आमची सहल मराठी निबंध | aamchi sahal marathi nibandh

आमची सहल मराठी निबंध | aamchi sahal marathi nibandh

निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आमची सहल मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून 3 निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता.  सहल म्हणजे नवचैतन्य, जणू काही नव्याने मोहरणे। सहल म्हणजे निसर्गाशी एकरूप होणे, जणू काही निसर्गाशी हळुवार हितगुज ।। सहल म्हणजे उत्साहाने चिंब भिजणे, जणू काही पावसात न्हाऊन निघणे। सहल म्हणजे सुख दुःख विसरणे, जणू काही नव्या जगण्याचा नवा मंत्र देणे।


सहल...! पावसाचा पहिला थेंब अंगावर पडताच ज्याप्रमाणे रोमारोमात चैतन्य फुलून येते, त्याचप्रमाणे सहल म्हटली की मनामध्ये आनंदाचे, उत्साहाचे, चैतन्याचे, मोरपिसाप्रमाणे उडण्याचे अनेक तरंग आपोआप उमटू लागतात, हेलकावे खाऊ लागतात.


आनंद, त्या अप्रतिम निसर्ग सौंदर्याचा, उत्साह नवनवीन जाणून घेण्याचा, चैतन्य तारुण्याने मोहरून जाण्याचा खरेच, निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य, त्याच रूप, त्याची परोपकारी वृत्ती, त्याची अद्भुतता, त्याच रूप, त्याची परोपकारा वृत्ती, त्याचे सामर्थ्य, त्याचे मित्रत्व या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील किंवा त्याची गोडी खरोखरच चाखावयाची असेल तर केवळ पुस्तकात वाचून ते खरोखर अनुभवता येणारच नाही, म्हणूनच म्हणावेसे वाटते...

केल्याने देशाटन पंडित मैत्री, सभेत संचार।

शास्त्रग्रंथ विलोकनेन, मनुजा चातुर्य येतसे फार।। 


आणि हे चातुर्य हा अनुभव घेण्यासाठी आपली पावले निसर्गाकडे वळलीच पाहिजे. निसर्गाचे खरेखुरे रूप पाहण्याचा, त्याच्यात डुंबण्याचा व त्याचा खराखुरा आनंद उपभोगण्याचा एक सोपा, सरळपणा सुखद मार्ग म्हणजे सहल, १५ जुलैपासून सुरू झालेला आमचा स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा वर्ग नेहमीप्रमाणे चालू असतानाच एक दिवशी सरांनी अशी सूचना दिली की, वर्गातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटल्याशिवाय राहिले नाही आणि ती सूचना होती आमच्या सहलीची, सज्जनगड, चाळकेवाडी आणि ठोसेघर येथे जाण्याची,


सहलीचा दिवस उजाडला. प्रत्येकाचा आनंद ओसंडून वाहत होता. म्यानातून उसळत्या तलवारीप्रमाणे आमच्या गाड्या निघाल्या. कात्रजच्या घाटातून जातानाच निसर्गाचे विविध पैलू, छटा अनुभवास आल्या. बसमध्ये आनंद अन् उत्साहाला उधाण आलेले होते. गप्पा रंगल्या होत्या नवनवीन गाणी सुचत होती. 


प्रत्येकजण या आनंदामध्ये भिजून त्याचा मनमुराद आनंद उपभोगत होता तरीदेखील मधून मधून माझी नजर मात्र बाहेरच्या सृष्टीवर खिळत होती. निसर्गाची किमयाच निराळी. घाटातून मार्ग काढताना हिरव्या गार वनराईचे नटलेल्या सह्याद्रीच्या रांगा मात्र आकाशाला गवसणी घालताना उंच उंच दिसत होत्या.


अनेक कवी, लेखकांच्या लेखणीतून सह्याद्रीसाठी वेगवेगळी वर्णन, उपमा लिहिल्या गेल्या. मुळातच सह्याद्री हा ज्वालामुखीचा उद्रेक अति प्रचंड, अति राकट, अति दणकट पण तेवढाच मोहक, सामर्थ्य हेच त्याचे खरे सौंदर्य एकीकडे सह्याद्रीच्या रांगा तर दुसरीकडे मात्र धरणी हिरवा गर्द शेला पांघरल्यासारखी दिसत होती आणि केशरी, पिवळ्या रंगाच्या फुलांची भरजरी नक्षी त्याचे सौंदर्य आणखीनच खुलवत होती, फुलवत होती. 


जणू हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणाच्या मखमालीचे ।। घाटाघाटातून वळणे घेत रस्ता कापत आमची गाडी सज्जनगडाच्या पायथ्याशी पोहोचली. साताऱ्याच्या नैर्ऋत्येस तीन कोसावर हा गड आहे. शिवाजी महाराजांच्या शौर्याचे, कर्तृत्वाचे, जाज्वल्यतेचे साक्षीदार म्हणून आजही हे किल्ले ताठ मानेने आणि अभिमानाने उभे आहेत. त्यामुळे सज्जनगडाची एक एक पायरी चढताना हृदय अभिमानाने भरून येत होते. सज्जनगडाचे पूर्वीचे नाव 'परळी' पण नंतर शिवाजी महाराजांनी ते बदलून 'सज्जनगड' केले, सज्जनगडावर श्री समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. त्यांनी स्वतः स्थापन केलेले रामाचे व मारुतीचे मंदिर देखील आहे. आपल्या आयुष्यातील शेवटचा बराचसा काळ समर्थांनी सज्जनगडावर घालविला. गडावर त्यांचे शेजघर आहे. तेथे ते वापरत असलेले अनेक वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत.


त्यानंतर आम्ही पोहोचलो ते 'ठोसेघरचा धबधबा पाहण्यासाठी. सह्याद्रीच्या खांद्यावरून स्वच्छ, शुभ्र, फेसाळलेल्या जलधारा कोसळताना मनामध्येसुद्धा अनेक तरंग उमटत होते. अनेक कल्पना आकार घेत होत्या. जणूकाही असंख्य मेघ आपल्या घागरी घागरीने सह्याद्रीच्या मस्तकावर धारा धरून त्याला स्नान घालत आहेत . हिरवळीची मखमल, त्याचा होणारा स्पर्श, वाऱ्याची सळसळ, दूर क्षितिजापार डोंगराच्या रांगा, माथ्यावर झुलणारे निळे निळे आकाश सगळेच अवर्णनीय..


खूपदा निसर्गाच्या सान्निध्यात आपल्यापासून आपण दूर झाल्यासारखे वाटतो. अहंभावाचे आवरण जणू निसटून जाते. फक्त वर तेजाळलेले भव्य आकाश आणि खाली धरती. अहंकाराला कणमात्र थारा न देणारी सृष्टीची ही जादू मनुष्य स्वभावाला आपोआपच स्पशून जाते आणि तो स्वतःला धन्य मानतो.


पुढचे ठिकाण होते चाळकेवाडी, पवन ऊर्जेसाठी म्हणून हा एक प्रसिद्ध प्रकल्प आहे. समुद्रसपाटीपासून साधारणतः १००० मी. उंचीपेक्षा अधिक हा प्रकल्प आहे. पवनचक्क्यांचा प्रचंड आकार, पाहून खरच खूप थक्क व्हायला होत. त्याच्या एका पात्याची लांबीच साधारणतः सहा मीटर व उंची एवढी की वर पाहताना डोक्यावरील टोपीच खाली पडावी. नजर जाईल तिकडे चोहोबाजूंना उंचच उंच पवनचक्क्या निसर्गातील प्रत्येक कणन् कणाचा मनुष्यप्राणी आपल्या गरजेसाठी, स्वार्थासाठी, सोईसाठी कशा कल्पकतेने वापर करतो याचा प्रत्यय तेथे येत होता. त्याचप्रमाणे त्याच्या बुद्धीची चुणूक परत एकदा सिद्ध झाली होती.


नंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. कदाचित त्याचमुळे बसमध्ये दंगा, गोंधळ, मस्ती, चेष्टामस्करी याला उधाण आले होते. एका तासात आम्ही 'केतकावळे' येथे पोहोचलो. बरेच अंधारून आले होते. श्री बालाजीचा झगमगणारा कळस, त्या मंदिरातील नक्षीकाम, शिल्पकला, रंगकला या सर्व गोष्टी प्रकाशाच्या झगमगाटामध्ये उजळून निघाल्या होत्या. खरोखरच अप्रतिम अशा त्या श्री बालाजीच्या मूर्तीवर तर नजर हटायलाच तयार नव्हती.


सव काही अवर्णनीय श्री बालाजीचे शांत मंदिर आल्हाददायक शीतल हवा. ती निसर्ग शोभा. धार्मिक व पौराणिक माहात्म्यामुळे आपोआपच निर्माण झालेले वातावरण मानवी मनाला एकदम कठेतरी दूर भावनांच्या अवर्णनीय कल्लाळात अलगद घेऊन जातेच. _ मंदिरातील सर्वांत मनाला भावणारी गोष्ट म्हणजे निखळ स्वच्छता ! की जी गोष्ट मंदिरामध्ये क्वचितच अनुभवास येते. तथाल प्रसाद घेऊन, मंदिरातील शिल्पकला जेवढी म्हणून डोळ्यात साठवता येईल तेवढी साठवून आम्ही बसमध्य बसलो आणि एक दिवसाच्या सहलीतील शेवटच्या मार्गाला लागलो.


एक दिवसाच्या सहलीतील शेवटचा टप्पा, पण तोही आनंदातच गेला पण मनाच्या कोपऱ्यात या सहलीचा शेवट झाला आहे, याची सारखी जाणीव होत होती. दिवसभरातील अनेक प्रसंग एका मागून एक पटापट डोळ्यासमोरून जात होते आणि मी अस्पष्ट गाणं गुणगुणत होते.


"ये कौन चित्रकार है...

ये कौन चित्रकार है..." 


पण शेवटी एकच गोष्ट सांगावीशी वाटते, कोवळ्या उन्हात गवताच्या पात्यावर चमकणारे दवबिंदू, ऊन-पावसाच्या खेळात अचानक प्रकटणारे इंद्रधनुष्य, या सगळ्या गोष्टींच्या मागची शास्त्रीय कारणे शाळेत घोकून घोकून पाठ केलेली असला तरी अजूनही त्या घटना, आपल्याला तेवढ्याच रोमहर्षक, अद्भुत वाटतात. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस उजळवून टाकायचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. अशी ही सतत अवती-भोवती बागडणारी छोट्या-छोट्या घटनांची फुलपाखरे आपल्या मनावर चढू पाहणारी प्रौढ वयाची धूळ आपल्या पंखांनी वरच्या वर झटकून टाकतात आणि आपल्या जीवनाला एक नवा उत्साह, आनंद देऊनच जातात कायमचा.  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 2

आमची सहल मराठी निबंध | aamchi sahal marathi nibandh

 १ मे, 'महाराष्ट्र दिन', महाराष्ट्र स्थापनेचा दिवस. आम्ही महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी-मित्र मंडळींनी एकदम महाराष्ट्राची देवता 'श्री छत्रपती शिवरायांच्या राजधानीवरच कूच करण्याचे ठरविले. आत्तापर्यंत मुंबईतील प्रवेशद्वाराच्या शिवरायांच्या भव्य पुतळ्याखाली बसून... त्याला न्याहाळून महाराजांच्या थोरवीचे गुणगान ऐकले, त्यावर चिंतन केले होते. आणि आता पक्का निश्चयच केला की, शिवरायांची कर्मभूमी 'याचि देही याचि डोळा' मनसोक्त निरखायची आहे. 


शिवरायांची जेथे पावले पडली, शिवरायांची जिथे तासन्तास खलबते चालत, स्वराज्याचे मनसुबे बांधले जात, त्या वास्तूत आपणही भारावून जावे, अशी तीव्र इच्छा आमच्या मनात होती. त्या असामान्य, भव्यदिव्य उदात्त व्यक्तित्वाच्या पासंगालाही आम्ही उतरणार नाही. परंतु त्यांच्या पराक्रमाच्या पूर्वस्मृती चालवून ती आपण पुनीत होऊ या, या जबरदस्त ऊर्मीने आम्ही रायगडाचे दर्शन घेण्याचे ठरविले... सोबत होते माझ्यासारखेच महाराजांचे भक्त... माझी मित्रमंडळी.


झुंजू मुंजू झाले आणि भल्या पहाटेच्या वेळी किल्ला चढायला आम्ही सुरुवात केली. उन्हे वाढण्याच्या आत गड चढून जाण्याचा मनसुबा होता. अंधूक प्रकाशात गडावरील बुरूज दिसत होता. चढाचा अंदाज घेत घेत पुढे सरकत होतो. पायाखालची लाल माती सरकू लागली. गडाचा चढ चढणे, अवघड आहे. याची जाणीव झाली. बाजूच्या झाडाच्या फांदीचा आधार घेत घेत वर वर जात होतो आणि 'महाराज' या वाटेवरून रात्री-बेरात्री घोड्यावरून कशी दौड करीत असतील याचा विचार करीत राहिलो.


दुपारच्या साडेदहा-अकराच्या सुमारास गडावर पोहोचलो अन् समोर महाराजांची सदर, दरबार, वाडा, राहण्याची जागा दिसू लागली. मन एकदम उसळून पुढे पुढे धावू लागले तर इकडे शरीर थकून गेले होते. मटकन सगळेजण खालीच बसलो. तहान लागली होती. पाण्याचा शोध घेतला. थंड निर्मळ पाण्याचा प्रवाह दिसला अन अधाश्यासारखे पाण्यावर सर्वजण तुटून पडलो. 'अमृततुल्य' पाण्याने आमचा थकवा कोठल्या कोठे पळून गेला आणि पुनश्च ताजेतवाने होऊन मार्गी लागलो.


गडावरील त्या पवित्र वास्तूचे दर्शन अतिशय भारावलेल्या नजरेने आम्ही घेत होतो. सोबत महाराजांच्या आठवणी ही जागवत होतो. इथेच छोटे शिवबा आणि जिजाऊ माँसाहेब एकत्र बसले असतील. शिवरायांना त्या आशीर्वाद देत असतील.


पुढे गेल्यानंतर शिवाजी महाराजांचा दरबार आढळला. आता एकूण सारी भव्य-दिव्य वैभवसंपन्न, पराक्रमानी भरलेला ता वास्तू आता अगदी अवशेष रूपातच उरली आहे. परंतु आपण मराठी माणसे, शिवरायाला, जिजाऊमातेला, दादोजी कोंडदेवाना विसरणे केवळ अशक्य...नसानसांत भरला आहे, तो स्वराज्य स्थापनेचा इतिहास. 


दरबार पहाताच चटकन एका क्षणात मनश्चक्षूसमोर उभ्या राहिल्या. त्या जिजाऊमाता, त्यांचा तो थरथरणारा हात, राज्याभिषेक पाहण्यासाठी आतुरलेले डोळे क्षीण झालेला आवाज, महाराजांची ती धनुष्यबाण हाती घेऊन रुबाबात आसनस्थ झालेली मूर्ती, राज्यारोहणाचा तो सोहळा, पवित्र मंत्रोचारांनी गुंजून गेलेला तो आसमंत, गंगा-यमुनासारख्या पवित्र अष्टनद्यांचा तो अभिषेक, तिथे उभे असलेले तेजःपुंज असे गागाभट्ट, अवतीभवती सजवलेल्या महालात उभे असलेले मंत्रीगण, मावळे, सरदार, औक्षण करण्यासाठी सज्ज महिला एक ना दोन. मूर्तिमंत ते चित्रच, डोळ्यासमोरून हालेना. दिङ्मूढ होऊन माझे सारे मित्रही जणू तेच पाहत उभे होते. सर्वांची अवस्था एकच झाली होती.


तोफखान्याची जागा दाखवीत एका पडक्या भिंतीकडे बोट दाखवीत मार्गदर्शक सांगत होतो. इथे 'महाराजांचा महाल' होता. त्याच महालात राजे संभाजी आणि पिता शिवाजीराजे यांच्या भेटीगाठी, उपदेश, सुख-दुःख यांचे अनेक प्रसंग घडले असतील. 


राजांची बाजारपेठ-लांबलचक पसरलेली... खास घोड्यावरून, हत्तीवरून माल घेता यावा म्हणून दुकानाची जोती उंचावर असलेली तो भग्नावशेष स्वरूपात पाहताना वाटले. या अशा उंच गडावर हत्तीसारखे अवाढव्य प्राणी कसे बरे वर चढून आले असतील ? खरंच 'अद्भुत अन् चमत्कार' आहे. अन् खरेच 'ही तो श्रींची इच्छा'च होती म्हणूनच घडले सारे.


बाजारपेठ ओलांडून जात जात भोवतालचे ते सह्याद्रीच्या कड्यांचे अपूर्व दर्शन घेत होतो. महाराजांनी 'रायगड' हा 'राजधानी' म्हणून का निवडला. यातील त्यांची दूरदृष्टी, संरक्षणाचा विचार जाणवत होता. आणि अखेरीस एकदम पाय थबकले ते महाराजांच्या समाधीपाशी. मन भरून आले... इथेच त्या तेजस्वी जीवनाची इतिश्री घडली अन् इथेच महाराज चिरविश्रांती घेत आहेत. "दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती।" नतमस्तक झालो आम्ही.


राजांच्या समाधीजवळच त्यांचा 'इमानदार वाघ्या कुत्राही मृत्यूनंतर स्वामीनिष्ठ राहिला आहे, त्याचे महान प्रतिक पाहावयास मिळेल. असे सर्व पुन्हा पुन्हा डोळ्यात साठवत, आजुबाजुचा परिसर पुन्हा न्याहाळत आम्ही परतीच्या मार्गी लागलो, ते मूक होऊन, भारावून जाऊन... मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 3 

आमची सहल मराठी निबंध | aamchi sahal marathi nibandh

सहल म्हणजे आनंद! हे माझे दहावीचे वर्ष होते. शालेय जीवनातील शेवटची सहल. सर्वानुमते 'महाबळेश्वर' हे ठिकाण निश्चित झाले होते. दुसरे सत्र सुरू झाले आणि सहलीचा दिवस उजाडला. सर्व वर्गमित्र आणि आमचे शिक्षक बरोबर असल्यामुळे सहलीचा आनंद द्विगुणित झाला होता. 


गाणी, गप्पागोष्टी, थोडी दंगामस्ती यांत बसचा प्रवास केव्हा संपला ते कळलेच नाही. भल्या पहाटे आमची बस महाबळेश्वरच्या नागमोडी रस्त्यावर येऊन पोहोचली. हिरवी वनराजी, लाल माती आणि डोंगरातील पांढरे शुभ्र प्रवाह यांनी महाबळेश्वराचे प्रथम दर्शन घडले. 


पक्ष्यांच्या किलबिलाटाने रान हळूहळू जागे होत होते. आमचा मोर्चा वळला तो 'सनराईज पॉइंट'कडे. डोंगराची कड प्रथम रुपेरी झाली आणि मग सूर्यबिंब हळूहळू वर आले. बघता बघता ते लाल बिंब चमकू लागले. तृप्त मनाने आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलो.


महाबळेश्वर हे डोंगरातील थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे तेथे वेगवेगळ्या जागा प्रेक्षणीय स्थळे ठरल्या आहेत. त्यांना पॉइंटस् म्हणतात. या निसर्गरम्य ठिकाणांत 'मंकी पॉइंट' व 'एको पॉइंट'वर खूप मजा आली. मंकी पॉइंटवरील माकडांबरोबर खेळताना, म्हणजे त्यांना चिडवताना वेळ कसा गेला, ते कळलेच नाही. 'एको पॉइंट'वर प्रतिध्वनी ऐकताना गंमत वाटत होती.


संध्याकाळी 'सनसेट पॉइंट'वर गेलो. सूर्यास्ताचा देखावा पाहायला प्रचंड गर्दी होती. भेळ, गंडेऱ्या विकणारे विक्रेते पाहून आपण मुंबईच्या चौपाटीवरच असल्यासारखे वाटले. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील कृष्णा, कोयना, वेण्णा या नदयांच्या उगमस्थानांना भेट दिली. 


कृष्णामाईचे अतिशय रमणीय मंदिर दाट झाडीत आहे. तेथून वेण्णा तलावावर गेल्यावर सहलीचा मनसोक्त आनंद लुटला. वेण्णा तलावात छोट्या बोटीने जलविहार करताना तृप्ती होतच नव्हती. त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही घरी परत निघालो. महाबळेश्वरमधून पाय निघत नव्हता. सहल संपूच नये, असे वाटत होते.


[शब्दार्थ : सर्वानुमते- unanimously. सानुमते.. सर्व सम्मति से। द्विगुणित झाला- increased (Lit-doubled). अमj थj. दोगुना हो गया। नागमोडी- having short, sharp turns. सास२. टेढ़ेमेढ़े, घुमावदार। किलबिलाट- twittering, chirping. sewel2. चहचहानेकी आवाज। मनसोक्त-to one's heart's content. हयपूर्व, मन:पूर्व. मनचाहा।]