आजचा विद्यार्थी, ज्ञानार्थी की परीक्षार्थी ? मराठी निबंध aajcha vidyarthi dnyanarthi ki pariksharthi essay in marathi

आजचा विद्यार्थी, ज्ञानार्थी की परीक्षार्थी ? मराठी निबंध aajcha vidyarthi dnyanarthi ki pariksharthi essay in marathiनमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आजचा विद्यार्थी, ज्ञानार्थी की परीक्षार्थी ? मराठी निबंध बघणार आहोत. 'आजचा विद्यार्थी, ज्ञानार्थी की परीक्षार्थी?' वादविवाद स्पर्धेचा विषय वाचला आणि विद्यार्थी (आजच्या दृष्टीने परीक्षार्थी असला तरी) या नात्याने अतिशय वाईट वाटले. विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी' असण्यावरच आज मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तो केवळ ‘परीक्षार्थी' झाला आहे अशी ओरड सर्वत्र ऐकू येते आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यात तथ्यांश आहे. माझं हे परखड मत माझ्या मित्रमैत्रिणींना रुचणार नाही, अप्रिय सत्य बोलायचं नसतं हेही मला माहीत आहे पण ते बोलण्याशिवाय मजजवळ दुसरा पर्याय नाही. मलाही हे वक्तव्य करताना फार आनंद वाटतो आहे अशातला भाग नाही. आमच्या सुभाषितकारांनी आदर्श विद्यार्थ्याची पाच लक्षणे एका सुभाषित गुंफली आहेत. आदर्श विद्यार्थाची पाच लक्षणे एका सुभाषितात गुंफली आहेत.
"ज्ञानतृष्णा गुरौ निष्ठा सदाऽध्ययनदक्षता । एकाग्रता महत्त्वेच्छा विद्यार्थिगुणपञ्चकम् ॥"

ज्ञानतृष्णा - ज्ञानाची तहान हा विद्यार्थ्याचा एक महत्त्वाचा निकष. आम्हाला खरोखरच ज्ञानाची तहान आहे का हो ? काही विषयांची जिज्ञासा आमच्या मनात आहे, नाही असं नाही. पण त्यापेक्षा गुणांची (परीक्षेत मिळणाऱ्या) तहान फार मोठी आहे. परीक्षेत जास्तीत जास्त टक्केवारी कशी मिळेल या दृष्टीने शिक्षक, पालक, आणि आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करीत असतो. त्यातही काही राजमार्ग चोखाळतात. तर काही चोरवाटा, पळवाटा शोधतात.


परवाच एका गुणवत्तायादीत झळकलेल्या मित्राची मी तोंडभरून तारीफ करत होतो. जवळ उभ्या असलेल्या मित्राने थोडा वेळ मुकाट्याने ऐकून घेतलं. शेवटी असह्य  होऊन त्याच्या मुखातून सत्य बाहेर पडलं, ''अरे, त्याने अमुक अमुक केंद्रावरून परीक्षा दिली. त्याला कॉपी पुरविण्याची कामगिरी माझ्यावरच सोपविली होती." माझी तर बोलतीच बंद झाली ते ऐकून! आता बोला! मार्काच्या मागे धावण्याचा उपहास करताना एका वक्त्याने 'मार्क्सवादी' म्हणून आमच्या कपाळी शिक्का मारला ना तेव्हा तर कपाळमोक्षच झाल्यासारखं वाटलं.गुरुनिष्ठा - प्रसारमाध्यमांद्वारे होणारे पाश्चात्त्य संस्कृतीचे (विकृतीचे) दर्शन, विभक्त कुटुंब, अर्थार्जनासाठी दिवसभर बाहेर असणारे आईवडील यामुळे पाहिजे तसे संस्कार आजच्या पिढीवर होत नाहीत. वास्तविक पाहता आजच्या विद्यार्थ्याचा ऐकीव जास्त आहे, तो हुशार आहे, धीटही आहे पण शहाणा नाही, समंजस नाही. नम्रता, आज्ञापालन, आदर, निष्ठा या सद्गुणांची त्याला कदर वाटेनाशी झाली आहे. समाजातही फारसे आदर्श उरले नाहीत. गुरुजनांवरील निष्ठेला ओहोटी लागली आहे. हे चित्र अस्वस्थ करणारे आहे.सदाअध्ययनदक्षता - आजच्या चुकीच्या विचारप्रणालीने विद्यार्थ्यांच्या मागे किती व्यवधानं लावली आहेत! अगदी पहिल्या वर्गात शिकणारा विद्यार्थी घ्या. त्याच्यामागे सकाळी उठल्यापासून शाळा, दोन तीन ट्यूशन्स, ड्रॉइंगचा क्लास, तबल्याचा क्लास, होमवर्क या साऱ्यांचा असा काही ससेमिरा लागलेला असतो की तो त्याचे रम्य बालपण हरवून बसतो. त्याच्या खेळण्याचा अक्षरशः खेळखंडोबा होतो. दहावीच्या विद्यार्थ्यांचे हाल तर विचारूच नका. अशा परिस्थितीत ‘अध्ययनात दक्ष' राहणे कितपत शक्य आहे?एकाग्रता - सभोवतालच्या जगातील असंख्य प्रलोभनं आणि विविध प्रदूषणं आमच्या एकाग्रतेचा भंग करत असतात. फक्त दूरदर्शन पाहताना, व्हिडीओ ग्रेम खेळताना आमच्या एकाग्रतेचा भंग करण्याचे सामर्थ्य साक्षात ब्रह्मदेवाजवळही नाही. तहान, भूक, झोप, थकवा कशाकशाचं भान त्यावेळी नसतं. पूर्वी एकाग्रचित्त होण्यासाठी ऋषी, मुनी गहन अरण्यात जाऊन राहात. आश्रमशाळाही जनसमूहापासून दूर असायच्या. सध्याच्या धकाधकीत अशी एकाग्रता साधणे कसे शक्य आहे?


महत्त्वेच्छा - 'जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा'

हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा देशभक्तीने ओथंबलेला विचार कुठे आणि उच्च शिक्षण घेऊन, परदेशात स्थायिक होऊन, गडगंज पैसा मिळविण्याचं स्वप्न बाळगणारे आजचे तरूण कुठे? मान, सन्मान, पद, पैसा यामागे धावणाऱ्यांची स्वार्थी महत्त्वाकांक्षा काय कामाची ? समाजाच्या, देशाच्या, विश्वाच्या कल्याणाचा विचार त्यात कुठेही नसतो.


एकंदरीत आदर्श विद्यार्थ्याजवळ अभिप्रेत असलेल्या गुणांना आज आम्ही पारखे झालो आहोत. यासाठी एकटा विद्यार्थी जबाबदार नाही तर सध्याची सामाजिक, राजकीय परिस्थिती, सदोष शिक्षणपद्धती, पाश्चात्त्य संस्कृतीचं आक्रमण अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.आजचा विद्यार्थी परीक्षार्थी आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असताना, वादातीत असताना आयोजकांनी हा विषय का निवडावा ? या वादविवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जागरण व्हावे, शासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालावे, शिक्षणतज्ञांच्या डोळ्यावरची ढापणं बाजूला सारावी, शिक्षकवर्ग खडबडून जागा व्हावा नि पालकांचे प्रबोधन व्हावे असा एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा 'सुवर्णसंधी साधूपणा' आयोजकांना साधायचा असेल. ते काही असो, आपण मात्र आज संकल्प करू या, 'श्रद्धेची पताका खांद्यावर घेऊन, ज्ञानपंढरीचे वारकरी होण्याचा !

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत