जेव्हा अग्निदेव कोपतो मराठी निबंध jevha agnidev kpoptown essay marathi

 
जेव्हा अग्निदेव कोपतो मराठी निबंध  jevha agnidev kpoptown essay marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जेव्हा अग्निदेव कोपतो मराठी निबंध बघणार आहोत.मी पाहिलेली प्रचंड आग दुपारची वेळ म्हणजे बाजारपेठेतील घाईगर्दीची वेळ, आणि त्यातल्या त्यात ही तर घाऊक खरेदी करणाऱ्यांची बाजारपेठ. 


शहरातील मोठमोठे व्यापारी येथे येणार. लाखो रुपयांची देवघेव रोज होणार, क्षणाक्षणाला येथील चित्रे बदलत असणार. ती पहा अलिशान दुकाने, दर्शनी भागात ठेवलेले ते लाकडी सामानाचे नमुने मानवी कर्तृत्वाची जणू ग्वाहीच देत आहेत. 


लाकडी सामान आणि इमारती लाकूड मिळण्याचे शहरातील हे एकमेव ठिकाण. या दर्शनी भव्य दुकानांच्या मागे त्यांच्या माठमाव्या वखारी पसरलेल्या आहेत, परंतु या भव्य, श्रीमंत जगाला दृष्ट लागू नये म्हणून की काय आजूबाजूच्या या मोडकळलल्या इमारतातून गोरगरिबांची कुटुंबे आपला संसार सजवीत आहेत. 


श्रीमंती आणि दारिद्र्य यांचे हे हस्तांदोलन जणू काय साम्यवादाचाच घोषणा करीत आहे.अरे पण हा कोलाहल कसला ! ते पहा. त्या सात मजली इमारतीतूनच त्या किंकाळ्या येत आहेत. अरे तो पहा, त्या बद खिडकीतून बाहेर येण्याचा प्रयत्न घुसमटलेला धूर करीत आहे. 


आज कित्येक दिवस त्या मजल्यावरील साऱ्या खिडक्या बंद होत्या. जागेची इतकी टंचाई असताना त्या खोल्या रिकाम्या कशा ? छे ! त्या रिकाम्या नव्हत्याच. तेथे एक कारखाना चालू होता. बेकायदेशीर काम म्हणून सदा खिडक्या बंद. 


प्लॅस्टिकच्या वस्तू तेथे बनविल्या जात, मनुष्याच्या जीवनाला विघातक अशी अनेक रसायने तेथे उकळविली जात. मूठभरांच्या फायद्याकरिता लाखो जीव तेथे धोक्यात होते. पण याची जाणीव त्या समाजकंटकांना नव्हती.


आज कारखाना बंद होता, पण तेथील एका पहारेकऱ्याने अर्धवट विझविलेली विडी तेथेच टाकली आणि कुलूप घालून तो निघून गेला. विडीने आपले काम बजावले. खोलीतील प्लॅस्टिक आणि रसायन पेंटावयास कितीसा वेळ लागणार आजूबाजूच्या खोल्यांतून आग पसरली. त्या लाकडी इमारतीचा जिना पेटला. 


वरच्या मजल्यावरील बायका-मुले हतबल होऊन ओरडू लागली होती. अग्निदेव आता आपली आहुती घेणार याची त्यांना खात्री पटली होती.भर दुपारची वेळ, सूर्यनारायण संतप्त होऊन जणू अग्निदेवाला अधिक उत्तेजन देत होते. पवन प्रक्षुब्ध होऊन संतप्त अग्निदेवाच्या मदतीला आला आणि पाहता पाहता आग पसरू लागली. 


भुकेलेल्या त्या ज्वाला म्हणजे अनलाच्या लाल जिभा भासत होत्या. लाकडांच्या वखारी हे त्यांचे आवडते खाद्य. ज्वाला पसरू लागल्या, आग साऱ्या बाजारपेठेत पसरली. 'आग, आग' सगळीकडे हाहाकार माजला. जो तो आपली मालमत्ता वाचविण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु संतप्त अग्निदेवापुढे मानवी प्रयत्न अपुरे ठरले होते. हजारो लोक तेथे जमा झाले होते पण...


'घण घण' घंटा वाजली, अग्निशामक दलाच्या गाड्या आल्या. एक, दोन, तीन... एका पाठोपाठ नऊ गाड्या आल्या. काळ्या पोशाखातील उंच टोप्या घातलेले ते सेवक जणू काळपुरुष भासत होते, पण त्यांचे कार्य किती महान, विजेची चपलता त्यांच्या कार्यात होती. प्राणांची बाजी लावून त्यांनी कामाला सुरुवात केली. 


उंच उंच शिड्या उभारल्या गेल्या. आणि अडकलेली माणसे खाली घेतली. बेशुद्ध माणसांना खांद्यावर घेऊन उतरणारे ते वीर पाहिले की वाटते हेच खरे 'समाजसेवक'. पाण्याचे फवारे आसमंतात मारले जात होते. तरी कोपलेल्या अग्निदेवाला शांत करण्यात तब्बल तीन तास गेले.


२०/ २५ माणसे आणि लाखो रुपयांची मालमत्ता त्याच्या भक्ष्यस्थानी पडली असावी. हजारो कुटुंबे निराधार झाली. आणि याला कारण असणारा तो समाजकंटक कारखानदार मात्र बेपत्ता झाला होता.आपले काम संपवून अग्निशामक दलाच्या गाड्या परत गेल्या. 


परंतु पोलीस मात्र संरक्षणासाठी थांबले होते. जळलेल्या वस्तूंचा एक उग्र दर्प पसरला होता. गजबजलेली ती बाजारपेठ आता उदास दिसत होती. जळून गेलेल्या इमारतीचा सांगाडा भीषण स्वरूपासारखा भासत होता. ज्या व्यापाऱ्यांच्या वखारी जळल्या होत्या ते आपल्या नुकसानीचा अंदाज घेत होते,


तर ज्यांच्या सर्वस्वाची राखरांगोळी झाली आहे, अशी ती गरीब कुटुंबे हिरमुसली होऊन बसली होती. 'पुढे काय' हा प्रश्न त्यांना भेडसावीत होता. अग्निदेवाच्या या प्रकोपात ज्यांची माणसे बळी पडली होती ते वेडे होऊन राखेच्या ढिगाऱ्याकडे नजर लावून बसले होते, आणि ते 'समाजसेवक' मात्र अद्यापि तो ढीग उपसत होते. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद