यंत्रमानव येत आहे मराठी निबंध | yantra manav yet aahe marathi nibandh

 यंत्रमानव येत आहे मराठी निबंध |  yantra manav yet aahe marathi nibandh


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण यंत्रमानव येत आहे मराठी निबंध बघणार आहोत.  गेल्या पन्नास वर्षांत जगात विविध शोधांची नुसती खैरात झाली आहे. जादूचा दिवाच हातात सापडल्यासारखे झाले आहे. जिची कधी कल्पनाही केली नव्हती, अशी अद्भुत शक्ती जणू माणसाला वश झाली आहे. तीसएक वर्षांपूर्वीच यानाच्या साहाय्याने चंद्रावर उतरण्याचा विक्रमही मानवाने केला.


प्रारंभी माणसाने या साऱ्या यांत्रिक प्रगतीकडे काहीशा भयचकित दृष्टीने पाहिले. पण काही काळाने यंत्रांचा त्याला इतका सराव झाला आहे की, यंत्रांवाचून त्याचे पदोपदी अडू लागले आहे. दूरदर्शन, वॉशिंग मशीन, मिक्सर, ग्राईंडर, व्हॅक्यूम क्लीनर, फ्रीज, ओव्हन अशा अनेक गोष्टी माणसाच्या घरात आपले स्थान कायमचे बळकावून बसल्या आहेत.


...आणि आता नव्याने येऊ पाहत आहे यंत्रमानव. अर्थात, संगणकामुळे माणसाची यंत्रमानवाशी अर्धीमुर्धी ओळख झालीच आहे. यंत्रमानवाच्या मुळाशी तत्त्व आहे संगणकाचेच! पण यंत्रमानव येणार तो माणसाच्या शरीराच्या आकारासारखा आकार धारण करून; त्यामुळे तो कसा दिसेल, काय काम करील, यांविषयी माणसाच्या मनात अतिशय कुतूहल निर्माण झाले आहे.


यंत्रमानव ही संगणकाच्या पुढची पायरी आहे. खरे म्हणजे फ्रीज, टी.व्ही., दूरध्वनी या साऱ्या रूपांत सुप्तावस्थेत तो आपल्या घरात आलेला आहेच. पण यंत्रमानव' हे यंत्राचे जास्त ठळक रूप आहे. रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने, यंत्रमानव आणि मानव परस्परांवर नियंत्रण ठेवू शकणार आहेत. यंत्रमानव तुमची अनेक कामे करणार आहे. तो तुमच्या करमणुकीसाठी टी. व्ही. चालवील, परस्परांचे निरोप देईल, वस्तू जागच्या जागी ठेवील, त्या वस्तू तुम्हांला हव्या असतील तेव्हा तुमच्यापुढे हजर करील.


थोडक्यात,अत्यंत अचूक व अत्यंत नियमितपणे वेळेवर घरातील सर्व प्रकारचे कामे करणारा  बुद्धिमान नोकर आपल्याला उपलब्ध होणार आहे. केवळ घरातच त्याचा पराक्रम दिसेल असे नाही, तर युद्धभूमीवर, अंतराळात, समुद्रतळाशी, खाणीमध्ये अशा ज्या ज्या ठिकाणी माणसाला काम करणे कठीण आहे वा धोकादायक आहे, त्या त्या सर्व ठिकाणी हा यंत्रमानव आता काम करणार आहे.


अर्थातच यंत्रमानवाच्या आगमनात मानवाला आनंद व उत्सुकता आहेच; पण त्याच्या आगमनाचा मानवाने धाक घ्यावा, भीती बाळगावी अशीही परिस्थिती आहे. यंत्रमानव अनेक कामे करणार आहे, त्यामुळे माणसाची क्रियाशीलता कमी होण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट, त्याचे माणसाच्या प्रत्येक हालचालीवर नियंत्रण राहणार आहे, म्हणजे माणसाच्या स्वातंत्र्यावर ती गदाच आहे की! शिवाय यंत्रमानवाच्या केवळ यांत्रिक वागण्यामुळे काही धोके निर्माण होण्याचीही शक्यता अमान्य करता येत नाही.


यंत्रमानवाला कामे उरकण्याची शक्ती असली, तरी त्याच्याजवळ विवेकबुद्धी असणार नाही. मानवी जीवन हे भावनेवर अवलंबून असते. विविध भावनांच्या परिपोषावर, उदात्तीकरणावर मानवी मनाचे सुख-समाधान अवलंबून असते. मानवी भावनांची ही भूक यंत्रमानव भागवू शकणार नाही.

तरीही एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे आपण ' नको, नको' असे कितीही म्हटले, तरी यंत्रमानवाचे आगमन अटळ आहे. पण त्याच्यामुळे होणारे नुकसान, येणारी संकटे यांचा आतापासूनच विचार करून बंदोबस्त करण्याची तयारी करणे भाग आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद