मी झरा बोलतो मराठी निबंध | essay on mi zara boltoy in marathi

 मी झरा बोलतो मराठी निबंध | essay on mi zara boltoy in marathi

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  मी झरा बोलतो मराठी निबंध बघणार आहोत.  हा एक कल्पनात्मक स्वरूपाचा निबंध आहे.  ज्यात झरा स्वतःचे मनोगत मांडत आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.



तहान भागवीत पशु पक्षांची, आनंदतो मनातून, आपण ओळखलत मला?  माझा जन्म एका टेकडीच्या पायथ्याशी झाला.पायथ्या शेजारचे माझे रुप तर अगदीच छोटे आहे. तेथून मी फार वेगाने खाली येतो. माझ्या वाटेत पुन्हा एक छोटी टेकडी लागते; तिला वळसा घालून मी पुढे निघतो. वाटेत अनेक वळणे घेत मी पुढे जातो. मध्ये एका ठिकाणी मी खडकावरुन उडी मारुन खाली वाहतो. उडी मारण्याचा माझा आवाज वातावरणात संगीत उत्पन्न करतो. 


माझं ते सुंदर रुप, शुभ्र रुप पाहण्याचा जेवढा आनंद तुम्हाला होतो तेवढाच मला सुध्दा होतो. माझ्या काठावरील हिरवीगार झाडे, वेली, विविध फुलांच्या वनस्पती, अगदी ताजी टवटवीत दिसतात. कारण त्यांची पाण्याची तहान मी भागवितो. तहानेने व्याकूळ पशू , पक्षी जेंव्हा पाणी पिऊन तृप्त होतात तेंव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मला सुध्दा समाधान मिळते. कीटक, फुलपाखरे, पक्षी, मधमाशा,सतत माझ्या अवतीभोवती असतात. मला सुध्दा त्यांचे सान्निध्य आवडते. 


कुणी वाटसरु माझे निर्मल पाणी पाहून आनंदित होतो. त्याने सोबत आणलेली शिदोरी खाऊन व पाणी पिऊन तो तृप्तीचा ढेकर देतो तेंव्हा मलाही माझे पोट भरल्यासारखे वाटते. मित्रांनो, सर्वच क्षण सुखाचे असतात असे नव्हे. कधी कधी दुःखाचे सुध्दा क्षण येतात. 


जेंव्हा कुणी माझं पाणी दुषित करतो, तेंव्हा मला दुःख होते. तसेच उन्हाळ्यात माझे जीवनच संपुष्टात येते तेंव्हा तर मला अतीच दुःख होते. कारण माझी खरी गरज उन्हाळ्यात जास्त असते परंतु मी त्यावेळेस मदत करु शकत नाही. त्यामुळे मला प्रतीक्षा असते ती पावसाळ्याची. तोपर्यंत माझं सुकून गेलेलं रुप मला असह्य होतं. मी पूर्ण सुकून जाण्यापूर्वी जागोजागी खंडित होतो. माझे पाणी दुर्गंधीयुक्त होते. त्या वेदना मला नकोशा होतात. कारण सृष्टीचा नियम चरैवेति, चरैवेति.... आहे. थांबला तो संपला. पाणी वाहत असतांना माझी व माझ्या मोठ्या बहिणीची म्हणजे नदीची सतत भेट होत असते. 


खंड पडल्यामुळे आमची भेटगाठ बंद होते. त्यामुळेही मी दु:खी होतो. परंतु असे असले तरी धीर मात्र सोडत नाही. कारण मी उद्याच्या आशेवर जगणे शिकलो आहे. दुःखामागे सुख व सुखामागून दुःख येत राहणार. दुःखाची पर्वा न करता त्याला धैर्याने सामोरे जाणे हेच यशस्वी जीवनाचे सूत्र आहे. शेवटी एक सांगावेसे वाटते की,

सुख दुःख हे तर सोबती जन्माचे जनसेवा हेच सार्थक जीवनाचे !

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद