मी अर्थमंत्री झालो तर निबंध मराठी | mi arthamantri zalo tar marathi nibandh

मी अर्थमंत्री झालो तर निबंध मराठी |  mi arthamantri zalo tar marathi nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी अर्थमंत्री झालो तर  मराठी निबंध बघणार आहोत.  मित्रांनो मोठे झाल्यावर काय बनायचे याबाबत प्रत्येकजण आपआपली स्वप्न रंगवुन ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो . जेव्हा एक सर्वसामान्य मुलगा देशाचा अर्थमंत्री होऊ पाहत असेल तेव्हा तो देशात काय बदल करू इच्छितो यावर आधारित हा निबंध आहे चला तर मग सुरुवात करूया निबंधाला. 


परवाच दूरदर्शन (T.V.) वरून केंद्रीय अर्थसंकल्प' सादर करण्यात आला. आम्ही सगळेच दूरदर्शनकडे डोळे आणि कान लावून बसलो होतो. 'अर्थसंकल्प' ऐकताना मात्र एखादया वस्तूची वाढलेली किंमत ऐकून, वाढलेले गाडीभाडे ऐकून आपल्याच पाकिटाला हिसका बसल्यासारखे वाटत होते. अर्थसंकल्पातल्या अनेक गोष्टी पटत नव्हत्या आणि मग वाटत होते, 'मीच अर्थमंत्री झालो तर-'


मी अर्थमंत्री झालो तर देशावर असलेले कर्ज माझ्या प्रत्येक योजनेद्वारे कमी करण्याचा प्रयत्न करीन. मी वास्तवाला अनुसरून 'पंचवार्षिक योजना' आखीन आणि त्यातून व्यक्तीचा व राष्ट्राचा विकास साधण्याचा प्रयत्न करीन. आपल्या देशात 'बेकारी' ही फार मोठी समस्या होऊन बसली आहे. मी अर्थमंत्री झालो तर आधी देशातील बेकारी नाहीशी करण्याला प्राधान्य देईन. ते करण्यासाठी गिरण्या, मच्छीमार उदयोग, खाण उदयोग यांचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करीन. मी छोट्या उदयोगधंदयांना प्रोत्साहन देईन. 


प्रत्येक बेकार व्यक्तीला कामधंदा मिळवून देण्याची व्यवस्था करीन. दळणवळणाच्या सोयी वाढवणे व वाहतुकीसाठी नवीन बंदरे उपलब्ध करणे हाही माझ्या योजनेचा एक प्रमुख भाग असेल. ज्यामुळे व्यापाराची भरभराट होईल व देशाची आर्थिक स्थिती सुधारेल.



अर्थव्यवस्थेत वस्तूंवरील करांचा बारकाईने विचार करावा लागतो. कारण करांच्या रूपाने सरकारी तिजोरीत भर पडते व त्यातूनच जनतेला सुखसोयी पुरवता येतात. देशातील सामान्य माणूस सुखी असावा, ही गोष्ट देशाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची असते. त्यासाठी त्याच्या मूलभूत गरजा भागवाव्या लागतात. हे लक्षात घेऊन मी जीवनावश्यक वस्तूंवर अगदी अल्प कर ठेवीन किंवा काही वस्तू करमुक्तच ठेवीन. ती तूट भरून काढण्यासाठी चैनीच्या वस्तूंवर व मादक पदार्थांवर जास्तीत जास्त कर लावीन. 


करमणुकीवरचा कर मात्र मी पूर्णपणे रद्द करीन. माणसांना विरंगुळा हवा असतो; तो मिळाला की माणूस वाईट मार्गाकडे वळत नाही. आजकाल विक्रीकर व प्राप्तिकर बुडवण्याची अनिष्ट प्रवृत्ती बोकाळली आहे. शेअर बाजार, बँका या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. मी सर्व गुन्हेगारांना कडक शासन देईन.


आयात-निर्यात कर अगदी अल्पप्रमाणात ठेवीन. तसेच व्यापारासाठी परवाना देण्याच्या पद्धती शिथील करीन. यामुळे निश्चितच आंतरराष्ट्रीय व्यापाराची भरभराट होईल. मी इतर देशांशी केवळ खरेदीविक्रीच्या पातळीवरील संबंध न ठेवता, इतर देश आपल्या उदयोगधंदयांत जास्तीत जास्त भांडवल कसे गुंतवतील, हे मी बघेन व त्यांच्या देशातील उदयोगधंदयांतही आपल्या देशाचे भांडवल गुंतवीन. हे सारे करत असताना रुपयाचे अवमूल्यन मी कटाक्षाने टाळीन. त्यामुळे मी माझ्या जनतेचा विश्वास संपादन करीनच; पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही माझ्या देशाला मानाचे स्थान मिळवून देईन.



माझा देश कर्जमुक्त झालेला बघणे, हे माझे एक स्वप्न आहे. 'मी अर्थमंत्री झालो' तर माझ्या देशातील सामान्य माणसाला सुखी करणे व देशाला कर्जमुक्त करणे, हे माझे प्रमुख ध्येय राहील.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


महत्‍वाचे मुद्दे : 
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • देशावरील कर्ज कमी करीन
  • पंचवार्षिक योजनांद्वारे व्यक्तीचा व राष्ट्राचा विकास साधण्याचा प्रयत्न करीन
  • बेकारी नष्ट करण्याचा प्रयत्न
  • उदयोगधंदयाच्या विकासाकडे लक्ष
  • दळणवळणाच्या सोयी वाढवणे
  • व्यापाराचा विकासकररचनेचा पुनर्विचार
  • जीवनावश्यक बाबींवर कमी कर
  • आर्थिक गुन्हेगारांना कडक शासन
  • परकीय गुंतवणूक वाढवण्याकडे लक्ष
  • आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देशाला मानाचे स्थान मिळवणे
  • देशाला कर्जमुक्त करणे