या आयुष्याचे सारे क्षण अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी घालविले. त्यांना खरा जीवनाचा अर्थ उमगला.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद