प्रौढ शिक्षण काळाची गरज मराठी निबंध | proud shikshan kalachi garaj marathi nibandh

प्रौढ शिक्षण काळाची गरज मराठी निबंध | proud shikshan kalachi garaj marathi nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण प्रौढ शिक्षण काळाची गरज मराठी निबंध बघणार आहोत. 'कालाय तस्मै नमः' असं आपण म्हणतो, तेच मुळी काळाचं माहात्म्य ओळखून. काळाच्या पावलांबरोबर आपली पावलं मिळवली गेली म्हणजे वैफल्य/ वैराग्य येत नाही. कुठलीही ओढाताण होत नाही. असा अनुभव आपण नेहमी अनेक क्षेत्रांत घेत असतो. तीच गोष्ट प्रौढ शिक्षणाची'ही ! आपल्याला शिक्षणाची गरज आहे,


शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असं अलीकडे प्रौढांनाही जाणवू लागलं आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे आजचं विज्ञानाचं, धावपळीचं आणि स्पर्धेचं युग, ज्यात सहजासहजी निभाव लागणं दुरापास्तच ! प्रौढांमधील शिक्षणाचा अभाव हे जणू एक राष्ट्रीय दुर्दैवच आहे. त्यामुळेच इतर पाश्चात्त्य देशांच्या मानाने भारत बऱ्याच आघाड्यांवर मागे आहे. आर्थिक, औद्योगिक पीछेहाटीच्या मुळाशी विविध कारणं असूशकतील; पण प्रौढ शिक्षणाची कमतरता, हेही एक कारण आहे.


स्त्रीशिक्षणासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात फुले- कर्वे यांच्यासारख्या थोर विभूतींनी काय कमी प्रयत्न केलेत? पण मुलीच्या जातीला कशाला हवंय एवढं शिक्षण? रांधा, वाढा नि उष्टी काढा' अशी चुलीपुरती मनुसारखी मनोभूमिका समाजमनानं बरेच दिवस हेकेखोरपणे सोडली नाही. त्यामुळे अनेक पिढ्यांपर्यंत स्त्री बाल्यापासून प्रौढत्वापर्यंत अक्षरशत्रूच राहिली.पुरुषप्रधान संस्कृतीत ती घराबाहेर न पडल्यानं आणि व्यवहारापासून दूर राहिल्यानं हे सर्व निभूनही गेलं; पण आज परिस्थिती वेगळी आहे. स्त्री 'जिजाऊ'च होऊ शकली नाही, तर शिवबा निर्माण होणं दूरच राहिलं ! पुरुषांसंदर्भात आणखीनच विचित्र प्रकार आढळून येईल. एखाद्या समाजाला चातुर्वर्ण्य नडला, काहींमध्ये तर शिक्षणाची व्यवहारात काही गरज असते, या विचारांशीच फारकत होती.काही समाजांमध्ये निदान पोथ्या वाचता येणं उदरभरणास आवश्यक आहे, असं जाणवल्यानं थोडंफार बुकदर्शन झालं. त्यामुळे शाळांमधून स्थगिती, गळती यासारख्या प्रकारांनी पुरुषांनीही आपणहून स्वत:ला शिक्षणाची दालनं बंद करून घेतली.आज ही कवाडं किलकिली करणं गरजेचं आहे, असं नव्हे, तर ती सताड उघडण्याची नितांत गरज भासू लागली आहे. तरच विकासरूपी सूर्याचं दर्शन होणार आहे. मग तो विकास वैयक्तिक स्वरूपाचा असो वा नसो. शेवटी अनेक व्यक्तींचा विकास हा पुढं सामाजिक अन् नंतर राष्ट्राचाही विकास ठरतोच. म्हणूनच प्रौढ शिक्षण राष्ट्रीय स्तरावरून सुरू असलं, तरी तो वैयक्तिक पातळीपासून हाताळणं तितकंच महत्त्वाचं आहे.
'व्हय, मी सावित्री' नावाचा व्हिडीओपट सुषमा देशपांडेंनी पूर्ण केला आहे. रत्नागिरी जिल्हा साक्षरता आंदोलन समितीतर्फे तो बनवला आहे. हा ९० मिनिटांचा व्हिडीओपट साडेनऊ लाखांत तयार होणार होता; पण केवळ सात लाखांत बनला. कारण तंत्रज्ञ, कलावंत व लेखक यांनी कपर्दिकही मानधन म्हणून घेतली नाही. शिवाय, मुख्यमंत्री निधीतून पाच लाखांची मदतही मिळाली आहे... तर हे कशाचं निदर्शक आहे?'अक्षरधारा' हा एक प्रयत्न यासदंर्भात दूरदर्शननं केला. त्याची फलनिष्पत्तीही चांगली झाली. पूर्वी रात्रीच्या शाळा असत. पुढे जनशिक्षण निलयम केंद्रे आली. (बंद झाली आहेत). प्रौढांना अक्षरदोस्त बनविण्यासाठी पूर्वी शिक्षकांचा सहभाग खूप मोठा होता. आता घराघरातनं प्रौढांची अक्षरांशी मैत्री व्हावी, असा प्रयत्न करणारांची मोहीम सुरू झालीय. नातीनं आजीस 'काठी'ऐवजी पाटी' देणं तसेच मुलानं आईचं बोट' धरण्याऐवजी आईच्या बोटात 'पेन्सिल/खडू' दिलाय. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणं सुरू झालंय. 'अक्षरपूजा हीच खरी ईश्वरसेवा' ठरू पाहत आहे, हेच खरं!आज शिक्षणाचं महत्त्व जवळजवळ सर्वांनाच पटलेलं दिसतंय. या प्रक्रियेत मूल हे 'पाया' असेल, तर प्रौढ कळस' असतो. कळसाला दिमाखानं तळपायाचं असेल, तर अजूनही वेळ गेलेली नाही' या भूमिकेनं प्रौढांनी प्रौढशिक्षणाचं बोट धरून वयसुलभ कूर्मगती न ठेवता, भरधाव धावून काळाच्या पडद्याआड होण्याआधी/होण्याऐवजी काळाबरोबरच राहण्याचा निश्चय करायला हवा. कारण ती काळाची गरज आहे.त्यासाठी राष्ट्रीय व राज्यस्तरावर शासन करीत असलेले प्रयत्न निश्चितच स्तुत्य... अभिनंदनीय नि दिशादर्शक आहेत. औरंगाबाद येथील 'लोकशिक्षण मासिकापासून वा प्रौढ शिक्षण संस्था, त्यांचे प्रकल्प इत्यादींपासून दिल्ली येथील मानवसंसाधन मंत्रालयाच्या प्रौढ शिक्षा निदेशालयापर्यंत कितीतरी संस्थांकडे अंगुलिनिर्देश करता येईल. इरगोंडा पाटलांचं वृत्तपत्रीय लेखन असो वा प्रौढ साहित्यनिर्मितीसाठीची राष्ट्रीय स्पर्धा असो, असे अथक प्रयत्नच काळाची गरज भागवू शकतील. समाजोन्नतीचा हा प्रकाशमान मार्ग सहस्र वाटांनी उजळून निघण्याचा दिवस आता दूर नाही. .
'मला काय त्याचं?' ही भूमिका त्यजून ‘अनेक मी एकत्र येऊन आम्ही बनतो' या न्यायानं प्रत्येकानं काळाच्या या हाकेला ‘ओ' देणं कर्तव्य समजून, घर- परिसर, गाव क्रमाक्रमानं साक्षर करण्यास हातभार लावल्यास सामाजिक ऋणातून मुक्ती मिळाल्याच्या आनंदाचा धनी' होता येईल. हा आनंद परमानंद असतो, याची प्रचीती येईल. चला दिव्याचा दिवा पेटवू यात...!प्रश्न सोडवताना तो निर्माणच होणार नाही, याची काळजी घेतली, तर सुंठीवाचून खोकला जाईल, असं नाही का वाटत? त्यासाठी मुळातच, प्रौढत्त्वापूर्वीच बालकांना मिळणाऱ्या शिक्षणाकडे लक्ष पुरवलं, तर हा प्रश्न मात्र पुष्कळअंशी निकालात निघेल. न रहेगा बांस....! अर्थात थोडं सूक्ष्म निरीक्षण केलं, तर आशादायक परिस्थिती येऊ घातल्याचं निर्दशनाला येतंय. शाळाशाळांतून आता पालक मुला-मुलींना स्वत:च आणून सोडत असल्याचं विलोभनीय दृश्य 'याचि देही याचि डोळा' दिसतंय, ही काय कमी समाधानाची बाब आहे?
राष्ट्राची ही पायाभरणीची भक्कम सुरुवात, उद्याच्या भरतभूमीतनं पुन्हा सोन्याचा धूर निघण्याची शक्यता निर्माण करील. त्याचीच ही नांदी नाही काय? हा प्रश्न आज १०० टक्के सुटण्यासाठी हाती काय अन् किती उरलेय्? याचा प्रत्येक सुज्ञ नागरिकानं विचार करण्याची वेळ निश्चितच आली आहे. प्रौढ आहेत. शिक्षणाची इच्छा आहे. महत्त्व पटलंय. पणती आहे, तेल आहे, त्यात वातही भिजलीय.आता गरज आहे तुमच्या-माझ्यासारख्यानं ती प्रयत्नपूर्वक पेटवण्याची, चेतवण्याची. म्हणजे अज्ञानाचा अंधार पळेल सहस्र वाटांनी... प्रकाशाचं साम्राज्य अंतरीचे दिवे उजळून वाढेल. अंधारातले दिवे झगमगतील. ही नाळ आता जुळायलाच हवी.


ज्ञानेश्वरमाऊलींनी अठराव्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे ‘कर्मे अभ्यंतर उजळे ।' असं प्रौढ शिक्षणाच्या पुण्यकर्मानं आपलं अंतरंग निर्मळ झाल्याचा साक्षात्कार या निमित्तानं आपल्याला होईल. असं समाधान कुणाच्या नशिबी आहे?.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद