प्लास्टिक बंदी मराठी निबंध | plastic bandi in marathi essay

 प्लास्टिक बंदी मराठी निबंध  | plastic bandi in marathi essay


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  प्लास्टिक बंदी मराठी निबंध बघणार आहोत.   दि. २६ जुलै २००५ ला सर्व दैनंदिन व्यवहार नित्याप्रमाणेच सुरू होते, उद्योगी मुंबई आणि मुंबईकरांची आपला वेळापत्रक सांभाळण्यासाठी धडपड सुरू होती पावसाळ्याची रिपरिप सुरू होती. परंतु पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे तो नित्याचाच होता, परंतु दुपारपर्यंत पावसाने रौद्र रूप धारण केले. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना हा दिवस आपली छाप सोडून जाईल, याचा पुसटसा विचारही कोणी केला नसेल. पाहता पाहता संध्याकाळपर्यंत पावसाचा वेग वाढत गेला नि अवधी मुंबई जलमय झाली. 


लोक बेघर झाले. संसार उघड्यावर पडले. शाळा-कॉलेजमधून बछडी, तरुण मुले लोकल-ट्रेन ऑफिसेसमधून महिला, पुरुष अक्षरशः १८ ते ३६ तासांपर्यंत अडकून पडले, कधीही थांबणे माहीत नसणारा मुंबईकर स्तब्ध बसण्याशिवाय काहीच करू शकत नव्हता. २४ तास पाऊस कोसळत होता, मागील १२० वर्षातील उच्चांक ९०० मि. मि. प्रस्थापित झाला. कारणमीमांसा, संशोधन सुरू झाले. निष्कर्ष निघाला. प्लॅस्टिकचा भस्मासुर भेडसावू लागला. वाढत्या प्लॅस्टिक वापरामुळे गटारे, नाले तुंबले जाऊन पाणी बाहेर पडण्यास मार्ग न भेटणे. सरकारी चक्रे वेगाने फिरली. अंतत:जाहीर झाली 'प्लॅस्टिक बंदी'...तसे पाहता २० मायक्रॉनपेक्षा पातळ प्लॅस्टिक पिशव्या म्हणजेच कॅरिबॅगवर बंदी लादण्यात आली, परंतु नियम किंवा कायदे पाळण्यासाठी नसतात ही मानसिकता आजच्या -हासाला कारणीभूत ठरली ती किती अंगवळणी पडली हे स्पष्ट झाले. प्लॅस्टिकचा वापर - सकाळी दूध पिशवी प्लॅस्टिकची, तेल-तूप प्लॅस्टिक पिशवीतून, भाजी प्लॅस्टिकमधून एवढेच काय हॉस्पिटलमधून रक्त, सलाईन देण्यासाठीही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होतो. अगदी इंजेक्शनची सिरीज सुयाही त्यात ठेवतो. प्लॅस्टिकवर मग बंदी लादणे योग्य आहे का ? कारण कित्येक लोकांचा रोजगार त्यावर अवलंबून आहे, यावर उत्पादन खर्च कमी करण्यासाठी राजमार्ग उपलब्ध आहे. हा तर खर्चीक पर्यायाचा वापर कुठवर मानवेल त्याने उत्पादकांना नाना प्रश्न निर्माण होऊ शकतात. जर सकारात्मक बाजूने विचार केल्यास प्रत्येक समस्येची उकल होऊ शकेल.सारासार विचार करावा की प्लॅस्टिक पिशवी वापरण्यापूर्वी कापडी पिशवीचाच वापर होत असे, दुकानदार माल कागदातच बांधून देत असे. म्हणजे हा चांगला पर्याय होऊ शकतो, पर्यावरणवादी हा प्रश्न निर्माण करतील. कागदाचा वापर वाढल्याने वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होईल तर चिंतेचे कारण नाही, कारण जो कागद वापरला जाईल तोच मुळात टाकाऊ कागदापासून. म्हणजेच कागदाचा पुनर्वापर होईल तर प्लॅस्टिकचाही असा पुनर्वापर केला जाऊ शकतो. परंतु जमा करणे, स्वच्छ करणे, प्रक्रिया करणे यावर जो खर्च येईल तो कागदाच्या तुलनेत जास्त असेल.
कायमची बंदी योग्य आहे का ? आणि यशस्वी होईल का ? छुप्या मार्गाने सर्रास वापर सुरूच राहील. यावर उपाय म्हणजे एकतर ज्या ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर हा अपरिहार्य आहे, तेथे शक्यतो जाड प्लॅस्टिक वापरावे, जसे जाड प्लॅस्टिक पिशवी वापरली तर ती अनेकवेळा वापरली जाईल. अप्रत्यक्षरीत्या किंमतही वसूल होईल. तरीही नष्ट करण्याचा पर्याय काय ? या पिशव्या जाळता येऊ शकतात परंतु त्यामुळे प्रदूषणात भरच पडेल. याबाबतीत अलीकडील एक उदाहरण उद्बोधक ठरावे - नागपूरच्या अलका आणि उमेश झाडगावकर या दांपत्याने प्लॅस्टिक कचऱ्यापासून औद्योगिक इंधन बनविण्याचे तंत्र विकसित केले. कॅरी बॅग पासून मुक्ती मिळवण्याचा मार्गच त्यांनी शोधला असे म्हणता येईल. राज्य सरकारनेही त्यांच्या 'युनिक वेस्ट प्लॅस्टिक मॅनेजमेंट अॅन्ड रिसर्च कंपनी'बरोबर दोन संयुक्त करार केले आणि एक प्रकारे त्यांना प्रोत्साहनच दिले आहे.यांपैकी एक प्रकल्प मुंबईत ५००० मेट्रिक टनांचा तर इतर गुजरात, राजस्थान, आदी राज्यात असतील.
अशा प्रकल्पांकडे नीट लक्ष पुरविल्यास आपोआप प्लॅस्टिक पर्यायाला भाव येईल, कारण अशा उद्योगांसाठी तो कच्चा मालच ठरू शकेल हे आणि इतर असे अनेक प्रकल्प राबवून आपण प्लॅस्टिकपासून मुक्तीच साधू, त्यापासून होणाऱ्या हानीपासून बचावण्याचा मार्ग शोधू शकतो. त्यादृष्टीने समाज जागृत तर झालाच पाहिजे, परंतु शासकीय पातळीवर ही विविध उपक्रम राबविण्याचे प्रयत्न झाले पाहिजे. तरच भविष्यात आज जी मिठी नदीची परिणामी मुंबईची अवस्था झाली ती अवस्था किंवा तसा प्रसंग ओढवणार नाही. जबाबदारीचे भान ठेवून राष्ट्रहित ओळखून वर्तन केल्यास प्लॅस्टिकचा वापर योग्य प्रकारे केल्यास दुष्परिणाम टाळता येतील. बेजबाबदारपणा हाही एक रोगच समाजाला लागलेला आहे, प्रत्येक गोष्टीसाठी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणे, त्या कुठेही फेकणे याचा नकळत परिणाम अशा घटनांद्वारे दृष्टीस पडतो. त्यासाठी पर्यायी साधनांचा जास्तीत जास्त वापर आणि प्लॅस्टिकचा योग्य वापर यांची सांगड घालून आपण राष्ट्रहित व जीवितवित्त यांचे रक्षण केले तर एक जबाबदार नागरिक म्हणून आजच विचार करण्यास काय हरकत आहे, एका नव्या अध्यायाला सुरुवात करण्याविषयी प्लॅस्टिकचा कमीत कमी योग्य वापर दैनंदिन जीवनात करणे हा चांगला विचार आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद