महापुराच्या विळख्यात महाराष्ट्र मराठी निबंध | MAHAPURACHA VIKHYAT MAHARASHTRA ESSAY IN MARATHI

 महापुराच्या विळख्यात महाराष्ट्र मराठी निबंध | MAHAPURACHA VIKHYAT MAHARASHTRA ESSAY IN MARATHI 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण महापुराच्या विळख्यात महाराष्ट्र मराठी निबंध बघणार आहोत. 


"येरे येरे पावसा तुला देतो पैसा 

पैसा झाला खोटा पाऊस आला"

 असे म्हणून आपण वरुणराजाची आतुरतेने एखाद्या चातकाप्रमाणे वाट पाहत असतो. कारण आपला देश 'भारत' हा कृषिप्रधान आहे आणि त्यामुळेच या 'पावसाला' अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र तर जवळजवळ ५०६०% शेतजमीन पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, परंतु मान्सून अनिश्चित व अनियमित स्वरूपाचा आहे.


ग्रामीण भागामध्ये तर सर्व जनता शेतीवर अवलंबून असते आणि बहुतेक भागात शेती ही कोरडवाहू असून ती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते. पाऊस नाही पडला तर त्या भागात कोरडा दुष्काळ पडून शेतकऱ्यांना पीक घेणे अशक्य होते, ग्रामीण लोकांच्या दारिद्र्यात वाढ होते. 


त्यामुळे गरिबी वाढते, जनावरे चाऱ्याअभावी-पाण्याअभावी मृत पावतात, कुपोषणात वाढ होते आणि याच समस्यांना काही वर्षे महाराष्ट्राला तोंड द्यावे लागत होते.परंतु गेल्या दोन-तीन वर्षात महाराष्ट्रामध्ये मान्सून इतक्या मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला की चक्क महापुराची परिस्थिती निर्माण झाली. 


मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सांगली, परभणी, गुजरात, सातारा या ठिकाणी विशेषतः एवढा पाऊस झाला की तेथे महापूर येऊन ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली. मुंबईकरांना तर हा सर्वांत मोठा फटका गेली २ ते ३ वर्ष सहन करावा लागत आहे. 


मुंबईची लोकसंख्या जास्त असल्याने त्या लोकसंख्येच्या प्रमाणात राहण्याची पुरेशी व्यवस्था नाही, सांडपाण्याची तसेच कचऱ्याची विशेषतः प्लॅस्टिकच्या पिशव्यांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावता येत नसल्याने या पिशव्या पावसाच्या पाण्याबरोबर वाहत जाऊन ड्रेनेजमध्ये अडकतात आणि त्यामुळे तेथील गटारे, नाले तुंबले आणि पाणी जायला मार्ग मिळत नसल्याने हे पाणी तसेच एका ठिकाणी साठून राहिले. 


जोरदार पडणाऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून पुराची परिस्थिती निर्माण झाली, मोठ्या प्रमाणावर प्राणहानी, वित्तहानी झाली. मुंबई तसेच इतरही ठिकाणी घरामध्य जनावराच्या गाठ्यामध्ये पाणी शिरून जनावरे मरण पावली. त्यामुळे मुंबईतील 'भैय्या लोकांना बरेच आर्थिक नुकसान सोसाव लागले. 


पुरामुळे झोपड्या पाण्याखाली गेल्या. त्यामुळे तेथे राहणाऱ्या लोकांचा आश्रयाचा मोठा प्रश्न उभा राहिलाया गराब लोकांची -भिंत खचली चूल विझली होते - नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले.अशी अवस्था झाली. 


त्याचबरोबर पुरामुळे वाहतूक ठप्प झाल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला जाऊन भिडल्या, लहान मुलांच्या शाळांनी तर सुट्टी जाहीर केली, लोकल ट्रेन तर जागच्या जागी तशाच उभ्या राहिल्याने सामान्य जनतेला आर्थिक नुकसान सोसावे लागले. 


तसेच त्यांची या सगळ्या प्रकारात खूप ससेहोलपट झाली. मुंबईसारख्या महानगराला तर गेली २ वर्षे हे नुकसान सोसावे लागत आहे.नाशिकमध्येही यावर्षी झालेल्या पावसामुळे बरेच नुकसान झाले. गावेच्या गावे पाण्याखाली गेली, तेथील काळारामगोराराम व आसपासची मंदिरे तसेच घरेदेखील पाण्याखाली गेली, एवढा पाऊस झाला.


कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे तर सातारा, सांगली, कोल्हापुरात पुराची परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे तेथेही खूप नुकसान झाले. कोल्हापूर हे ठिकाण दुग्धव्यवसाय व साखरउद्योगासाठी महत्त्वाचे आहे. 


परंतु पुरामुळे यावेळी बरेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले, साखर उत्पादनावर याचा परिणाम झाल्याचे दिसून येते तसेच दुग्धव्यवसायावरही याचा परिणाम झाला.यांच्या मदतीसाठी सरकार प्रयत्न करीत आहे, पूरग्रस्तांना ज्यांची घरे, (जमिनी) शेती सगळे वाहून गेले आहे.


त्यांना विशेष पॅकेज सोय केली आहे, पूरग्रस्तांना दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत असे, परंतु सरकारची आर्थिक मदत ही प्रत्येकापर्यंत पोहोचतच नाही, बरेच लोक या मदतीपासून वंचित राहतात, आर्थिक मदत तर काय काही ठिकाणी खाण्यासाठी अन्नदेखील मिळत नसल्याचे दूरचित्रवाहिन्यांच्या निदर्शनास आले आहे. 


'पॅकेज'ची भली मोठी रक्कम प्रत्येकापर्यंत तर पोहोचतच नाही तर मध्येच गायब होते. अशी अवस्था सध्या महाराष्ट्रात पूरग्रस्तांची आहे. त्यामुळे सामान्य, गरीब, पूरग्रस्त जनता यांना तरी कोणाचाच आधार नाही. मुख्यमंत्री, नेते मंडळी येऊन फक्त पाहणी करतात आणि आश्वासने देतात. त्याशिवाय ते काही करू शकत नाही, पण जनता मात्र या सगळ्यात होरपळून निघते.


जर खरंच सरकारला महापुरावर नियंत्रण आणायचे असेल तर नद्यांना पूर येतात तेथे धरणे बांधली पाहिजेत किंवा तलाव बांधले पाहिजेत, तसेच 'डॉप्लर रडार'सारख्या यंत्रणा धरणावर बसवायला हव्यात त्यामुळे पावसाच्या पाण्याचे प्रमाण तात्काळ समजून लगेच त्यावर नियंत्रण आणता येईल. 


'डॉप्लर रडार' बरोबरच 'पर्जन्यमापक देखील बसवले पाहिजे, त्यामुळे पावसाच्या पाण्यावर नियंत्रण ठेवता येईल. या पावसाळ्यात १ लाख क्युसेक पाणी धरणातून सोडल्याने सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात पूर आला.


'डॉप्लर रडार' व 'पर्जन्यमापक' सारखी यंत्रणा संपूर्ण देशभरातील विशेषतः महाराष्ट्रातील सर्व धरणांवर बसवल्यास आपला संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशही पूरमुक्त होईल. मुंबईसारख्या महानगरांमध्ये प्लॅस्टिकच्या कचऱ्याची योग्य त-हेने विल्हेवाट लावल्यास व मोठे नाले आणि ड्रिनेज बांधल्यास ही समस्या बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येऊ शकते.


महापुरामुळे शेतीचे जे काही नुकसान झाले ते तर भरून काढण्यासारखे नाही कारण पावसाच्या पाण्यामुळे सुपीक जमिनीच्या मातीचे थरच्या थर वाहून गेले, त्यामुळे जमिनी पाणथळ व नापिक बनल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या या जमिनी होत्या त्यांना आता उदरनिर्वाहाचे साधन नष्ट झाले आहे.


पूर्वी पावसाची वाट महाराष्ट्रातील लोक आतुरतेने पाहायचे, परंतु आता लोक पावसाळा जवळ आला की, 'येरे येरे पावसा'ऐवजी 'जारे जारे पावसा' म्हणण्याची वेळ आली आहे. गेल्या दोन-तीन वर्षे येणाऱ्या महापुरामुळे सामान्य जनतेचे व पर्यायाने सरकारचेही मोठे आर्थिक नुकसान होत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीत अडथळे निर्माण होत आहेत.


पाऊस हा सर्वांसाठीच गरजेचा आहे. परंतु त्याचा अतिरेक झाला तर तो दुरूपयोगी ठरतो आणि सर्वांना त्याचा फटका बसतो. त्यामुळे पाऊस हा निश्चित व नियमित पडू दे अशी आपण वरुणराजाला प्रार्थना करू.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद