जंगलात घालवलेला एक दिवस मराठी निबंध | janglat ghalvilela ek divas essay in marathi

 जंगलात घालवलेला एक दिवस मराठी निबंध | janglat ghalvilela ek divas essay in marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जंगलात घालवलेला एक दिवस मराठी निबंध बघणार आहोत. रत्नागिरी ते कोल्हापूर अवघा चार-पाच तासांचा प्रवास. पण त्या प्रवासाला आम्हाला तब्बल चाळीस तास लागले. पावसाळ्याचे दिवस होते. सूड उगवावा तसा पाऊस कोसळत होता. अगदी अत्यावश्यकच म्हणून प्रवास करणारे असे आम्ही एस्. टी.त सातजणच होतो. आठवा कंडक्टर व नववा ड्रायव्हर.


पावसाशी टक्कर देत देत ड्रायव्हरनं आंबा घाटातून गाडी कशीबशी खाली आणली. पण समोर वेगळेच संकट उभे राहिले होते. आसपासच्या गावातील नद्यांचे पाणी रस्त्यावर येऊन रस्त्यावर आठ-दहा फूट पाणी आत आलं होतं. त्यातून एस्. टी. बस नेणं म्हणजे आपणहून मृत्यूच्या सापळ्यात उडी घेण्यासारखं होतं. म्हणून गाडी थांबवून आकाशातून बरसणाऱ्या मेघांकडे आणि डोंगर, दऱ्या व समोर पसरलेल्या पावसाच्या पाण्याच्या महासागराकडे बघत राहण्यावाचून आम्ही काहीच करू शकत नव्हतो.


काही वेळ गेल्यावर आमच्या गाडीतून कोणीतरी स्फुदून स्फुदून रडत असल्याचा आवाज आला. आणि खरंच एक बाई आपल्या दोन मुलांसह रडत होत्या. कारण रत्नागिरीला राहणारी त्यांची आई अत्यवस्थ होती म्हणून ती सर्वजण रत्नागिरीला निघाली होती. परंतु सर्वजण मध्येच अडकून पडली होती. दुपारचे बारा वाजले तेव्हा मात्र सर्वांना खूप भूक लागली.  दूर अंतरावर काही झोपड्या दिसत हात्या. काही खायला किंवा चहा तरी मिळेल का बघायला त्या बाईंना तिच्या मुलांसह व पतीसह एस. टी.त बसवून आम्ही बाहेर पडलो.


रस्त्यातून चालणं फारच कठीण होतं. छत्रीचा   उपयोग काठीसारखा करत आम्ही चालू लागलो. दोन-तीन तास चाललो तरी झोपड्या पूर्वीइतक्याच दूर वाटत होत्या.  सभोवतीची हिरवी राने, झाडे, वनं, डोंगर पाहून पायाला थकवा जाणवत नव्हता. एवढ्यात दोन-चार पांढरेशुभ्र कापसाचे गोळे पळत गेल्यासारखे वाटले. ते तर ससे होते. पावसाचं पाणी बिळात घुसलं म्हणून ते बाहेर आले असावेत. 


तसेच पाण्यात कितीतरी पाणसाप दिसत होते. काही अंतर चालून गेल्यावर थोडीशी हिरवळ असलेला सपाट भाग लागला. हिरवळीतून काही तरी सळसळल्यासारखं वाटलं. पाहतो तो नाग-नागिणीची जोडी! पिवळाधमक नाग व तशाच रंगाची नागीण, नवविवाहित जोडप्यानं फिरायला जावं त्या थाटात ती दोघं चालत गेली. थोडं आणखी चालल्यावर आमच्या बाजूनं मोर धावत जाताना दिसला. त्याचं सुंदर रूप पाहून मन सुखावलं.


पुढे आणखी अर्धा तास चालल्यावर एखादा कडा कोसळावा तसं काही कोसळताना दिसलं. आम्हाला वाटलं दरड कोसळली असावी. म्हणून जाऊन बघतो तो एक अजगर व मुंगूस खाली खोल पाण्यात पडले होते. अजगराचे प्रचंड धूड एखाद्या कड्यासारखेच वाटले. दुरूनच त्यांचे भांडण  पाहिले. नंतर दोघेही लढत लढत दुर  गेले. कोणीच हार मानायला तयार नव्हतं.


अशा प्रकारे अनुभव घेत घेत आम्ही त्या झोपड्यांजवळ आलो. आत जाऊन बघतो तर काय? आत कोणी नव्हतं. शेतातला तो गोठा किंवा खोप होती. पोटातील भूक, थकलेले पाय व निराशा यांनी पुढे जाणं शक्यच नव्हतं. म्हणून सर्वजण त्या खोपीत बसलो. विश्रांती घेतली. आता परत जाण्यावाचून गत्यंतर नव्हतं. म्हणून आम्ही परत जाऊ लागलो, तर मघाचाच रस्ता शोध शोध शोधला तरी सापडेना. शेवटी परत त्या खोपीकडे फिरायचे असे ठरवून आम्ही चालू लागलो. 


चांगलीच रात्र झाली होती. पोटातील भूक स्वस्थ बसू देत नव्हती. जवळपास पाण्याचा झरा असल्यास पाणी प्यावं म्हणून आम्ही पाण्याचा शोध घेत चालत होतो. तेवढ्यात काही अंतरावर बॅटरीसारखं काहीतरी दिसलं. दोन लहान बॅटऱ्या सारख्या अंतरावर पेटल्यासारख्या दिसत होत्या. कसला बरं प्रकाश? असा आम्ही विचार करतच होतो. एवढ्यात आकाशात वीज चमकली


समोरचं दृश्य पाहून आमची भीतीनं गाळण उडाली. कारण ते वाघाबा हा पिवळाधमक रंग, त्यावरचे अंगभर पट्टे. धारदार नजर असलेले डोळे व जबडा. काय देखणं रूप होतं. हिरव्या पार्श्वभूमीवर व समोर वाहणाऱ्या पांढऱ्या जलाशयासमोर ते फारच उठून दिसत होते. आम्ही पुढे जात होतो. इतक्यात, 'अरे, वाघ... पळा पळा' असे आमचे ड्रायव्हर ओरडले. मग जिवाच्या आकान्ताने आम्ही त्या झोपडीच्या दिशेकडे सर्वजण पळालो. सुमारे अर्धा-पाऊण तास धावल्यावर नशीब ती झोपडी सापडली.


 मग दार नसलेल्या त्या झोपडीत सर्वजण एका कोपऱ्यात, वाघ तर येणार नाही ना, या भीतीनं उभे होतो. भीतीनं सर्वांची तोंडं कोरडी पडली होती. परंत बाहेर जाऊन पावसाचं पाणी पिण्याची कोणाचीही छाती नव्हती. इंद्रियांची सर्व जाणीवच नाहीशी झाली होती. सर्व रात्र डोळ्यांतच काढली.


सकाळ होताच सर्वजण खोपीच्या बाहेर पडलो. समोर उंचावर आमच्या एस्. टी.चा लाल ठिपका दिसत होता. तिच्याकडे नजर ठेवत ठेवत मार्ग काढू लागलो. तेवढ्यात डाव्या बाजूने एक रानडुक्कर  पळत गेले. नशीब त्याच्या मार्गात आम्ही नव्हतो. नाहीतर आमची धडगत नव्हती. तब्बल दोन-तीन तास चालल्यावर आम्ही आमच्या एस्. टी. जवळ आलो. 


एस्. टी.तलं कुटुंब प्रथम त्यांच्या आईच्या काळजीनं दुःखी होतं. नंतर त्यात आमच्या काळजीनं त्यांचा जीव पार उडून गेला. आम्हाला सुरक्षित पाहून त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रु आले. मुले बिचारी रडून रडून झोपली होती. तोपर्यत पाणीही ओसरलं होतं. मग ड्रायव्हरने आपल्या स्टियरिंगला  ताब्यात घेतलं व स्टियरिंग असं फिरवलं, की रत्नागिरी आल्यावरच ते थांबवलं!

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत