वृत्तपत्र बंद पडली तर मराठी निबंध | vruttapatra band padli tar marathi nibandh

 वृत्तपत्र बंद पडली तर मराठी निबंध | vruttapatra band padli tar marathi nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वृत्तपत्र बंद पडली तर मराठी निबंध बघणार आहोत. वृत्तपत्रे बंद पडली तर..... वृत्तपत्रे म्हणजे वर्तमानपत्रे एखाद्या दिवशी जरी बंद असली तरी आपल्याला सकाळचा चहा बेचव लागतो. दिवसभर चुकल्या चुकल्यासारखे होते. 


आजकाल वर्तमानपत्र हे इतके महत्त्वाचे स्थान पटकावून बसली आहेत की वर्तमानपत्राशिवाय चहा घशाखाली उतरतच नाही. मग नवरोजी जातात वर्तमानपत्रात बुडून आणि बायकोला सारखे सांगावे लागते, "अहो, जरा पेपर बाजूला ठेवा. मी काय सांगते, ते ऐका.' वर्तमानपत्रे बंद पडली तर हे दृश्य बदलून जाईल. तसेच नवरोजींना रविवारी दुपारी आरामसे झोपता येईल. कारण वर्तमानपत्रेच नसल्याने राणीसरकार त्यांना नाटकाला जाऊया असे म्हणणार नाहीत. 


वर्तमानपत्रे नसतील तर भविष्याचे वेड असणाऱ्यांना आपले भविष्य वाचायला मिळणार नाही. क्रीडारसिकांना निरनिराळ्या मॅचेसमध्ये कोणाची हारजीत झाली वगैरे काही कळणार नाही. वयोवृद्ध आजोबा निरनिराळी वर्तमानपत्रे वाचून आपला वेळ कारणी लावत असतात, त्यांना वृत्तपत्रे नसतील तर काय करावे असा पेच पडेल. वर्तमानपत्रच नसेल तर ते नेण्यावरून होणारी दोन शेजाऱ्यांमधील भांडणे कशी होतील? 


वर्तमानपत्रे नसतील तर रद्दीच जमा होणार नाही व "बाळ्या, अरे रद्दी देणारेस तरी केव्हा?" अशी आईची बोलणी खावी लागणार नाहीत. रेल्वेच्या डब्यात वर्तमानपत्रातील बातम्या वाचून तावातावाने चालणाऱ्या चर्चा बंद होतील.



परंतु ही झाली गमतीची बाजू. पण खरे पाहिले तर आजच्या गतिमान जीवनात वर्तमानपत्राला विलक्षण महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत साऱ्यांना वर्तमानपत्र हवेहवेसे वाटत असते. वर्तमानपत्राच्या वाचनाने माणसाला बहुश्रुतता येते. सर्व जगातील घडामोडी घरबसल्या माणसाला कळतात नि त्या सुद्धा अत्यल्प किमतीत! 


वर्तमानपत्रात जशा दैनंदिन घडामोडींच्या बातम्या असतात, तशीच अनेक महत्त्वाच्या विषयांवरील माहितीही असते. अग्रलेख, स्फुटलेख हे वाचून माणूस आपल्या ज्ञानात भर घालू शकतो. वर्तमानपत्रातील लेखांमधून समाजाचे मन घडवले जाते. निवडणुकांच्या काळात तर आपल्याला प्रत्येक उमेदवाराचे विचार वर्तमानपत्रांमधून समजतात.


 वर्तमानपत्रे नसतील तर या साऱ्या गोष्टींना आपल्याला मुकावे लागेल. - वृत्तपत्रे नसतील तर बेकार तरुणांना 'पाहिजेत'च्या जाहिराती मिळणार नाहीत, उद्योग-व्यवसायिकांना होतकरू तरुण मिळणार नाहीत, वधूवर संशोधन करणाऱ्यांना त्यासंबंधीची माहिती मिळणार नाही, हवामानाचे, वेधशाळेचे अंदाज कळणार नाहीत, नवी पुस्तके, नवे साहित्य यांच्याबद्दल वाचायला मिळणार नाही. 


हल्ली तर वृत्तपत्रांच्या आठवड्यातून दोन-तीन पुरवण्या निघत असतात. त्यातून गायक कलाकार, सिनेसृष्टी, स्त्रियांचे आरोग्य, योगासने, चटकदार खाद्यपदार्थ अशा अनेक विषयांवर माहिती मिळत असते. वृत्तपत्रे नाहीत म्हटले की हे सारे आपल्याला मिळणार नाही.

वृत्तपत्रे नसतील तर विविध प्रकारच्या जाहिरातींचा आपल्यावर होणारा मारा थांबेल. पण कोणा रुग्णाला रक्त हवे असेल, कोणाला व्यक्तिगत संदेश द्यायचा असेल, तर तेही वृत्तपत्रे नसल्यास शक्य होणार नाही.

तेव्हा वर्तमानपत्रे बंद पडली तर आजच्या युगात माणसाचे काही चालणार नाही. म्हणून वर्तमानपत्रे ही हवीत, हवीत आणि हवीतच!!

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद