दहशतवाद एक भीषण समस्या मराठी निबंध | dahashatwad ek samasya marathi nibandh

 दहशतवाद एक भीषण समस्या मराठी निबंध | dahashatwad ek samasya marathi nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण दहशतवाद एक भीषण समस्या मराठी निबंध बघणार आहोत.११ सप्टेंबर हल्ल्याची जखम अजून भरलेली नाही. त्या हजारो निरपराधाच्या रक्ताचे डाग पुसणे सर्वथा अशक्य आहे. जम्मू काश्मीरमधील विधानसभेवरील भारताच्या लोकशाहीवरील हल्ला, अक्षरधाम मंदिरातील निघृण कत्तली दहशतवादाचे भयानक स्वरूप दर्शवितात. 


हे हल्ले म्हणजे तिसऱ्या महायुद्धाची भयसूचक घटना तर नव्हे ना ? ज्याप्रमाणे बर्म्युडा ट्रॅगलमध्ये ओढली गेलेली कोणतीही वस्तू परतूच शकत नाही, त्याचप्रमाणे या सर्व घटनांनी सारी मानवताच असुरक्षिततेच्या ट्रॅगलकडे ओढली जाणार नाही ना ? असे विचार मनात आल्याशिवाय राहत नाहीत.


राज्ययंत्रणेच्या कक्षात राहून लोकशाही मार्गाने जे साध्य करता येत नाही ते अवैध मार्गाने साध्य करण्याचा व्यक्ती व संघटना प्रयत्न करतात. त्यासाठी शस्त्रास्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. याची सुरुवात १९८० नंतर इराणमध्ये मूलतत्त्ववाद्यांच्या चळवळीत झाली.


इराणच्या भ्रष्ट राजवटीविरुद्ध खोमेनी यांनी क्रांती करून सत्ता मिळविली. या इस्लामी मूलत्त्वाद्यांना स्वत:चा आदर्श समाज निर्माण करायचा आहे. नंतर इजिप्त, तुर्कस्तान अल्जेरिया, तालिबान येथे मूलतत्त्ववादी राजवटी आल्यापासून आजच्या ओसामापर्यंत ही चळवळ फोफावत आहे.


संपूर्ण जग दहशतवादाच्या छायेत वावरत आहे. श्रीलंकेत LTTE या दहशतवाद्यांनी तेथील सैन्याशी खुले युद्धच आरंभले आहे. वेलॅस्टाईन प्रश्न, आयर्लंड प्रश्न, रशियातील चेचन्या, चीनमधील झिन झियांग प्रांतातील दहशतवादाने जग होरपळत आहे.


दहशतवादाची सर्वाधिक किंमत बहुधार्मिक असलेल्या भारताला मोजावी लागली आहे. गेल्या पंचवीस वर्षात भारताला दहशतवादामुळेच आपले दोन पंतप्रधान अन् हजारो निरपराध नागरिक, भारताची दिवसरात्र सेवा करणाऱ्या सीमेवरील जवानाच्या प्राणाला आपल्याला मुकावे लागले आहे.


पाकिस्तान समर्थक दहशतवादी भारताच्या नंदनवनाची राखरांगोळी करत आहेत. उत्तरेत काश्मीर, उत्तर पूर्वेला अरुणाचल, आसाम, मणिपूर, मेघालय, तामिळनाडू ही राज्ये दहशतवादाच्या छायेत आहेत. महाराष्ट्रासारख्या शांत असणाऱ्या राज्यातही आज दहशतवाद गंभीर बनू पाहत आहे.


"दहशतवादामुळे धगधगतंय ईशान्य धुमसतंय काश्मीर आणि पेटलंय गुजरात यात दिसत आहे तो फक्त मानवतेचा विनाश" गेल्या दशकभरात दहशतवादाच्या स्वरूपात बदल घडून आला आहे आज मूलतत्त्ववाद्यांनी दहशतवादाला धार्मिक रग दिला आहे. लादेनसारख्या इस्लामी मूलतत्त्ववाद्यांनी धर्माच्या नावावर जिहाद पुकारण्याची प्रथा पाडली आहे. काश्मीरमधील दहशतवादाला स्वातंत्र्ययुद्ध म्हटले जात आहे.


या दहशतवादाला निपटून काढण्यासाठी सर्व जगाने एकत्र येणे गरजेचे आहे. (एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ) तालिबान राजवटीचा पाडावा ही एक दहशतवादाला बसलेली चपराकच आहे. जगातील विवादास्पद प्रश्न सामंजस्याने सोडविणे गरजेचे आहे.


दहशतवादाचा प्रश्न आपल्याला दोन आघाड्यांवर सोडवावा लागणार आहे. दहशतवादी संघटना जरी मुस्लीम असल्या तरी सर्वच मुसलमान आतंकवादी नाहीत. हा फरक समजून आपली वृत्ती बदलावी लागेल. दहशतवादाचे मूळ सामाजिक असंतोषात असते. 


प्रत्येक राष्ट्रातील शासनाने पुढाकार घेऊन हा प्रश्न विकास, वाटाघाटी, रोजगार, रोटी या मार्गाने तर कोणत्याही धार्मिक मूलतत्त्ववादाविरुद्ध कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. आज दहशतवादाच्या मुद्यावर एकी व सामंजस्य निर्माण करणे महत्त्वाचे आहे. गरज आहे या प्रश्नांवर एकी निर्माण करण्याची सर्वांना सामाजिक, आर्थिक राजकीय, शैक्षणिक सुरक्षितता निर्माण करण्याची राष्ट्रीय एकात्मतेचे शिक्षण देण्याची आणि विश्वकुटुंबकम् भावनेची.


"हो, हो, मन में है विश्वास, 

पूरा है विश्वास हम होंगे 

कामयाब एक दिन, 

होगी शांती चारो और एक दिन"

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद