माझी इच्छा मराठी निबंध | mazi abhilasha essay in marathi

  माझी इच्छा मराठी निबंध | mazi abhilasha essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  माझी इच्छा (अभिलाषा) मराठी निबंध बघणार आहोत.  जगात क्वाचितच कोणी अशी व्यक्ती असेल की, जिला कोणत्याही प्रकारची इच्छा नसेल. कुणाला यशाची तर कुणाला धनाची इच्छा असते. कुणाला नेता तर कुणाला लेखक व्हावेसे वाटते. कुणी सिने कलावंत बनू इच्छितो. कुणी डॉक्टर इंजिनियर, व्यापारी बनून अपार धन आणि यश मिळवू इच्छितो. कुणी सैनिक बनून महान योद्धा बनू इच्छितो. 


माझी अशी इच्छा आहे की मी एक चांगला शिक्षक बनावे. मला लहानपणापासून शिकविण्याची आवड आहे. परीक्षेच्या काळात मी माझ्या लहान भावंडांना शिकवितो तसेच माझ्या मित्रांच्या अभ्यासातील अडचणी सोडविण्यात त्यांना मदत करतो. शिक्षक बनणे हा माझा दृढ संकल्प आहे. याचे कारण असे की राष्ट्र निर्मिती व विकासाची जबाबदारी शिक्षकावरच असते. 


आपल्या परिश्रमाने शिक्षक दरवर्षी शेकडो बालकांचे जीवन निर्माण करतो. त्यांच्या जीवनाला दिशा देतो. आपल्या पायावर उभे रहाण्याची शक्ति देतो. हे एक पुण्यकर्मच आहे. शिक्षकांकडे पुरेसा वेळ असतो. दिवाळीच्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळतात. या सुट्ट्यांमध्ये ते समाजसेवाही करू शकतात.


शिक्षक बनण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागेल. पदवी शिक्षणानंतर बी.एड. ची पदवी मिळवावी लागेल. त्यानंतर निरनिराळ्या शिक्षण संस्थांतून होणाऱ्या निवड प्रक्रियेतून जावे लागेल. यासाठी मी कठोर परिश्रम करण्याचे ठरविले आहे. शिक्षकाचे कार्य एका दिव्याप्रमाणे आहे. तो सर्वांना मार्ग दाखवितो. केवळ पदव्या मिळविणे शिक्षकासाठी पुरेसे नाही. शिक्षकाचे जीवन म्हणजे एक तपश्चर्याच असते. चारित्र्याच्या दृष्टीने तो संपन्न असला पाहिजे. आदर्श शिक्षकच विद्यार्थ्यांसमोर आदर्श बनू शकतो.



विद्यार्थ्यांना त्यांचे क्रमिक विषय शिकविण्याबरोबरच नैतिकदृष्ट्या त्यांना परिपूर्ण बनविणे नितांत आवश्यक आहे. त्यांच्या अंगी शिस्त बाणविणे ही शिक्षकाची जबाबदारी आहे. त्यांच्या जीवनाचा सर्वांगीण विकास करणे हे शिक्षकाचे काम असते. असाच एक शिक्षक बनण्याचा प्रयत्न मी करणार आहे. माझा असा विश्वास आहे की मी माझे उद्दिष्ट साध्य करेनच. त्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करण्याची माझी तयारी आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद