महागाईचा भस्मासूर मराठी निबंध | vadhati mahagai essay in marathi

 महागाईचा भस्मासूर मराठी निबंध | vadhati mahagai essay in marathi 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  महागाईचा भस्मासूर मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. या निबंधामध्ये महागाई वाढण्याची कारणे व त्यावरील उपाय यावर सविस्तर माहिती दिली आहे .  या बद्दल आणखी माहिती घेऊया आणि सुरुवात करूया निबंधाला.    


चलनवाढ किंवा महागाई या जगातील प्रमुख समस्या आहेत. विकसित देशांच्या तुलनेत भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. जेव्हा सरकारचा प्रशासन खर्च त्याच्या उत्पन्नापेक्षा वाढतो तेव्हा सरकार जास्त नोटा छापून खर्च करते. परिणामी चलनवाढ होते आणि मुद्रेची किंमत कमी होते. यालाच मुद्रा स्फिती म्हणतात. मुद्रेचे अवमूल्यन झाल्यामुळे महागाई वाढते. 


विकसित देशांमध्ये मुद्रास्फितीचा दर २ किंवा ३ टक्के असतो तेव्हा विकसनशील देशांमध्ये तो अजिबात कमी होत नाही. मगरीच्या वासलेल्या तोंडाप्रमाणे तो वाढतच जातो. प्राचीन भारतात सोन्याचा धूर निघत होता परंतु परकीय देशांनी लुटून त्याला कंगाल करून टाकले. आधीच भारतीय गरिबीच्या जाळ्यात अडकलेले होते. वरून महागाईने उरली सुरली कसर भरून काढली.


महागाई आज दिवसेंदिवस वाढत आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची पूर्ती करण्यात लोक रात्रंदिवस मरमर करतात तरी त्या पूर्ण होत नाहीत. प्रत्येक वस्तूच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत. महागाईचा मार प्रत्येक वर्गाला खावा लागत आहे. पीठ, दूध, महाग आहे. साजूक तूप तर पाहायलाही मिळत नाही. डालडा तूपही विकत घेणे शक्य नाही. वस्त्र निर्यातीत आपले भविष्य उज्ज्वल आहे पण आपल्यासाठी कापड महाग आहे.


 राहण्यासाठी घर बांधणे शक्य नाही. घराचे भाडे इतके वाढले की उत्पन्नाचा अर्धा भाग त्यावरच खर्च होतो. सामान्य जनता पोटावर पट्टी बांधून झोपण्यास विवश झाली आहे. लोक आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी नाइलाजाने काटकसर करतात. 



महागाईची चर्चा प्रत्येक जण करतो. निवडणुकीत महागाईचा मुद्दा नेहमीच असतो. प्रत्येक सरकार आवश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्याचे आश्वासन देते. परंतु उलट किमती वाढतातच. या महागाईची अनेक कारणे आहेत. याचे सर्वात प्रमुख कारण उत्पादन आणि मागणीत असलेली प्रचंड तफावत. भारतात सामान्य उपयोगाच्या वस्तूंच्या उत्पादनावर कमी आणि चैनीच्या वस्तूंच्या उत्पादनावर जास्त लक्ष दिले जाते. कारण त्यामुळे उत्पादकांचा जास्त फायदा होतो.


 येथील शेतीच्या स्थितीचाही परिणाम होतो. शेती इथे मान्सूनच्या पावसावर अवलंबून असल्यामुळे तो एक जुगार बनला आहे. वेळेवर पाऊस पडला तर ठीक नाही तर उत्पादन कमी होते. पूर, दुष्काळ, अतिवृष्टी, अवर्षणासारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतीवर परिणाम होतो. 


काळा बाजार, साठेबाजीचाही महागाईशी प्रत्यक्ष संबंध आहे. यामुळे धान्यादी आवश्यक वस्तू बाजारातून अदृश्य होतात व गोदामात साठविल्या जातात. त्यामुळे बाजारात वस्तूंची चणचण निर्माण होते. व्यापारी वस्तूंच्या किमती वाढल्यावरच त्या गोदामातून बाहेर काढतात. 


भारतातील वितरण व्यवस्थाही सदोष आहे. व्यापाऱ्यांचा स्वार्थीपणा आणि सरकारी कर्मचाऱ्यांची लाचखोरी यांची आपापसांत हातमिळवणी झालेली असल्यामुळे महागाई वाढते. 


सरकार महागाई कमी करण्यासाठी योजना तयार करते परतु लालफितीच्या कारभारामुळे अनेक योजना कार्यान्वित होतच नाहीत. लोकसंख्येचा विस्फोट झाल्यामुळे महागाई वाढत आहे. लोकसंख्येचा देशाच्या अंदाजपत्रकावर पण परिणाम होतो. त्यामुळे तुटीचे अंदाजपत्रक बनते. चलनवाढ होऊन किमती वाढतात. 


शेजारच्या देशांमधून सतत होत राहणाऱ्या घुसखोरीमुळे निर्वासितांच्या छावण्या बनत राहिल्या तर महागाईवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. याखेरीज इतर अनेक समस्या उत्पन्न होतात. जगाच्या अर्थव्यवस्थेत तेलाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण तेलाची आयात करीत असल्यामुळे त्यावर बराच पैसा खर्च होतो. तेलाच्या वाढलेल्या किमतीचा परिणाम महागाई वाढण्यात होतो.


 आपणास सतत परकीय आक्रमणाला तोंड द्यावे लागते. हेही महागाई वाढण्याचे एक कारण आहे. सध्या भारत आपल्याच भूमीवर 'प्रॉक्सीवॉर' करीत आहे. या युद्धात भारताने आपली सर्व साधने उपयोगात आणली आहेत. त्यामुळे चलनवाढ होऊन महागाई वाढत चालली आहे.


महागाई वाढल्यामुळे मध्यम व कनिष्ठ वर्गाची कंबर तर खचल्यासारखीच झाली आहे. त्यांना जीवनाचा आनंद अत्यल्प मिळतो कारण जीवन कसेबसे ओढत न्यावे लागते. असे लोक देशाच्या विकासात काय मदत करू शकणार? महागाईमुळे भ्रष्टाचार वाढतो, दंगे होतात, गोंधळाचे वातावरण बनते. वाढत्या महागाईने सामान्य जनतेला विवशतेच्या घेऱ्यात कैद केले आहे.


वाढत्या महागाईवर अंकुश ठेवण्यासाठी सक्रिय राष्ट्रीय नीतीची आवश्यकता आहे. ही समस्या सोडविणे सोपे नाही. केवळ कायदे तयार करून ही समस्या सुटू शकत नाही. त्यासाठी सरकारने प्रथम आपल्या पायाखाली काय जळते ते पाहिले पाहिजे. आपला प्रशासन खर्च विकसित देशांच्या बरोबरीने आहे. विकसनशील देशाने प्रशासनावर इतका खर्च करू नये अशी अपेक्षा असते म्हणून प्रथम प्रशासनाच्या खर्चात कपात केली जावी. 


तोट्यात चालणाऱ्या संस्था बंद केल्या जाव्यात. सरकारी कार्यालये व्यवस्थित चालण्यासाठी खंबीर पावले उचलली जावीत. भ्रष्ट आणि आळशी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जावे. रजा कमी केल्या जाव्यात. हरताळ, संप यावर बंदी घालण्यात यावी. महागाई रोखण्यासाठी योजनाप्रणाली दुरुस्त करण्याची गरज आहे.


उत्पादन वाढवावे लागेल. वितरण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करावा लागेल. शेतीसाठी उत्तम सिंचन व्यवस्था, उत्तम बियाणे, स्वस्त अवजारे उपलब्ध करून द्यावी लागतील. पूर, दुष्काळापासून बचाव करण्यासाठी राष्ट्रीय नीतीची गरज आहे. काळा बाजार, करणारे व साठेबाजांना कठोर शिक्षा करून योग्य धडा शिकविला पाहिजे. भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांना पदच्युत करावे. 


कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा युद्ध पातळीवर प्रचार व्हावा. शेजारी देशांतून येणाऱ्या घुसखोरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण सीमेवर तारा लावून सुरक्षा व्यवस्था कड़क करावी. दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी व देशातील जनतेला न्याय द्यावा.


संपूर्ण अर्थव्यवस्थेवर तेलाच्या किमतीचा परिणाम होतो. म्हणून सरकारने तेलाचे मूल्य स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा. तेलाचा प्रत्येक थेंब मौल्यवान आहे याची जाणीव जनतेला करून द्यावी. “साधी राहणी उच्च विचारसरणीचे" तत्त्व अवलंबिण्यात यावे यामुळे आपण महागाई कमी करण्यास मदत करू शकू.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद



महागाईचा संबंध अर्थशात्रातील नियमांशी असल्याने अर्थशात्रातील काही शब्द या निबंधात वापरले आहेत . ते समजून घेण्यास काही अडचण आल्यास तुम्ही कंमेंट करून विचारू शकता . मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 2
महागाईचा भस्मासूर मराठी निबंध | vadhati mahagai essay in marathi 


'पैसा-पैसा आणि पैसा' या दोन अक्षरी शब्दाचे आजच्या काळात दिवसेनुदिवस महत्त्व वाढतच चालले आहे. या पैशाच्या अकारण वाढलेल्या महत्त्वानेच आपल्या जीवनात 'महागाई' या शब्दाने अगदी कहर केला आहे. सामान्य माणसाच्या जीवनात तर या महाभयंकर राक्षसाने नकोनकोसे झाले आहे...


'इकडे बाप भीक मागू देई ना।

अन् तिकडे पगार काही वाढेना।।'
 

अशा कात्रीत सामान्य माणूस होरपळून चालला आहे. या महागाईचा चढता आलेख कधी थांबेल का ? तो कधी खाली उतरेल का ? अशी उगाचच वेडी आशा मनात निर्माण होते. अखेरीस उद्विग्न मन म्हणून जाते की या महागाईचा निश्चित एक दिवस विस्फोट होईलच.


सोन्याचा धूर निघणारा आपला देशआज मात्र या देशातील लोक जे गरीब आहेत, ते अधिकात अधिक गरीब बनत चालले आहेत, तर श्रीमंतर हे अधिकाधिक धनाढ्य बनत चालले आहेत... श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी ही वाढतच आहे. मिशन २०२० हे शासनाचे नवीन स्वप्न ते पूर्ण करीत असताना 


'श्रीमंत' हा हव्या त्या मार्गाने पैसा इतका मिळवितो आहे की त्याला कपाटे पुरेनाशी झाली. गाद्या, पलंग, दागदागिने, उंची सामानही कुठे ठेवू असे झाले आहे. नोटांना कीड लागते आहे आणि अशाच प्रकरणातून भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे. 


शासन अशा शंभर श्रीमंतांपैकी जनतेसमोर एखाद्या-दुसऱ्या गुन्हेगारास आणतो. परंतु बाकीचे सर्व एकाच माळेचे मणी तूही चूप आणि मीही चूप एखाद्या सर्वसामान्य माणसाने मात्र या महागाईला कंटाळून काही छोटा जरी गुन्हा केला तो चांगलाच भरडला जातो. नाही प्रसंगी उद्ध्वस्त होतो. मग प्रश्न पडतो कशाला हवे हे शासन... ही लोकशाही... अन् हा बेधुंद कारभार ?...


आज आपण बाजारात गेलो तर कोणतीही गोष्ट... अगदी मिठापासून ते धान्यांपर्यंतचे सर्व भाव हे आकाशाला भिडलेले दिसतात. साधी मीठ-भाकर, साधी भाजी, वरण, भातदेखील आज दोनवेळचे मिळेल की नाही यांची भ्रांत तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांना पडते आहे. 


शंभर रुपये बाजारात घेऊन गेलो तर दोन दिवसाचा प्रश्नही सुटत नाही. चैनीच्या वस्तू तर टीव्ही, चित्रपट, वर्तमानपत्रे यातच पाहायच्या. तिकडे भारताची महासत्ता बनण्याकडे चाललेली वाटचाल.आणि इकडे जनसामान्याला अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजासुद्धा पूर्ण होऊ शकत नाही. 


लाखो लोकांना पाण्याचा घोट रात्री पोटात ढकलून आभाळाची चादर आणि धरतीचे अंथरूण घेऊन त्यावर त्याला सुखाची (?) गाढ निद्रा घ्यावी लागते.अन्न, वस्त्र आणि घर यांचा तर सर्वांना लाभ मिळेल, याबद्दल शंकाच. परंतु त्यापुढे जाऊन प्रवास, आरोग्य आणि मानवाची सर्वांत महत्त्वाची गरज 'शिक्षण' याबाबत तर सामान्य घरातील एखाद्या बुद्धिमान विद्यार्थ्याला अशक्यप्रायः गोष्ट झाली आहे. 


हुशार विद्यार्थ्यालाही गुणवत्ता सिद्ध करून उच्चशिक्षण मिळत नाही तर सामान्य मुलांची परवड काय होत असणार ? अर्थात त्यामुळे अपात्र किंवा त्या शिक्षणासाठी लायक नसलेल्या बेछूटपणे वागणाऱ्या श्रीमंत मुलांच्या हातात, उच्च शिक्षण, उच्च तंत्रज्ञान आणि पुढे पर्यायाने देशाची अर्थव्यवस्थाही त्यांच्याच हाती जाते अन् पुनश्च हे अर्थचक्र, महागाईचा विळखा सामान्य जनतेच्या गळ्याभोवती अधिकच आवळला जातो. 


श्रीमंत हे त्यांच्या श्रीमंतीचे दर्शन वेगवेगळ्या स्वरूपात दाखविताना आपल्या पुढील सात पिढीची सोय करून ठेवत राहतो. तेव्हा शासनाने आणि या धनदांडग्यांनीही आपल्या समाजाप्रति आखलेले कर्तव्यही पार पाडले पाहिजे ना ! या महागाईच्या अडचणीमुळे भ्रष्टाचारही वाढत चालला आहे. 


त्यामुळे सर्वसामान्यांना ही महागाई 'शाप' वाटत आहे. व्यसने, गुन्हेगारी, विकृती, वाढती बेरोजगारी आणि या सर्वांचा परिपाक म्हणजे आत्महत्या यांचेही प्रमाण वाढत चालले आहे. तेव्हा शासनाच्या ज्या सर्वसामान्यांसाठी विविध योजना आहेत, 


दारिद्रयरेषेखालील कुटुंबांना सवलती, गरीब-अन् गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण, मुलींसाठी मोफत शिक्षण, मोफत - कमी किमतीत निवासस्थाने, घरे किंवा जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात, या सर्व योजनांचा फायदा हा पुन्हा गरिबांपर्यंत जातच नाही. मध्यमवर्गीय माणूस तर...


"भीडेने जगासमोर तोंड उघडत नाही.

आणि भुकेने... त्याचे पोट भरत नाही.'' 

तव्हा शासनाने अतिशय जागरूक राहन श्रीमंतातीलही समाजाला मदत करू इच्छिणाऱ्यांना आपल्याबरोबर घेऊन श्रीमत-गरीब दोन्हीतील फरक कमी केला पाहिजे. योग्य प्रकारे कर आकारणी चैनीच्या वस्तूंवर केली पाहिजे. 


होतकरू, सक्षम गरीब व्यक्तीला अनुदान देऊन, प्रोत्साहित केले पाहिजे. जनसामान्यांपर्यंत, तळागाळापर्यंत आपल्या योजना पोहोचल्या पाहिजेत. तरच 'महागाईशी झुंज' देणे शक्य होईल.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद