कुसुमाग्रज : एक थोर साहित्यिक मराठी निबंध | kusumagraj essay in marathi


कुसुमाग्रज : एक थोर साहित्यिक मराठी निबंध | kusumagraj essay in marathiनमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण कुसुमाग्रज : एक थोर साहित्यिक मराठी निबंध बघणार आहोत.
'क्रांतीचा जयजयकार' करीत कुसुमाग्रज 'विशाखा' काव्यसंग्रहामुळे प्रसिद्धीस आले. तत्कालीन  वातावरणामुळे ते झपाटले गेले. समाजाची प्रतिक्रिया त्यांनी अभिव्यक्त केली. त्यांच्या तेजोपासक शब्दांतून संघर्षाला कालातीत स्वरूप प्राप्त झाले.


कुसुमाग्रजांचा पिंड सौंदर्यलक्षी आत्मनिष्ठ कवीचा; मूर्तापेक्षा अमूर्ताकडे, व्यक्तापेक्षा अव्यक्ताकडे जाणाऱ्या ओढीचा होता. त्यांची दृष्टी सारखी कशाचातरी वेध घेताना दिसते. आत्मचिंतन, देव, प्रीती; तर कधी सामाजिक अंतर्जीवनाचा शोध यांचा वेध ती घेते. गतीची विलक्षण ओढ, हीही त्यांच्या काव्याची प्रेरणा होती. उदा. 'पृथ्वीचे प्रेमगीत' तसेच विश्वातील अंतिम तत्त्वाचा शोध, जीवनासंबंधीचे कुतूहल, औत्सुक्य यामुळे त्यांची कविता रसरशीत, टवटवीत राहिली आहे. 


जोरकस सामाजिक आशय,  सृष्टीचे वास्तव दर्शन, विचारांनी जाण व कर्तव्याचे भान असलेली उत्कट प्रीती, रूपकात्मतेने साधलेल्या दृश्य प्रतिमा, प्रभावी नाट्यमयता, निसर्गाचे कल्पनारोपित व्यक्तिमत्त्व, अत्यंत आवाहक बौद्धिक प्रतिमा, अशी समृद्ध व्यक्तिमत्त्वाची कविता कुसुमाग्रजांनी दिली.


घरातील पोषक वातावरण,  घरातील पुस्तकांमुळे निर्माण झालेले वाचनवेड, लहानपणीचे संस्कार अन् इतिहासप्रेम यातून कुसुमाग्रज काव्यलेखनाकडे वळले. 'कविता म्हणजे केवळ अर्थात्मक विधान वा एखाद्या विधानाचं सालंकृत पद्यमय स्वरूपही नसून, एखाद्या अनुभवाच्या गाभ्यापर्यंत नेणारी ती एक अलौकिक शक्ती असते,' याचा प्रत्यय त्यांना दत्तोपंत पुरोहित या शिक्षकामुळे आला.

गोविंदाग्रजांच्या काव्यगायनाने त्यांना जाणीव आली की, 'शब्दसंपत्ती वाढविण्यापेक्षा काव्याचं काहीतरी वेगळं कार्य आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाची मूलद्रव्ये कवितेमध्येच प्रवाहित होताहेत, असं त्यांना वाटे. ते म्हणत, “पहिला दिवा कुठल्यातरी मोठ्या दिव्यावर पेटवावा लागतो. हे कार्य माझ्या बाबतीत गडकऱ्यांच्या साहित्यानं केलं. बालकवी, गडकरी, माधव जूलियन, भा.रा. तांबे व केशवसुत यांना मी निष्ठेनं वाचलं. त्यांनी मला खूप दिलं."


वयाच्या अठराव्या वर्षी कुसुमाग्रजांचा 'माधवी' हा संग्रह प्रसिद्ध झाला.  'ज्योत्स्ना' मासिकात १९३६ मध्ये कुसुमाग्रजांची स्वप्नाची समाप्ती' ही कविता प्रसिद्ध झाली. त्यामुळे त्यांच्यावर 'उद्याचा कवी' ही मुद्रा उमटली. वि.स. खांडेकरांनी त्यांना पाहिलेलेही नव्हते. तरी त्यांचे ‘विशाखा' हे काव्य स्वखर्चाने छापले. त्यांचे पहिले १९४२ चे 'विशाखा'चे प्रकाशक खांडेकर होते. म्हणजे आपल्या काव्यशक्तीद्वारा कवितेवर प्रेम करणाऱ्या ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तींवरही कुसुमाग्रज किती प्रभाव गाजवत होते, याचे हे गमक होय.

पु. ल. देशपांडे म्हणतात, "माझे जन्मनक्षत्र मला ठाऊक नाही; परंतु माझे तारुण्य जन्मले, ते कुसुमाग्रजांनी आकाशात सोडलेल्या 'विशाखा नक्षत्रावर... माझ्या तारुण्यातला कवी मला भेटला. पुढील सारे दिवस 'विशाखा'चे. ह्या काळात प्रेम केले, ते 'विशाखा'तल्या ओळींनी प्रेमपत्रे सजवीत.'कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल।

रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल ।'

सारख्या ओळींनी मनातल्या त्वेषाला वाट फोडली. भोवतालच्या घडामोडींचे संस्कार ज्यांच्या ज्यांच्या मनावर ह्या काळात जाणतेपणाने उमटत राहिले होते, त्यांचे त्या यौवनकाळातले उद्गाते कुसुमाग्रज होते.मानवाचे दु:ख मानवानेच निर्माण केले आहे, अशी त्यांची श्रद्धा आहे. परमेश्वरावर आग पाखडण्याऐवजी माणसातील मानवता जागृत करण्यातच त्यांचे मन रंगते. एकीकडे विश्वाचे गूढ, जीवनातील प्रश्न त्यांना हतबुद्ध करतात;


 दुसरीकडे मानवानेच मानवतेची केलेली विटंबना व पायमल्ली दिसते आहे, त्याचबरोबर मानवाची आपल्या अंगभूत दौर्बल्यावर मात करण्यासाठी चाललेली धडपड, त्याचे जयपराजय, औदार्य, शौर्य, ध्येयासक्ती, दुर्दम्य इच्छाशक्ती यांचाही साक्षात्कार होत आहे. जीवन ही एक लढाई आहे व तिच्यात अनेकदा मानव होरपळून निघत असला, तरी तो शरणागती स्वीकारत नाही, यातच कुसुमाग्रजांना समाधान आहे.

कुसुमाग्रजांना 'मानवतेचा कवी' असे वि. स. खांडेकर संबोधतात. अंतराग्नी क्षणभर फुलवणारी, चिरयौवना प्रतिभेचे नव्या उन्मेषांची साक्ष देणारी त्यांची कविता 'झरा मुळाचाचि खरा' आहे, असं पु.ल. गौरवतात. कुसुमाग्रजांच्याच शब्दांत -

'किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोऱ्यात

अन् लावा हृदयात सख्यांनो आशेची वात !' कुसुमाग्रज या स्थितप्रज्ञ तपस्वी कलावंताचे अंत:करण सागरासारखे विशाल आणि खोल आहे. त्यांचे धैर्य आणि शांती एखाद्या मानदंडासारखी आभाळाला भिडलेली आहे. व्यवहारातल्या सुख-दु:खांचे प्रचंड आघातही विचलित न होता अबोलपणे सोसण्याचे विलक्षण सामर्थ्य त्यांच्याजवळ होते. माणसांच्या गराड्यात राहूनही ते आजन्म एकाकी होते, असं वर्णन वसंत कानेटकर करतात.शेक्सपिअर, गडकरी यांच्या जातकुळीतले शिरवाडकर नाटककार होते. 'नटसम्राट', 'ययाति आणि देवयानी', 'वीज म्हणाली धरतीला', 'विदूषक', 'आनंद' अशी नाटके नाट्यसृष्टीची लेणीच होत. त्यातलं काव्य नि स्वगतं लक्षणीयच... उदा. 'सृष्टीतील सृजनशक्तीचा, मी आहे एक खास उन्मेष...'

'काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही...'

'माझ्या आनंदलोकात चंद्र मावळत नाही...' 

तसेच त्यांच्या सहजोद्भव स्वगतांच्या तळाशी, जीवनाच्या अनिर्वचनीय चैतन्यरूपाशी आपली उराउरी गाठभेट होते. तेच त्यांच्या प्रतिभेचे विशद्ध रूप! 'जाईचा कुंज' व 'श्रावण' हे दोन बालगीतसंग्रह कुसुमाग्रजांनी बालकांचे पुरवलेले बालहट्टच. त्यांच्यासाठी घातलेला जणू भर्जरी मांडव. 


संभाषणात्मक, नाट्यात्मक, लयबद्धता, विनोद, लडिवाळपणा यामुळे कुसुमाग्रजांची बालगीते हा मराठी वाङ्मयाला मिळालेला आणखी एक नजराणाच आहे. त्यात बाह्य बदलाबरोबर मुलांच्या मनात झालेल्या बदलांचीही नोंद या कवितांचं वैशिष्ट्य आहे.


कुसुमाग्रज कोणत्याही सामाजिक, राजकीय, धार्मिक, वाङ्मयीन तत्त्वप्रणालीचे, संप्रदायाचे नव्हते. ते तर विश्वमानव होते. रवींद्रनाथांची आठवण देणारे, ज्ञानपीठाची श्रीमंती वाढवणारे ऋषी होते. त्यांच्याच शब्दांत :  

'जाता जाता गाइन मी, गाता गाता जाइन मी

गेल्यावरही या गगनातील, गीतांमधुनी राहिन मी...' 

असे शाश्वत शिल्लक राहणे अद्वितीयच. जणू मृत्युंजयतेचा आविष्कारच वा विलयपथावरील चिंतन. या सुंदर प्रवासाच्या निरोपाची स्वरांजली म्हणजे 'मारवा' आनंददायी प्रवासाची सांगताच ! जाता जाता या थोर साहित्यिकाच्या सामाजिक बांधिलकीच्या एका आयामाकडे लक्ष देणे गरजेचे वाटते. तो म्हणजे पारतंत्र्यात पत्रकारितेसह कुसुमाग्रजांच्या वाट्याला जो तुरुंगवास आला, त्या जाणिवेचे श्रेष्ठ नेणिवेत झालेले प्रकटीकरण अर्थात् त्यांनी जनमानसाला दिलेला फटका... 'स्वातंत्र्यदेवतेची विनवणी'. ही कविता स्वातंत्र्याचा चुकीचा अर्थ लावणाऱ्या सुस्त जनांसाठी.


 त्यात आम्हां सूर्यकुलाच्या वारसांना काळोख - पूजनास विरोध करताना ते २१ व्या शतकास सामोरे जाताना १६व्याला विसरायला सांगतात आणि त्याचवेळी शब्दांचा आसूड ओढून वेतन खाऊन काम टाळणे हा देशद्रोह असल्याचे अंजन घालतात. भ्रष्टाचार, बेजबाबदारी, सत्तामाज यावरही कोरडे ओढतात आणि चांगल्याला चांगलं म्हणा, कुणाचं उणेपण उघडं पाडू नका, पुतळ्यांचं स्तोम माजवू नका, हे सांगतानाच भेदाभेदाच्या उकीरड्यात बुजण्यापेक्षा माणुसकीत देव पहा, असा संत' उपदेशही देतात.

 स्त्रीपुरुष समानता पाळा, स्त्रीला दासी वा देवी बनवू नका. अनेक मूल्यांचं बीजारोपण करणारी ही कविता दुर्जनांसाठी हाती हत्यार घेणाऱ्यांचेही आवाहन करते. त्याचवेळी पहिल्या जागतिक मराठी परिषदेचा हा स्वाभिमानी नेता म्हणतो - 'माय मराठी मरता इकडे परकीचे पद चेपू नका.'

'ज्ञानसाधनेसाठी परभाषेत पारंगत व्हा,' असं सांगताना भाषा मेली, तर देश मरतो आणि संस्कृतीचा दिवा विझतो, याचीही जाणीव वेळीच देतो.  नाट्यलेखनात लीलया गती दाखवली, बालकांचं मनोरंजन केलं, बालगाणी लिहिली, सामाजिक प्रश्नांची उकल साहित्याचा विषय' बनवली, सरस्वतिपुत्रांत अजातशत्रू राहून आपल्या जाण्यानं गोदातीरी आमची अश्रुगंगा उधाणली, ते कुसुमाचे अग्रज आम्हाला आणखी काही काळ हवे होते.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत