पर्यावरण संतुलन निबंध मराठी | environment balance essay marathi

 पर्यावरण संतुलन निबंध मराठी | environment balance essay marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पर्यावरण संतुलन मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता.या अमर्याद विश्वात सजीव सृष्टी असणारा असा पृथ्वी हा एकच ग्रह आहे. हवा, पाणी यांच्या उपलब्धतेमुळे पृथ्वीवर सजीवसृष्टी विकसित होत गेली. 


पृथ्वीच्या निर्मितीपासून आजपर्यंत हवामानाच्या दृष्टिकोनातून अनेक उलथापालथ झाली, स्थित्यंतरे झाली, हिमयुग, आत्यंतिक उष्णता या प्रकारचे बदल पृथ्वीने अनुभवले आहेत. हजारो वर्षे झाली तरी पृथ्वीतलावरील हवामान हे बदलते आहेच.


विशेषतः पृथ्वीवरील तापमान वाढत आहे, यासाठी केवळ नैसर्गिक घटकच कारणीभूत नसून मानव प्राणी ही त्याला . जबाबदार आहे. पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता मिळते. मिळालेल्या उष्णतेपैकी थोडी उष्णता धारण करून बाकीची अवकाशात परावर्तित केली जाते. आज मात्र मानवाच्या हव्यासापोटी, औद्योगिक आर्थिक लालसेपोटी इंधनाच्या बेसुमार वापराने, 


कारखान्यातील घातक वायूमुळे वातावरणातील कार्बनडायऑक्साईड, सल्फरडायऑक्साईड, क्ल्युरोफ्युरो कार्बनमुळे वातावरणात उष्णता जास्त प्रमाणात शोधून घेतली जाते. त्यामुळे तापमान वाढते, त्यालाच 'हरितगृह परिणाम' असेही म्हणतात. ही तापमानाची वाढ दशकात ०.५° एवढ्या वेगाने होत आहे. २० व्या शतकात शेवटच्या तीन-चार दशकात तापमानाच्या वाढीचे प्रमाण वेगात होते, असे स्पष्ट झाले आहे.माणूस हा आपल्या नित्यनैमित्तिक व्यवहारासाठी घरे, शेती, कारखाने आणि प्रत्यक्ष इंधन म्हणून ही जंगलतोड बेसुमार प्रमाणात करीत आहे. त्यामुळे जमिनीची तर धूप वाढतेच. शिवाय हवेतील रखरखीतपणाही मोठ्या प्रमाणात जाणवतो आहे. ३३% ऐवजी २०% जंगले मानवाच्या तावडीतून एवढेच जंगलक्षेत्र आज उपलब्ध आहे. या वृक्षतोडीमुळेही तापमानात वाढ होते.


जगातील सर्वात मोठे जंगल अॅमेझॉन खोऱ्यातील विषुववृत्तीय जंगलालाही धनदांडग्यांचा ठेकेदारांचा विळखा पडला आहे. जंगलतोडीमुळे पृथ्वीची फुप्फुसेच कमजोर केली जात आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे.


तापमान वाढीचे दुष्परिणाम आजच आपल्याला दिसू लागले आहेत. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळत आहेत. हा बर्फाळ प्रदेश अक्रसला जात आहे. त्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. याच वेगाने बर्फाचे वितळणे सुरू राहिले, तर समुद्राकाठची सिंगापूर, हाँगकाँग, मुंबई, कोलकाता, मॉरिशस, लक्षद्वीप, मिनीकॉय ही बेटे, बंदरे, शहरे पाण्याखाली जातील व कोट्यवधी लोकसंख्येस विस्थापित करावे लागेल.


हिमालयासारख्या पर्वताची हिमरेषा वरवर सरकत आहेत. बर्फाच्या टोप्या वितळून गंगा, सिंधू नद्यांना आता पूर येतील. भविष्यात मात्र तेथे बर्फ शिल्लक न राहिल्याने या नद्या उन्हाळ्यात कोरड्या पडतील. कारण वितळणारा बर्फ हाच या हिमालयीन नद्यांना उन्हाळ्यातील प्रमुख जलस्रोत असतो. या नद्यांची पात्रे अरुंद होत आहेत. आजच या खोयात पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या पाण्याच्या वाटपावरून भविष्यात शेजारील राष्ट्रामध्ये संघर्ष उद्भवू शकतो.


पाण्याचा स्रोत बंद झाल्याने कृषी, जलविद्युत कारखानदारीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. योग्य उपाय योजना न केल्यास राजस्थानमध्ये एकेकाळी सरस्वती नदी होती. तिचा उपग्रहामार्फत शोध घेणे चालू आहे. त्याचप्रमाणे गंगा नदीमुळे भारत सुजलाम् सुफलाम् होता. हे इतिहासाच्या पानातील हे एक वाक्य असेल.


आज वाढत्या तापमानामुळे पावसाचे वितरण बदलले आहे. जास्त पावसाच्या प्रदेशात पाऊस कमी पडतो, तर कमी पावसाच्या प्रदेशात पाऊस जास्त पडतो आहे. राजस्थानच्या वाळवंटात जसा या वर्षी पाऊस पडला. तसा पडत राहिला तर वेदकालीन सरस्वतीचे पुनरुज्जीवनही होईल.


वाढत्या तापमानामुळे समशीतोष्ण युरोपात उष्माघात वाढत आहेत. चक्रीवादळे विध्वंस घडवून आणत आहेत. वाढत्या तापमानामुळे व प्रदूषणामुळे ओझोनच्या थराला हानी पोहोचू शकते. त्यानंतर होणारी मनुष्य व निसर्गाची हानी अपरिमित असेल. आज वाढत्या तापमानाचा मानवाच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे.


वाढत्या तापमानामुळे होणारे धोके लक्षात घेता आंतरराष्ट्रीय पातळीवर उपाय होणे गरजेचे आहे. विकसित विकसन सर्वच राष्ट्रांनी औद्योगिक, आर्थिक याबाबतीत कडक कायदे बजावून त्यांची अंमलबजावणी कसोशीने करायला हवी. कारण वातावरण हे वैश्विक आहे व वाढत्या तापमानाचे परिणाम अविकसित तसेच विकसित राष्ट्रांनाही मोजायला लागणार आहेत. 


तापमानात वाढ करणाऱ्या प्रदूषित वायूवर नियंत्रणे लादली पाहिजेत. वृक्षांचे आच्छादन वाढविले पाहिजे. तर पृथ्वीचे वाढणार तापमान नियंत्रणात ठेवून पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे व पर्यावरणाचे रक्षण होईल !मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 2


पर्यावरण संतुलन निबंध मराठी | environment balance essay marathi


वने ही भारताची आर्थिक संपत्ती आहे. पूर्वीच्या काळापासून वनांना मानवाच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे. आपले पूर्वज हे पूर्वीच्या काळी पूर्णपणे वनांवर अवलंबून होते. त्यांची सर्व उपजिविका वनांवर अवलंबून होती त्यानंतर ते शिकार, वनासंबंधी शेती इ. गोष्टींवर अवलंबून असत म्हणजे पूर्वीच्या काळीसुद्धा वनांना फार महत्त्व होते. 

निसर्गाचा समतोल हा पूर्णपणे वनांवर अवलंबून आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी ३३% वने ही आवश्यक आहेत. वनांचे मानव जातीला फार उपयोग आहेत. वनापासून मानवाला फळे, औषधी वनस्पती, लाख इत्यादी उत्पादने मिळतात. 

वनापासून ग्रामीण भागात सरपणासाठी लाकडे मिळविली जातात. लाकडापासून अनेक प्रकारच्या वस्तू उदा. टेबल, खुर्ची, कपाटे इत्यादी वस्तू बनवल्या जातात. तसेच लाकडापासून घरासाठी लाकूड, खेळणी इत्यादी वस्तू बनवल्या जातात. म्हणजे मानवासाठी वनसंपत्तीचा भरपूर उपयोग आहे. 


जंगलातील अनेक वनऔषधी वनस्पती मिळवून औषधे, वनउत्पादने बाहेरच्या देशांना विकून परकीय चलन मिळवले जाते व देशाचा आर्थिक विकास साधण्यास मदत होते. अशाप्रकारे मानवी जीवनांत वनांचा फार उपयोग आहे. पक्षी, प्राणी इत्यादीसुद्धा पूर्णपणे वनांवर अवलंबून असतात. 


निसर्गाची साखळी ही वनांशी संबंधित आहे. अनेक वन्यप्राण्यांचे जीवन हे वनांशी संबंधित आहे. म्हणूनच असे म्हटले आहे की, "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' पर्यावरणाच्या समतोल साधण्यासाठी वनांचा उपयोग होतो. वनांमुळे पाऊस पडण्यास मदत होते. 


वनांच्या मुळ्या खोलवर रुजतात त्यामुळे माती घट्ट चिटकून राहून मातीची धूप थांबण्यास मदत होते. डोंगर उतरावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे जी मातीची झीज होते ती वनांमुळे थांबते. या वातावरणात अनेक प्रकारचे वायू आहेत. उदा. co, इ. वायूंचे प्रमाण कमी करण्यासाठी झाडांचा उपयोग होतो. झाडे स्वत: कार्बनडायऑक्साइड ग्रहण करतात व मानवी जीवनास आवश्यक असणारा 'ऑक्सिजन' प्राणवायू मानवाला पुरवतात.


आज भारतात वनांचे प्रमाण नगण्य म्हणजे २३% च्या आसपास आहे. मानवी जीवनात अनेक प्रकारच्या सुधारणा झाल्यामुळे शहरीकरण, उद्योगीकरण झाले. या शहरीकरणामुळे जंगलांचे प्रमाण खूप कमी झाले व त्या जागी सिमेंटची जंगले अस्तित्वात आली. 


उद्योगीकरणामुळे वनांची मोठ्या प्रमाणात तोड होऊन अनेक प्रकारचे कारखाने, उभा राहिले व अशा करखान्यातून दूषित वायू वातावरणात मिसळून ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले व इतर 'ग्रीन गॅस' वायूंचे प्रमाण वाढले. 


त्यामुळे मानवाला अनेक प्रकारचे आजार उद्भवून वाईट दुष्परिणाम त्यांच्या जीवनावर झाला आहे. वनांची तोडणी केल्यामुळे अनेक पक्षांची, प्राण्यांची आश्रयस्थाने, त्यांची घरटी नष्ट झाली. त्यामुळे दुर्मिळ प्राण्यांच्या जाती नष्ट झाल्या अनेक प्राणी, पक्षी यांनी स्थलांतर केले. यामुळे सध्या दुर्मिळ पशुपक्षांच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.


वने कमी झाल्यामुळे मानवी जीवनास आवश्यक असणाऱ्या ओझोन वायूचे प्रमाण कमी झाले त्यामुळे सूर्याची अतिनील किरणे पृथ्वीवर सरळ पडून मानवाला कॅन्सरसारखे रोग उद्भवले. वनांचे उच्चाटन कमी झाल्यामुळे जमिनीची धूप पुरामुळे जमिनीच्या वरचा मातीचा थर वाहून गेला यामुळे शेती या व्यवसायावर परिणाम झाला.


नियमित पाऊस पडाय बंद झाल्यामुळे शेती उद्योग धंद्यावर परिणाम झाला. तापमान वाढू लागले. अशाप्रकारे सर्वच गोष्टीवर परिणाम जाणवू लागला. हे सर्व टाळण्यासाठी मानवाने अनेक प्रकारच्या उपाययोजना अमलात आणल्या पाहिजेत. सरकारने अनेक गोष्टींकडे लक्ष देऊन याच्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत. 


यासाठी शासनाच्या पडीक जमिनीवर वनांची लागवड केली पाहिजे. 'झाडे लावा, झाडे जगवा', 'पाणी अडवा पाणी जिरवा' अशाप्रकारचे कार्यक्रम राबवून लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे. वनांना पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन दिले पाहिजे. 


प्रत्येक खेड्यात, गावात, शहरात अनेक कार्यक्रम आयोजित करून वनांचे महत्त्व लोकांना पटवून दिले पाहिजे. प्राथमिक-माध्यमिक शाळेमध्ये वनदिंडी, वृक्षदिंडी यासारखे कार्यक्रम राबवून प्रत्येक विद्यार्थ्यांने एक एक झाड लावून ते झाड त्यांनी जगविले पाहिजे. 


रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली पाहिजेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी खड्डे खणून प्रत्येकाने एकतरी झाड लावून वृक्ष संवर्धन करण्याचा संकल्प केला पाहिजे. प्रत्येक खेड्यात वनाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील लोकांना वनांचे महत्त्व पटवून देण्यासाठी व्याख्याने, विविध कार्यक्रम सरपंचामार्फत राबवले पाहिजेत. 


पक्षी, प्राणी यांच्या विविध जाती नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना आखून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. सरकारने विविध कायदे करून वृक्ष तोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे, जास्तीत जास्त वनक्षेत्र लागवड करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. 


त्यासर्व सरकारी योजनांसाठी लोकाकडून, समाजाकडून पूर्ण पाठिंबा मिळाला पाहिजे. असे केले तरच पर्यावरणाचा समतोल सुयोग्य राखला जाईल. अशाप्रकारे वृक्ष हे मानवी व्हास टाळणारे आहेत. सर्व पृथ्वी ही निसर्गसंपन्नतेने दिसण्यासाठी तिचे वैभव तिला प्राप्त करून देण्यासाठी प्रत्येकाने झटले पाहिजे. प्रयत्न केले पाहिजेत.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद