प्रसार माध्यमाचे महत्व मराठी निबंध | importance of media essay marathi

प्रसार माध्यमाचे महत्व मराठी निबंध  | importance of media essay marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  प्रसार माध्यमाचे महत्व मराठी निबंध  बघणार आहोत. "सरकारचं डोक ठिकाणावर आहे का ?' अशा अग्रलेखांनी लोकमत फिरविणारे लोकमान्य ! 'वंदे मातरम्' या वृत्तपत्रातून तरुणांची मने क्रांतीकडे वळविणारे अरविंद घोष किंवा मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर या महान नेत्यांनी प्रसारमाध्यमाची ताकद ओळखली होती. हे प्रसारमाध्यम म्हणजे तरी काय ? 


प्रसारमाध्यम Media जनमत बनविण्याचे-बिघडविण्याचे एक प्रभावी माध्यम. लोकशाहीचा आधारस्तंभ सामान्य जनतेला आपली मते मांडण्यासाठीचे व्यासपीठ, राष्ट्रवाद जोपासणारे एक साधन, जगातील माहिती आपल्या घरापर्यंत आणणारा माहितीचा प्रचंड जनशक्ती असलेल्या या प्रसारमाध्यमांची खरी शक्ती आहे ती कमीत-कमी वेळात जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे अफाट सामर्थ्य या प्रसार माध्यमांकडे आहे. पण वेगळे सामर्थ्य अधिक तेवढी जबाबदारी अधिक वाढते. 


त्या सामर्थ्याचा काळजीपूर्वक, प्रगल्भतेने लोककल्याणासाठी वापर करण्याची सुज्ञता असावी लागते. सुदैवाने भारतातही या प्रसारमाध्यमांचा वापर याच सूज्ञतेने झाला. १९६२-१९६५ च्या युद्धासाठी केलेले आवाहन किंवा पूर्वेकडील राज्यांच्या पुराची स्थिती अशा सर्वच क्षेत्रातल्या बातम्या ही प्रसार माध्यमे आपल्यापर्यंत पोहोचावीत असतात. लोकमताला आकार देण्याची कुवत ओळखून जगातील हुकूमशहांनी या माध्यमावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला पण त्यांना जनक्षोभाला सामोरे जावे लागल्याचे इतिहास सांगतो. भारतातही हा प्रयोग करून पाहिला गेला आणि परिणाम व्हायचा तोच झाला ! त्यानंतर मात्र या लोकशाहीच्या प्रमुख आधारस्तंभाला हात लावण्याचे धाडस कोणी केले नाही.


'कालाय तस्मै नमः' म्हणतात त्याप्रमाणे प्रसारमाध्यमांतही बदल झाले. त्यांच्या स्वरूपात आणि गुणवत्तेतही! सुरुवातीला वर्तमानपत्र, रेडिओनंतर, दूरचित्रवाणी अशी रूप धारण केली गेली आणि गुणवत्ता ! प्रथम वैचारिक पातळीवर विहार करणारी ही माध्यमे मनोरंजनाचे साधन होऊ पाहत आहेत. परिणाम मसालेदार चटपटीत बातम्या देण्यासाठीची स्पर्धा! याही बातम्या 'सबसे तेज' देण्यासाठी स्पर्धा ! मग कुणा प्रसिद्ध व्यक्तीच्या आजारपणाला इतके महत्त्व की देशाच्या इतर समस्या त्यापुढे फिक्या वाटाव्यात.


अबू सालेमसारख्या गुंडाचे दर्शन इतके वारंवार की तो नेता वाटावा. एखाद्या खेळाडूच्या भारतीय संघात समावेशाबद्दलच्या बातम्या इतक्या की, तो प्रश्न संसदेत चर्चेला जावा ? यावर कळस म्हणजे प्रसार माध्यमांनीच प्रसिद्ध केलेली, 'रात्री उगवणारी' 'PAGE - 3' संस्कृती ! तरुणांना आपले आदर्श बदलावयास लावणारी ही प्रसारमाध्यमे खरेच लोकशाहीचा आधार स्तंभ आहेत का? पण शंभर कौरवांच्या गर्दीत पाच पांडव असतातच ! त्या प्रमाणे या प्रसारमाध्यमांची काही चांगली कामेही आहेत. 


शेतकऱ्यांच्या आत्महत्येला वाचा फोडण्यासाठी यांचे प्रयत्न ! हतबल होऊन गाव विकायला काढलेल्या गावकाऱ्यांची अगतिकता ! पूर्वेकडील भागातील नक्षलवाद्यांचा गोंधळाला प्रसिद्धी मिग वैमानिक गाडगीळच्या आईच्या एकहाती लढ्याला दिलेला पाठिंबा ! अशा अनेक चांगल्या कार्यातून ही माध्यमे आपली सामाजिक बांधीलकी दाखवीत असतात. प्रसार माध्यमांचा धसका घ्यावा असे वाटणारे 'स्टिंग ऑपरेशन !' खायचे आणि दाखवायचे वेगळे असणाऱ्याचे खायचे (खरे) दात दाखविणारे ऑपरेशन ! 


या ऑपरेशननेच संसदेतील 'दुर्योधन' जनतेसमोर आणले. सैनिकांच्या शवपेट्यांतही काही सापडते का ? ते पाहणाऱ्या जनतेचे सेवकांची सेवा यांनीच जनतेपुढे आणली यात आर. आर. पाटलांसारख्या काही माणसांच्या प्रतिमाही उंचावल्या गेल्या पण ते त्यांच्या नैतिकतेमुळे! अशा या स्टिंग ऑपरेशनचा उपयोग शासन गर्भजल परीक्षा करणाऱ्या डॉक्टरांविरुद्धही करणार आहे. या विरुद्धही ओरड होत आहे पण लोकशाही बळकट असल्याचे हे द्योतक होय.


 स्टिंग ऑपरेशन मध्ये ज्याला 'कर नाही त्याला डर' असण्याचे काहीच कारण नाही. भ्रष्टाचारी नेत्यांचे धाबे दणावणारी ही स्टिंग ऑपरेशन खरेच कौतुकास्पद आहेत. संयमाने वापरले तर योग्य हत्यार ठरण्याची क्षमता यामध्ये आहे.


फुटकळ प्रसिद्धीच्या मागे न लागता. जर आपल्यावरील सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून, प्रसारमाध्यमांनी आपली तव शक्ती देशकार्यास लावली तर भारत आर्थिक महासत्ता होणार हे भविष्य न राहता वर्तमान होईल. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद