सर्कशीतील हत्तीचे मनोगत मराठी निबंध | circustil hattiche manogat essay marathi

सर्कशीतील हत्तीचे मनोगत  मराठी निबंध | circustil hattiche manogat essay marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सर्कशीतील हत्तीचे मनोगत  मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्ये एक दुःखी हत्ती स्वतःचे मनोगत व्यक्त करीत आहे. वर वर पाहता  आपल्याला सर्कसमध्ये चोहीकडे आनंदच दिसतो .पण वास्तविक परिस्थिती वेगळी असते हे निबंध वाचल्यावर तुम्हाला लक्षात येईल.चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

   

कोण ? डॉक्टर काका? मला वाटलंच होतं आज तुम्ही येणार ! काल खेळ करताना माझ्या पायाला जखम झाली याची बातमी  मिळालीच असणार तुम्हाला ! बाकी आमच्या दामूकाकांचं आम्हा सर्वांवर फारच प्रेम ! आणि डॉक्टर, तुम्ही सुद्धा किती हळुवारपणे मलमपट्टी करता ! एक विचारू ? मनाच्या जखमेवर मलमपट्टी करता येते का हो? दचकलात माझा प्रश्न ऐकून ? तुम्हाला काय कल्पना येणार म्हणा ! ‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे' हेच खरं !


वरवर पाहिलं तर मी खूप सुखात आहे. कशाची ददात नाही. आस्थेने काळजी घेणारे मालक, सोबतीला जिवलग मित्र, मनापासून दाद देणारे चाहते, प्रेक्षक यांची तर गणतीच नाही. सुरक्षित जीवन आहे. सुख सुख म्हणतात ते आणखी काय हो ! 

बंदिस्त पोपटासारखा मीही झुरतो आहे. कोणाला सांगू माझी कथा नि व्यथा ?  'देवो दुर्बलघातकः' असं मी ऐकलं आहे. मी तर महाकाय, बलवंत, बुद्धिवंत. माझा देवाने, दैवाने असा घात का केला असेल? ' या प्रश्नाचं उत्तर काही केल्या सापडत नाही.


आमच्या कुळाचा बडिवार काय वर्णावा? समुद्रमंथनातून जी चौदा रत्नं निघाली त्यातील ऐरावत हा आमचा मूळ पुरुष. देवराज इंद्राच्या ऐश्वर्यमंदिरावरील कळसच म्हणा ना ! विघ्नहर्ता, सुखकर्ता, बुद्धिदाता अशा गणपतीला आमच्याच एका पूर्वजाचे मस्तक जोडले होते असे ऐकिवात आहे. राजे, महाराजे, संस्थानिक व श्रीमंत देवस्थाने पदरी हत्ती बाळगतात कारण दाराशी हत्ती झुलणे हे वैभवाचे लक्षण.


पण पूर्वजांचे गोडवे गाऊन काय साधणार म्हणा! माझे भोग मला भोगावेच लागणार, रिंगमास्टरच्या तालावर नाचावे लागणार, आळस केल्यास फटकेही खावे लागणार ! जाऊ द्या- 'आलिया भोगासी असावे सादर' याशिवाय आपल्या हातात आहे तरी काय?


राहून राहून आठवतं माझं ते स्वच्छंद जीवन ! आईबाबांचा मी अतिशय लाडका. रानावनात मस्त हिंडावं, तळ्यात मनसोक्त डुंबावं, भूक लागली की खावं, झोप आली की झोपावं असं मुक्त जीवन होतं. कोणाची गुलामगिरी नाही की चाकरी नाही. पण नियतीला माझं सुख पाहावलं नाही. एक दिवस फिरता फिरता मी मित्रांपसून दूर निघून गेलो. वाट चुकली आणि सर्कसवाल्यांच्या तावडीत सापडलो. माझ्या वियोगाने व्याकुळ झालेल्या आईबाबांनी किती शोक केला असेल, मित्र माझ्या आठवणीने किती बेचैन असतील या विचारांनी मी कित्येक दिवस अन्नपाणी वर्ण्य केलं. कितीतरी रात्री डोळ्याला डोळा लागला नाही. 'नको हे जिणं' असं वाटायला लागलं.परंतु सर्व दुःखांवर रामबाण औषण आहे काळ ! हळूहळू दुःखाची तीव्रता कमी झाली. सर्कशीतलं जिणं पत्करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. नवनवीन खेळ, करामती शिकलो. प्रेक्षकांचे मनोरंजन करू लागलो. टाळ्यांच्या कडकडाटात, बँडच्या निनादात दुःख विसरायचा प्रयत्न चालू होता.


नाही म्हणायला या दुःखात काही आनंदाचे क्षण येतात. समोर बसलेली निरागस मुले चिमुकल्या हातांनी टाळ्या पिटतात तेव्हा धन्यता वाटते. 'करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे' या कल्पनेने थोडाफार सुखावतो.माझ्या माणसाबद्दलच्या भावना तुम्हाला नक्कीच रुचणार नाहीत. मानवतेच्या गप्पा मारणारा माणूस अत्यंत, स्वार्थी, अन्यायी आहे. सर्व जग आपल्या सुखासाठी निर्माण केले आहे असे त्याला वाटते. जंगलतोड करुन तो आम्हाला बेघर करतो आणि स्वतःचं घर बांधतो. अभयारण्याला ‘अभयारण्य' म्हणण्याची सोय राहिली नाही. खरंच सांगा, माणसाला आमच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा, आम्हाला असं दुःखाच्या खाईत लोटण्याचा अधिकार कोणी दिला ?


एकनाथ महाराजांना तृषार्त गाढवाची दया आली आणि त्यांनी त्याची तहान शमविली. माझी ही प्रेमाची तहान भागविणारा एकनाथ पुन्हा केव्हातरी अवतरेल आणि आम्हाला बंधमुक्त करेल या आशेवर आम्ही जगतो आहोत. गजेंद्राचा धावा ऐकून देवाने संकटकाळी त्याचे रक्षण केले. त्याला मगरमिठीतून सोडविले. पारतंत्र्याच्या मगरमिठीतून सुटून आम्हालाही मोक्ष मिळावा हेच त्या दयाघनाजवळ मागणे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत