माझा आवडता विषय मराठी निबंध | maza avadta vishay marathi nibandh

 माझा आवडता विषय मराठी निबंध | maza avadta vishay marathi nibandh


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  माझा आवडता विषय मराठी निबंध बघणार आहोत.   तसे तर शालेय जीवनात आपण भरपूर विषय आपण वाचत असतो परंतु त्यातील काही आपले खूपच  आवडते असतात आणि त्यातील काही विषय आपण जर काळजीपूर्वक वाचले असता ते आपल्या जीवनाला नवे वळण देऊ शकतात. जसे कि  इतिहास. जेव्हा आपण भारताचा इतिहास वाचतो तेव्हा किती वेळा  मोगलांचे  आक्रमण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवण्यासाठी किती बलिदान केले . व आपण इतिहास कोणत्या चुका केल्या ज्या आज करायला नको या प्रकारची  माहिती या निबंधामधून तुम्हाला वाचायला मिळेल चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


माझा आवडता विषय (इतिहास) जीवनात विद्येला विशेष महत्त्व आहे. विद्येखेरीज जीवन अपूर्ण वाटते. जीवनाला प्रकाशमय बनविण्यासाठी आपण शिकले पाहिजे. कोणाला साहित्य आवडते तर कोणाला शास्त्र. पण मला इतिहास शिकण्यात विशेष रस आहे. 


इतिहासाचा अर्थ आहे घडून गेलेल्या घटना, प्रसंग, व्यक्तीचे कालक्रमानुसार वर्णन. इतिहासात थोर लोकांबद्दलची माहिती असते. कार्य, शोध, युद्ध, प्रगती यात त्यांचे योगदान काय? याबद्दल इतिहास माहिती सांगतो. इतिहास आपली विचार करण्याची शक्ती विकसित करतो. भूतकाळात आपण कसे होतो? आणि वर्तमान काळात आपण कसे आहोत हे दाखवितो. इतिहास ज्ञानाशिवाय योग्य निर्णय घेता येत नाही. 



भारतीय इतिहास वाचण्यात मला खास रस आहे. कारण यात सिंधू संस्कृतीबद्दल माहिती मिळते. आर्य भारतीय होते हे ज्ञान आपणास इतिहासापासूनच मिळते. भारतात जैन आणि बुद्ध धर्माचा उदय, सिकंदरचे भारतावर आक्रमण, इस्लामचे भारतात आगमन, गझनीच्या मोहंमदाने सोमनाथाचे मंदिर लुटणे व भारतावर १७ वेळेस आक्रमण करणे, मोहंमद घोरीचे भारतात आगमन, गुलाम वंश, खिलजी साम्राज्य, तुघलक साम्राज्य, बाबराद्वारे मोगल साम्राज्याचा पाया घातला जाणे, अकबर, जहांगीर, शहाजहान व औरंगजेबाचा शासनकाळ, मोगल साम्राज्याचे पतन, छत्रपती शिवाजी महाराजांची राजवट, या सर्वांबदलची माहिती आपल्याला इतिहासामुळेच मिळते. सोन्याचा धूर जेथे निघत होता तो भारत देश कफल्लक कसा झाला हे इतिहासच आपणास सांगतो. 


भारताला इंग्रजांनी लुटले.  आपल्या स्वार्थासाठी त्यांनी अनेक प्रकारचे अत्याचार केले. जे वाचून आपला थरकाप उडतो. इंग्रजांच्या पारतंत्र्यापासून आपला देश स्वतंत्र करण्यासाठी कित्येक महापुरुष स्वातंत्र्य चळवळीत उतरले. त्यात लाला लजपतराय, सुभाषचंद्र बोस, राजगुरू, सुखदेव, भगतसिंह, महात्मा गांधी, पं. नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादींचा समावेश आहे. महिला पण या कार्यात मागे नव्हत्या.



इतिहास आपणास केवळ कोणते राजे आले. आणि कोणते राजे गेले यांचीच माहिती देतो असे नसून त्यांच्या शासन काळात कोणकोणती युद्धे लढली गेली व इतिहासात अमर झाली त्यांची पण माहिती देतो. उदाहरणार्थ बक्सरची लढाई, पानिपतचे युद्ध, १८५७ चे स्वातंत्र्य समर इ. इतिहासामुळे आपणास युध्दाखेरीज तत्कालीन राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, परिस्थितीबद्दलसुद्धा माहिती मिळते. त्याचप्रमाणे शिक्षण पद्धती, धर्माचा प्रचार आणि प्रसार, राहाणीमान, भोजन, वस्त्र, कला, संस्कृतीचेही ज्ञान मिळते. त्या काळातील साहित्य आजही याची साक्ष देते. 


प्रेमाचे प्रतीक ताजमहल, लेण्या, लाल किल्ला, सिंधु दुर्ग यासारख्या ऐतिहासिक इमारती आजही पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात व आपल्या काळातील संस्कृतीचे जिवंत उदाहरण आपल्यासमोर सादर करतात. इतिहासात आपणास सर्व वर्णने नाव तिथीनिशी मिळतात. त्यामुळे इतिहास रोचक व प्रामाणिक बनतो. इतिहास व्यक्ती आणि राष्ट्राची प्रगती दर्शवितो. आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुका पुन्हा न करण्याची प्रेरणा देतो. आपला ज्ञानसंग्रह वाढविण्यासाठी माझ्या दृष्टीने इतिहास सर्वात चांगला विषय आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद