आदर्श विद्यार्थी मराठी निबंध | Adarsh vidyarthi nibandh in marathi

आदर्श विद्यार्थी मराठी निबंध | Adarsh vidyarthi nibandh in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आदर्श विद्यार्थी मराठी निबंध बघणार आहोत.  या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता.आदर्श विद्यार्थी म्हणजे चांगले आचरण करणारा विद्यार्थी. आदर्श विद्यार्थी विद्येवर प्रेम करतो. पुस्तके वाचून त्याचे मनन चिंतन करतो.

 वर्गात प्रथम श्रेणी प्राप्त करण्यासाठी आळस झटकून अभ्यास करतो. आवश्यक ते पाठ करतो. तो जिज्ञासू असतो. नेहमीच नवीन काही शिकण्यास तयार असतो. एखादी गोष्ट त्याला स्वत:ला येत नसेल व त्याच्यापेक्षा लहान असणाराला येत असेल तर त्याच्याकडून शिकण्यात त्याला अपमान वाटत नाही.


विद्यार्थी जीवनाचे अमूल्य महत्त्व लक्षात घेऊन विद्याप्राप्तीच्या बाबतीत तो कधी बेसावध राहत नाही. कठोर परिश्रम करून ज्ञान मिळविणे हे त्यांचे एकमात्र उद्दिष्ट असते. विद्याच त्याला विनम्र बनविते. संस्कृतमध्ये एक म्हण आहे 'विद्या विनयेन शोभते'. आदर्श विद्यार्थी अभ्यासाबरोबरच खेळातही भाग घेतो.


निरोगी शरीरात निरोगी मन असते. म्हणून तो खेळाच्या वेळी खेळ आणि अभ्यासाच्या वेळी अभ्यास करतो. आदर्श विद्यार्थी नेहमी साधी रहाणी व उच्च विचारसरणी या मंत्राचे पालन करतो.

आदर्श विद्यार्थ्याचे उद्दिष्ट हे असते की, सदाचारी आणि आदर्श बनून इतर वर्ग बंधूंना मदत करणे. म्हणून तो गुरुजन, माता-पित्यांचा नेहमी आदर करतो. आपल्या वर्गबंधूवर प्रेम करतो, त्यांना मदत करतो. घरकामात मदत करतो. योग्य व पौष्टिक आहार घेतो. सगळ्यांशी मिळून-मिसळून वागतो म्हणून त्याला कुणी शत्रू असत नाहीत.


तो नियमित शाळेत जातो व आपला गृहपाठही करतो. आदर्श विद्यार्थी नेहमी गोड व सत्य बोलतो. थोर लोकांची चरित्रे वाचून त्यांच्या प्रमाणे होण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या चांगल्या वागणूकीची सर्वांवर छाप पडते. अशा प्रकारे आदर्श विद्यार्थ्यात अनेक गुण एकवटलेले असतात.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका


 निबंध 2
आदर्श विद्यार्थी मराठी निबंध | Adarsh vidyarthi nibandh in marathi



आदर्श विद्यार्थ्याची व्याख्या काय? आपण कोणत्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना या श्रेणीत घालू शकतो? एका आदर्श विद्यार्थ्यात कोणकोणते गुण आणि वैशिष्ट्ये असली पाहिजेत? त्याचा वर्गात नेहमी पहिलाच नंबर असावा का? त्याने खेळात निपुण असले पाहिजे का? 



त्याने खूप विनम्र, सहनशील, आज्ञाधारक असले पाहिजे का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न या संदर्भात उपस्थित होतात. त्यावर चर्चा वाद-विवाद होतात. परंतु हे सर्वच प्रश्न अनावश्क आहेत. कारण कोणत्याही व्यक्तीचे किंवा विद्यार्थ्याचे मूल्यांकन त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या संदर्भात च केले जाऊ शकते. 



एका विद्यार्थ्यात मूलतः अनेक गुणदोष स्वभाव आणि संस्कारांचा समुच्चय असतो. त्याच्या चरित्रावर अनेकांचा प्रभाव असतो, इतरांपासून घेतलेल्या प्रेरणा असतात. एक आदर्श विद्यार्थी म्हणजे एक संपूर्ण व्यक्तिमत्त्व असते. त्याची एक वेगळी ओळख असते. ज्यामुळे तो इतर विद्यार्थ्यांपासून वेगळा उठून दिसतो. 



अशा विद्यार्थ्यांचे स्वत:चे एक शारीरिक, मानसिक आणि नैतिक जग असते. या सर्व संदर्भात विद्यार्थ्याचे आकलन करून घेतले पाहिजे. त्याच्या या व्यक्तिमत्त्वांच्या संदर्भातच त्याची पारख केली पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या कसोट्या वापरण्याची गरज नाही. 


कोणताही आदर्श विद्यार्थी शेवटी एक व्यक्ती आहे. नागरिक आणि समाजाचा एक घटक आहे. त्याच्यामध्ये उणीवा असू शकतात. एखाद्या विषयात तो कच्चा असू शकतो, अशक्त असू शकतो, त्याचे व्यक्तिमत्त्व सामान्य असू शकते. परंतु या सर्व उणीवा आदर्श विद्यार्थी बनण्यात अडथळा बनू शकत नाहीत. 



त्याच्यात अनेक गुण वैशिष्टये आणि प्रतिभा शक्ती असू शकते जी त्याच्या उणीवांना निष्प्रभ करून टाकते. आदर्श विद्यार्थी अभ्यासू असतो. त्याला अभ्यासाची आवड असते. वर्गात शिकविले जात असताना त्याचे लक्ष असते. गृहपाठ तो काळजीपूर्वक पूर्ण करतो. 



परीक्षेत तो उत्तम गुण मिळवून पास होतो. इतरांनी त्याचे अनुकरण करावे असे ते गुण असतात. त्याची बुद्धी कुशाग्र असते. यश हा त्याचा जणू जन्मसिद्ध अधिकारच असतो. तो गर्विष्ठ नसतो. स्वभावत:च तो नम्र, विनयी, आज्ञाधारक आणि स्वाभिमानी असतो. दुसऱ्या विद्यार्थ्याकडे


तिरस्काराच्या दृष्टीने पाहत नाही.
तो त्यांना अभ्यासात मार्गदर्शन व मदत करतो. वेळेची किंमत त्याला चांगली समजते म्हणून तो वेळेचा वापर कौशल्याने करतो. आदर्श विद्यार्थी पुस्तकातील किडा कधीच नसतो. तो जे वाचतो त्याचा जीवनात उपयोग करतो व यशाच्या पायऱ्या चढतो. 


आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतो. निरोगी शरीरात निरोगी मन, बुद्धी असते हे तो जाणून असतो. यापैकी एक नसेल तर दुसरेही नसते. आदर्श विद्यार्थी नीतिमान असतो. त्याचे चारित्र्य, वागणूक, प्रशंसनीय असते. तो दुसऱ्यांसाठी आदर्श व अनुकरणीय असतो. 


सत्य बोलण्याची त्याला सवय असते. हिंसा, चमचेगिरी, निंदा, चोरी त्याला आवडत नाही. त्याच्या स्वभावात गोडवा भोळेपणा प्रमाणिकपणा, नम्रपणा, आज्ञाधारकपणा असे गुण असतात. त्याच्यात उणीवा असतात पण फार कमी. तो कामसू, प्रसन्न आणि परोपकारी असतो.


तो स्वत: स्वच्छ राहतो आपल्या आजूबाजूलाही स्वच्छता ठेवतो. भड़क, महाग आणि फॅशनेबल वस्तूंची त्याला आवड नसते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीवर त्याचा पूर्ण विश्वास असतो. सर्व भूतमात्रांबद्दल त्याच्या मनात करुणा असते.


एक आदर्श विद्यार्थी आपली कर्तव्ये आणि हक्काबद्दल सजग असतो. पण कर्तव्यांना प्रथम प्राधान्य देतो. तो भविष्यातील यशस्वी नेता, नागरिक असतो. विद्यार्थीदशा हा त्याचा निर्माण काळ असतो म्हणून तो या काळात सर्व गुणांचा आणि आदर्शाचा संग्रह करतो. 


तो धाडसी आणि चतुर असतो. वेळेवर योग्य निर्णय घेतो. आपले चारित्र्य, शिस्त याकडे विशेष लक्ष देतो व ते आदर्श बनवितो. थोर व्यक्तींच्या जीवनाचे अनुकरण करीत आपल्या जीवन मार्गावर पुढे जातो. तो कधीही, कोणतेही वाईट कृत्य करीत नाही. वाईट संगतीपासून तर तो दूरच राहतो. 



वेळोवेळी आवश्यकतेनुसार आपले गुरुजन व शिक्षकांकडून मार्गदर्शन घेतो. आपल्या अभ्यासातील अडचणी त्यांच्याकडून सोडवून घेतो. त्याच्या मनात आपले माता पिता, गुरुजन आणि समाजाप्रति कृतज्ञता असते. जी त्याच्या आचरणातून व्यक्त होते. 



आदर्श विद्यार्थी हा शाळा, मातापिता, समाज या सर्वांची अमूल्य संपत्ती असतो. त्याच्याबद्दल सर्वानाच अभिमान वाटतो. अशा विद्यार्थ्यावरच देशाचे भवितव्य अवलंबून असते. असे विद्यार्थी जितके जास्त असतील तितका तो देश भाग्यशाली.


शिक्षक राष्ट्रनिर्माते असतात. अशा प्रकारचे विद्यार्थी निर्माण करून देशाला समृद्ध व संपन्न बनविणे ही त्यांची जबाबदारी असते. आदर्श विद्यार्थी निर्माण करण्यात माता-पिता आणि समाजाचेही योगदान असते. 



सरकारनेही या कामात सहकार्य केले पाहिजे ते असे शिक्षणाचा आणखी प्रसार, प्रचार पुरेसे आर्थिक अनुदान, शिष्यवृत्या, खेळ, इत्यादीची पूर्ण सोय अशा कामासाठी आवश्यक असते. गरिबी, वाईट शिक्षण, अंधविश्वास, वाईट चालीरीती इत्यादी अडथळे दूर केले पाहिजेत. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद