क्रिडांगणाचे मनोगत मराठी निबंध | kridangana che manogat marathi essay

 क्रिडांगणाचे मनोगत मराठी निबंध |  kridangana che manogat marathi essay


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण क्रिडांगणाचे मनोगत  मराठी निबंध बघणार आहोत. हा एक कल्पनात्मक प्रकारचा निबंध आहे. या निबंधामध्ये एक व्यक्तीप्रमाणे आपले सुख दुःख सर्वासमोर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे .  या बद्दल आणखी माहिती घेऊया आणि सुरुवात करूया निबंधाला   


 माझे अस्तित्व असल्याशिवाय तुमचं शरीर, स्वास्थ सुदृढ राहणार नाही. बालकांचा योग्य शारीरिक विकास व्हावा तसेच तरुणांना व्यायामाची सवय लागावी यासाठी प्रत्येक गावात सार्वजनिक क्रीडांगणे असावीत तसेच प्रत्येक शाळेत क्रीडांगण असावे. ही काळाची गरज आहे. 


आज काही गावात क्रीडांगणे आहेत अर्थात माझे अस्तित्व आहे परंतु माझा लाभ घेणारे कमी आहेत. कित्येक दिवस माझ्याकडे फिरकून सुध्दा कुणी पाहत नाही. कधी रात्री बेरात्री काही दारुडे येतात व दारु पितात. ते पाहून मला मात्र खूप राग येतो कारण माझा उपयोग शरीर सुदृढ करण्यासाठी न करता शरीराची हानी करण्याकरिता केला जातो.


पूर्वी खेळांना चांगलं महत्त्व होतं तेव्हा माझं पण महत्त्व होतं. परंतु गेल्या काही वर्षात मुला-मुलींनी माझ्याकडे पाठ फिरविली. आजची पिढी टी.व्ही., मोबाईल, व्हि.डिओ. गेम, संगणक, फेसबुक, इंस्टाग्राम यातच गुंतून पडली आहेत. तसेच हे युग स्पर्धेचे असल्यामुळे बरेच पालक आपल्या पाल्याला ट्युशन तथा विविध क्लास यामध्ये गुंतवून ठेवतात. त्यामुळे माझ्याकडे खेळायला यायला कुणालाच वेळ नाही. 


परंतु यामुळे त्यांचे शरीर स्वास्थ दिवसेंदिवस बिघडत आहे. लहानपणातच मोठे पोट दिसणे, चष्मा लागणे, लवकर थकणे, धावता न येणे, ही सर्व लक्षणे खेळ न खेळण्याचा परिणाम आहे. शरीराला केवळ बौद्धिक श्रमाचीच नव्हे तर शारीरिक श्रमाची सुध्दा गरज आहे. मैदानी खेळ खेळल्याने भरपूर व्यायाम होतो. 


भारतातील सर्वच बालकांचे शरीर स्वास्थ रहावे असे मला मनापासून वाटते. त्याकरिता मी खेळाडूंची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. खेळाडूंशिवाय मला करमत नाही. आईला जसे आपल्या बाळाशिवाय करमत नाही. तसे खेळांडूशिवाय मला करमत नाही.


खेळाची ज्यांना आवड आहे असे मोजकेच खेळाडू माझ्याकडे खेळायला येतात. माझ्या अंगाखांद्यावर खेळणारा एखादा खेळाडू जेंव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतो तेंव्हा माझा आनंद गगनात मावेनासा होतो व माझ्या अस्तित्वाचे सार्थक झाल्याचे समाधान लाभते. भारत हा १२० कोटी लोकसंख्या असलेला देश आहे परंतु ऑलिम्पिक मध्ये एवढ्या मोठ्या देशाला मोजकेच सुवर्ण पदक मिळतात हे ऐकून मला दुःख होते. मला केवळ शोभेची वस्तू बनून राहणे पसंत नाही. 


माझा जास्तीत जास्त बालकांनी खेळण्याकरिता उपयोग करवा ही अपेक्षा आहे. असे म्हणतात की, “जर पैसा हरविला तर फारसे काही नुकसान होत नाही परंतू शरीर संपत्ती हरविली तर सर्व काही हरविले असे समजावे". म्हणून शरीर संपत्ती टिकवायची असेल तर व्यायाम व मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. ' 


भारतात बोटावर मोजण्या इतकीच आंतरराष्ट्रीय खेळाडूंची संख्या आहे. ती भरभर वाढून भारत देशाचे खेळ जगतात एक नंबरवर असावे असे मला वाटते. त्याकरिता मी सर्व बालक व तरुणांना आवाहन करतो “हे बालकांनो, तरुणांनो या आणि मन लावून खेळा व माझे नाव जगभरात पसरवा".

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद