वृक्षवल्ली आम्हा सोयरी मराठी निबंध | vrukshavalli amha soyari essay in marathi

वृक्षवल्ली आम्हा सोयरी मराठी निबंध | vrukshavalli amha soyari essay in marathi


 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वृक्षवल्ली आम्हा सोयरी  मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधामध्ये वृक्ष मानवी जीवनात किती महत्वाचे आहेत हे उदाहरणासह सांगितले आहे.  या बद्दल आणखी माहिती घेऊया आणि सुरुवात करूया निबंधाला.

 


'वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे पक्षीही सुस्वरे, आळविती ॥'

आज मी जागी झाले ते या कर्णमधुर ओळींच्या हळुवार स्पर्शानेच ! तुकाराम महाराजांचे भावमधुर काव्य आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी चढविलेला स्वरांचा सुरेल साज ! त्या मधुर मिलाफाने चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या.


वृक्ष आणि वेली ! निसर्गाचे सर्वोत्तम वरदान ! धरणीमातेने मुक्त हस्ताने बहाल केलेला मौल्यवान खजिनाच जणू ! सोय जाणतो तो सोयरा ! मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा वृक्ष, वेली भागवितात. मग ती आमची सोयरीच नव्हेत का? किंबहुना ते 'आप्तांचेही आप्त' आहेत असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही. सुभाषितकारांच्या मते रवी, चंद्र, घन, वृक्ष नद्या, गायी आणि सज्जन यांची निर्मिती निर्मिकाने परोपकारासाठीच केली आहे.सर्प चंदनाच्या मुळाशी आश्रय घेतात. माकडे शेंड्यांवर असतात. पक्षी फांद्यांच्या तर भंग फुलांच्या आश्रयाने राहतात. तात्पर्य, सज्जनांचे ऐश्चर्य परोपकारासाठी असते. 'नास्ति मूलं अनौषधम्' म्हणजे असे एकही मूळ (झाड) नाही की ज्यामध्ये औषधी गुण नाही. इतकंच नाही तर वृक्षाच्या मुळापासून फळापर्यंत प्रत्येक अवयवाचा मानव आणि मानवेतर प्राण्यांना उपयोग आहे.पूर्वजांनी वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व ओळखले होते. वृक्षांच्या घनदाट, शीतल छायेत बसूनच वेदातील अनेक ऋचा रचल्या गेल्या. गौतम बुद्धांना आत्मज्ञान झाले बोधिवृक्षाच्या साक्षीने ! ऋषींनी जप, तप, अनुष्ठाने केली तेव्हा त्यांच्या शिरावर वृक्षांचेच छत्र होते. 


पूर्वी प्रत्येकाच्या अंगणात प्राजक्त, बेल. तुळस. आंबा अशी झाडं असायची. तुळस, औदुंबरासारख्या वृक्षांची नित्यनेमाने पूजा व्हायची. परंतु मध्यंतरीच्या काळात माणसाला या उपकारकर्त्यांचा विसर पडला. 'कुऱ्हाडीचा  दांडा, गोतास काळ' ठरावा तद्वत आम्ही वृक्षांचा 'काळ' ठरलो. प्रमाणाबाहेर जंगलतोड केली. प्रदूषण, अवर्षण, जमिनीची धूप या संकटांना आम्हीच आमंत्रण दिले. निसर्गाचे संतुलन बिघडले.


आज मात्र आम्हाला खडबडून जाग आली आहे. वनमहोत्सव हा आमचा राष्ट्रीय उत्सव झाला आहे. कोणत्याही कार्यक्रमाचे उद्घाटन आज वृक्षारोपणाने होते. 'झाडे लावा, देश वाचवा', 'एक मूल, एक झाड' हा आजचा मंत्र आहे. वनसंवर्धन व्हावे म्हणून सरकार कटिबद्ध झाले आहे.


वृक्षांपासून आम्हाला काय मिळत नाही? शीतल छाया, मधुर फळे, पाने, फुले, औषणे, जळण, घरासाठी लाकूड ! वृक्षांमुळे प्राणवायू मिळतो. मेघ आकर्षित होऊन पाऊस पडण्यास मदत होते. घरांची, बागांची, शहरांची शोभा वाढते. जमिनीची धूप थांबते. निसर्गाचे संतुलन टिकून राहते.


वृक्षवेलींच्या सहवासात कवींच्या प्रतिभेला बहर येतो. कवयित्री इंदिरा संत यांना तर वृक्ष जिवाभावाचे सोबती वाटतात.  वृक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. राजस्थानमधील बिश्नोई स्त्रियांनी सुमारे ३०० वर्षांपूर्वी 'चिपको आंदोलन छेडले. त्यात २५० स्त्रियांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन वृक्षांना जीवनदान दिले. आज आम्ही एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. विज्ञान युगात वावरत आहोत. वृक्षांची महती आम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. तरीपण सांगितल्याशिवाय राहावत नाही म्हणून सांगण्याचा हा प्रपंच!

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद