संत गाडगेबाबा मराठी निबंध | sant gadge baba essay in marathi

संत गाडगेबाबा मराठी निबंध | sant gadge baba essay in marathi

 मराठी निबंध 1 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण संत गाडगेबाबा मराठी निबंध बघणार आहोत. गाडगेबाबा एक खरे विरक्त व्यक्तिमत्व, अनासक्त व्यक्तिमत्व, ज्यांना कशाचीही आसक्ती नव्हती. ज्यांनी स्वत:च्या नावावर काहीही खरेदी करुन ठेवले नाही. ज्यांची वैयक्तिक स्थावर किंवा जंगम मालमत्ता नाही. महापुरुष असेच असतात त्यांच्याकडे संपत्ती नसते परंतु त्यांचे विचार आणि कृती ही लोकांसाठी कोणत्याही संपत्तीपेक्षा कमी नसते.


 आजही काही भोंदू बाबा आहेत ज्यांच्या नावावर भरपूर संपत्ती, गाड्या, विविध वाहने, जमिनी आहेत आणि ते स्वत:ला भगवान म्हणवून घेतात. भगवान म्हणजे ज्याने आपल्या सर्व इच्छा मारल्या आहेत असा व्यक्ती. या व्याख्येनुसार आज एकही बाबा  भगवान या  पदास लायक नाही असेच दिसून येते.



गरजेच्या वस्तूशिवाय जास्तीचा संग्रह ठेवण्यास गाडगे बाबांची मनाई होती.विचारवंतानी समाजवाद,साम्यवाद सांगितला तो गाडगेबाबांनी प्रत्यक्ष अंमलात आणला.गीतेमध्ये अनासक्त व्हा असे सांगितले परंतु भल्या भल्या बाबांना जे जमलं नाही ते गाडगेबाबांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं. मुलगा गोविंदा च्या लग्नात भोजन, वाजंत्री, हुंडा, आहेर, मानपान काहीच नव्हते. खरेखुरे आदर्श लग्न लावून आदर्श लग्नाची संकल्पना गाडगेबाबांनी अंमलात आणली. 



एकदा बाबा मुर्तीजापूर वरुन मुंबईला निघाले.सोबत त्यांच्या पत्नी, मातोश्री कुंताबाई होत्या. त्यांनी सोबत तीन चार लुगडी, भाकरीची शिदोरी, पायलीभर पीठ बांधून घेतलं बाबांच्या लक्षात आलं. त्यांनी शिदोरी सोडली भिकाऱ्यांना वाटली. पीठ देऊन  टाकले. मातोश्री केवळ बघत राहिल्या. 



बाबा म्हणाले, “खाली हात असलं म्हणजे चांगलं असते, कशाची चिंता राहत नाही." माझा संसार, माझी बायको, माझी मुले, माझी संपत्ती ह्या भौतिक सुखाला सामान्य माणूस खरे सुख मानून चिटकुन असतो. गाडगेबाबा ह्या भौतिक सुखाला चीटकले नाहीत. 



रत्नागिरी जिल्ह्यात कीर्तनाला गेले असता बाबांना निरोप मिळाला. गोविंद मरण पावला. बाबा क्षण भर थांबले व म्हणाले, " असे गेले कोट्यानुकोटी काय रडू एकासाठी " किती ही अनासक्ती! " बाबांनी धर्मशाळा बांधल्या परंतु पत्नी किंवा मुलांना त्यात राहू दिले नाही. अन्न छत्रात  कितीतरी अंध, अपंग, भिकारी जेवायचे परंतु घरच्यांना मात्र तेथे प्रवेश नव्हता. ही पराकाष्ठेची त्यागी वृत्ती बाबाकडे होती.



अंधश्रद्धेवर सडकून टीका करणारे बाबा साक्षर नसले तरी विद्वान मात्र निश्चितच होते. प्रश्नोत्तर पद्धतीने कीर्तन करणारे बाबा सर्वत्र प्रसिद्ध झाले. त्यांच्या कीर्तनाला हजारो लोक जमा व्हायचे. पाया पडणाऱ्याला  बाबा कधीच पाया पडू देत नसत कारण ते ईश्वराला व श्रद्धेला मानत नसत, देवपण ज्यांचे अंगी असते ते देवपण घेत नसतात हे बाबांचं तत्वज्ञान होते. आज लायकी नसतांना देवपण घेणारे भोंदू बाबा भरपूर दिसून येतात.



दिवसा गावातील घाण खराट्याने स्वच्छ करायची व रात्रीला त्याच गावातील लोकांच्या डोक्यातील वाईट विचारांची घाण कीर्तनाने दूर करावी हा बाबांचा नित्यक्रम होता. शिक्षणाला महत्व देणारे बाबा, अंधश्रद्धेला तिलांजली देणारे बाबा, स्वच्छतेचा आदर्श घालवून देणारे बाबा, तहानलेल्यांची तहान भूकेलेल्यांची भूक जाणणारे, अज्ञानाच्या अंध:कारातून प्रकाशाकडे घेवून जाणारे बाबा, दुःखी हिम्मत देणारे, अंधू पंगु रोग्यांना औषध उपचार देणारे बाबा, निराश्रीतांना आसरा देणारे बाबा यांना माझे कोटी कोटी प्रणाम!  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद





मराठी निबंध 2 


sant gadge baba marathi nibandh


 चुकलेल्या, भरकटलेल्या समाजाला सन्मार्गावर आणण्याचे काम करतात, तेच समाजाचे खरे उपासक असतात. विस्कळित समाजाला एकतेच्या सूत्रात बांधतात, सन्मार्गावर आणतात, ते आमचे संत. सर्व संतांनी स्वार्थहेतूला संक्षेप दिला. सामाजिक रूढी, दांभिकपणा, यावर प्रहार केला.


महाराष्ट्र संतांच्या बाबतीत मोठा भाग्यवान. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संत जन्माला आले आणि संत-परंपरा अखंड पुढे चालू राहिली. आधुनिक युगात २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगाव या गावी एका घरात एक संत जन्माला आला. त्याचे नाव डेबूजी. वडील झिंगराजी आणि आई सखूबाई. 



घरात अठाराविश्वे दारिद्र्य. त्यातच त्यांचे  वडील कालवश झाले. डेबू आईजवळ लहानाचा मोठे  होऊ लागले  . दोघे माय-लेकरे मामाकडे आश्रयाला गेले. पण मामा निरक्षर असल्याने सावकराकडून फसविला गेला. त्याच्या शेतावर जप्ती आली. गाडगेबाबांनी  ठरविले की, लोकांना साक्षरतेचा सल्ला द्यायचा; त्यांचे प्रबोधन करायचे.
हातात फुटके गाडगे घेऊन भिक्षा मागणारा डेबूजी गाडगेमहाराज बनले. पण त्यांनी कधीही फुकटचे खाल्ले नाही. कष्ट करूनच मिळेल तेवढेच पोटापुरते खाल्ले. 


सतत हातात झाडू घेऊन गावाला स्वच्छतेचे धडे देत असत. 'आधी केले, मग सांगितले' या उक्तीप्रमाणे  प्रथम स्वत: स्वच्छता करत आणि मग लोकांकडून करवून घेत. त्यांच्या मनामध्ये भक्तिभाव असे. 'गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला' हे त्यांचे लाडके भजन. कीर्तन करताना व्यवहारातील साधी-साधी, सहज पटणारी उदाहरणे ते देत. त्यातून लोकांना आचार, विचार सुधारण्याचा मोलाचा सल्ला मोठ्या प्रेमाने देत. 



ग्रामीण भागातील लोक दारिद्र्याने गांजलेले असत. त्यामुळे छोट्या-मोठ्या चोऱ्या करीत, दु:ख विसरण्यासाठी दारू पीत आणि देवाला प्रसन्न करण्यासाठी पशुबळी देत. या अनिष्ट गोष्टी, प्रथा यांच्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी कीर्तन या माध्यमातून गाडगेबाबा लोकशिक्षण देत. प्रश्नोत्तरातून ते लोकांशी संवाद साधत. त्यामुळे त्यांचे कीर्तन हे केवळ श्रवणभक्ती करण्यासाठी नसे. मध्येच हात उंचावून ते लोकांना म्हणायला सांगत -
“गोपाळा, गोपाळा, देवकीनंदन गोपाळा" लोक विचारप्रवाहात कधी एकरूप व्हायचे, हेच समजायचे नाही.



गाडगेमहाराज एका जागी कधीच थांबत नसत. त्यामुळे त्यांना समाज कोणत्या अडचणीत आहे, हे समजत असे. गाडगेमहाराजांनी कोणत्याही विद्यापीठाची पदवी संपादन केलेली नव्हती, तरीही त्यांच्याकडे असलेले ज्ञान पाहून थक्क व्हायला होत असे.  रंजल्या-गांजल्यांची, अपंगांची सेवा करण्यासाठी ते सतत तयार असत. ज्यांच्याकडे हात जोडण्यासाठी हातच नाहीत, असे दीन-दुबळे त्यांचे भक्त होते. लोकांकडून देणग्या मिळवाव्यात नि त्यातून अशा अपंग व्यक्तींना लाडवाचे जेवण द्यावे, अशी त्यांची इच्छा असे. ते स्वत: कधीच गोडधोड खात नसत.



स्वच्छता हा त्यांचा धर्म होता. स्वच्छता तेथे आरोग्य, आरोग्य तेथे निरोगीपणा. ही गोष्ट सांगण्यावर त्यांचा भर असे. जे काही मिळवाल, ते प्रामाणिकपणे मिळवा. हव्यासापायी, स्वार्थापायी चोरी करू नका. चोरी म्हणजे पाप. पाप केलेत, तर त्याची शिक्षा भोगावी लागेल. नवस बोलणे आणि तो फेडण्यासाठी पशूचा बळी देणे त्यांना मान्य नव्हते. ही गोष्ट पटवून देताना ते विचारत, "नवस का बोललीस? तुझं लेकरू बरं होऊ दे म्हणून? मग त्यासाठी तू बकरीच्या लेकराला बळी देऊन त्याचं व्यंजन करून खाल्लंस. मग पावेल का देव?" त्यावर ती बाई खजिल होई. अशा प्रकारे मासांहार करू नका, पशुबळी देऊ नका, भूतदया करा, असे विचार ते लोकांपुढे मांडत. त्यावेळी व्यवहारातील दाखले देत. ऋण काढून सण करणे त्यांना मान्य नव्हते.



गाडगेमहाराजांची भक्तमंडळी वाढू लागली. त्यातील काही धनिक पक्वान्ने देत. अशी पक्वान्ने ते गरिबांना वाटून टाकत. धन मिळाले, की त्यातून यात्रेकरूंसाठी धर्मशाळा, नदीवर घाट, देवळे, गोशाळा, गोरक्षण संस्था त्यांनी बांधल्या. त्यांनी कधी कोणाला शिष्य बनविले नाही, की कोणाला पाया पडू दिले नाही. कोणाकडून कधीही काहीही मागितले नाही. सतत लोकजागृतीसाठी लोकशिक्षण दिले. असे हे आधुनिक काळातील महान संत, इ. स. १९५६ साली अमरावतीजवळ पंचत्वात विलीन झाले.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद