मी संपादक झालो तर निबंध मराठी | If I become a editor essay in marathi

मी संपादक झालो तर निबंध मराठी | If I become a editor essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज मी संपादक झालो तर मराठी निबंध बघणार आहोत. विद्यालयात प्रवेश घेतल्यापासून या ना त्या स्वरूपात अवतीभवतीचे लोक एक खास प्रश्न विचारतात. 'ह, मग तू काय बाबांसारखा डॉक्टर होणार की, आजोबांसारखा मोठा शिक्षक ?' अर्थात त्या काळात काही समजायचे नाही. डोळे विस्फारत, 'अंऽऽ मी इंजिनिअर होणार.' असे काही तरी उत्तर देऊन पळून जाणार. परंतु शालान्त परीक्षा झाली, बारावीची परीक्षा झाली अन् डोक्यात विचार सारखे येऊ लागले. आपण माधव गडकरीसारखे वृत्तपत्रकार व्हायचे. 'सकाळ'च्या माननीय परूळेकरांसारखे मोठे संपादक व्हायचे.


रोजच्या रोज वर्तमानपत्रातील त्या दर्जेदार महत्त्वाच्या बातम्या वाचून आणि त्याचा होणारा जनमानसावर परिणाम पाहून का कोण जाणे, पण वर्तमानपत्राचा संपादक होण्याचा विचार मात्र रुजू लागला. अर्थातच त्या संदर्भात माझ्या एका मित्राची चांगलीच मदत झाली. त्याने आपल्या प्रेसमध्ये मला एकदा नेले आणि तिथे असलेली ती मोठमोठी मशीन्स ते राबत असलेले, रात्रंदिवस मेहनत घेणारे कामगार आणि मग त्यांचे पाहिले ते भव्य-दिव्य असे प्रमुख कार्यालय कार्यालयाच्या उंच भिंतीवर आगरकर, लोकमान्य टिळक, शिवरामपंत परांजपे, न. चिं. केळकर, सध्याचे थोर संपादक पाहून प्रथम त्यांचाच अभ्यास करण्याचा निश्चय केला. त्यांची चरित्रे वाचली. काळानुसार त्यांची अग्निदिव्यातून जाणारी कार्यपद्धती, संपूर्ण जीवन झोकून देण्याची ती वृत्ती, पारतंत्र्यातील स्वदेशासाठी केलेले ते निर्भीडपणे बलिदान. आणि मग त्यातील गांभीर्य कळू लागले. कसे खडतर जगावे लागणार याची कल्पनाच करीत राहिलो. अन् वाटू लागले हे काही 'येय गबाळ्याचे काम नाही.'पण तरीही त्या थोर संपादकांच्या कार्याला अभिवादन करून हे शिवधनुष्य उचलण्याचे ठरविले... पक्के केले. बदलत्या काळानुसार जरी कामाचे स्वरूप बदलले तरी त्या महान संपादकांचे हेतू. सत्याला सामोरे जाण्याची धडपड आणि बौद्धिक स्तर, दर्जा कोठेही घसरू द्यायचे नाही, हाच उद्देश पक्का केला. त्यासाठी अटोकाट प्रयत्न करण्याचे ठरविले.


"संपादक', वर्तमानपत्राचे संपादन करणारा, 'वर्तमानपत्र' हा तर लोकशाहीतील अतिशय महत्त्वाचा स्तंभ. जनसामान्यांपर्यंत पोहोचणारे एक अतिशय प्रभावी प्रसारमाध्यम, तेव्हा जनतेची मागणी, जनतेचे कल्याण लक्षात घेऊनच प्रत्येक क्षणी, प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य, प्रत्येक संदेश पोहोचण्याची जबाबदारी मी स्वीकारणार होतो. त्यासाठी हवा अभ्यास, वाचन पाहणी, निरीक्षण करून जनसामान्यांपर्यंत पोहोचणे, त्यांची सुख-दुःखे जाणून घेण्यासाठी मी दैनंदिन कार्यक्रमात पहिले स्थान त्यासाठी देईन. 


रोज त्यांच्या भेटी-गाठी घेणे, नोंदी ठेवणे... त्यावर विचार करणे, महत्त्वाच्या पुस्तकांचे वाचन करणे. यासाठी वेळ देऊन माझे ज्ञान अद्ययावत करण्याचा प्रयत्न करीन. संपादक म्हणून माझ्या स्वतंत्र खोलीत आपल्या देशातील या क्षेत्रात असणारी पुस्तके, ग्रंथ, उत्तम उत्तम गाजलेले लेख, फोटो यांचा उत्तम संग्रह ठेवीन. नवीन नवीन पुस्तके-लेख यांचाही संच ठेवीन.वृत्तपत्र म्हटले की अग्रलेख आलाच तो तर 'आत्मा' असतो, त्या दिवशीच्या सर्वांत मोठ्या घटनेचा-बदलाचा. सांगोपांग आढावा घेऊन सकारात्मक दृष्टिकोन ठेवून. तो मौलिक विचार सर्वांना कसा देईल, याचा मी विचार करीन. अग्रलेखाची भाषा अत्यंत संयमित असावी लागते. तशी प्रसंगी जनकल्याणाचा हेतू लक्षात घेऊन कडक भाषाही वापरली जाणे, आवश्यक ठरते. प्रतिभाशाली, हुशार, उत्साही तरुण-तरुणी, लेखक-कवी यांच्या सहवासात राहून उत्तम साहित्य मिळविण्याचा प्रयत्न करीन. आपल्या वर्तमानपत्रातील सर्व सदरे अगदी राजकारणापासून ते छोट्या मोठ्या जाहिराती किंवा निवेदनापर्यंत सर्वाना योग्य तो न्याय माझ्या पत्रात दिला जाईल. वैचारिक सदरांसोबत मनोरंजनालाही समर्पक असा वाव राहील. खास स्त्रिया, लहान मुले, शेतकरी वर्ग, कामकरी, नवशिके, व्यक्तिमत्त्व विकास अशा विषयांवर तज्ज्ञमंडळी सदैव काम करीत राहतील. सप्ताहातील एक दिवस लोकांची आवडती सदरे, भविष्य-शब्दरंजन, काव्यपूर्ती, स्पर्धा, नवीनतम घडामोडींसाठी सदैव वृत्तपत्राचे रकाने तयार राहतील. मुख्य म्हणजे माझ्या वृत्तपत्रात छापले जाणारे प्रत्येक अक्षर नि अक्षर हे मी स्वतः आणि माझे गुरुजन यांच्या अनुमतीशिवाय छापले जाणार नाही, याची काळजी घेईन.वर्तमानपत्र म्हटले की ते काळाच्या ओघाबरोबर नवीन नवीन तंत्रे - नवीन प्रकार पद्धतीनुसार बदलत राहणारच. वर्तमानपत्राचा कागद, त्यावरील मुद्रण, चित्रण, छपाई रंगीत भाग याकडे लक्ष ठेवण्यासाठी एका लायक माणसाची खास नियुक्ती राहील. पत्रकार, बातमीदार, फोटोग्राफर या सर्वांचे प्रशिक्षण सतत होत राहील अशाप्रकारे सर्वांगसुंदर आणि उत्कृष्ट दर्जा प्राप्त झाला आहे, अशा वर्तमानपत्राच्या संपादक झाल्यावर मलाही मोठमोठ्या संस्थांकडून थोर व्यक्तींकड़न भेटीसाठी बोलावले जाईल. 


थोर व्यक्तींच्या सहवासात राहण्याची मला संधी मिळाली आणि पुन्हा मला माझे काम अधिक चांगले कसे करावे याची प्रेरणा मिळेल. त्यातच त्या कामातच माझा ईश्वर मला भेटेल. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद