एका परिचारिकेचे आत्मकथन निबंध मराठी | AKA PRICHARIKECHE AATMAKTHAN ESSAY IN MARATHI

  एका परिचारिकेचे आत्मकथन निबंध मराठी | AKA PRICHARIKECHE AATMAKTHAN ESSAY IN MARATHI

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  एका परिचारिकेचे आत्मकथन मराठी निबंध बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता, तेव्हा 'शूऽऽ' एवढाच शब्द लिहिलेल्या पोस्टरवर एका स्त्रीचे तोंडावर बोट ठेवलेले चित्र पाहिले असेल ना? ओळखलेत मला? हो बरोबर. तीच मी परिचारिका. 


आज १२ मे म्हणजेच जागतिक परिचारिका दिन. त्या निमित्ताने मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. मी मूळची केरळची. घरची गरिबी. लहानपणीच वडील गेल्याने आईवर सर्व प्रपंचाची जबाबदारी येऊन पडली. तिला हातभार लावण्यासाठी मी नर्सिंग कोर्सला प्रवेश घेतला. 


नोकरी मिळावी, हा हेतू तर होताच; पण लोकांची सेवा करता यावी, हादेखील हेतू होता.परिचारिकाच का व्हावेसे वाटले?' असा प्रश्न विचारल्यावर मी उत्तर देते, फ्लोरेन्स नाइटिंगेल माझी आदर्श आहे. ही जगातील पहिली परिचारिका म्हणून ओळखली जाते. 


फ्लोरेन्स म्हणजे मूर्तिमंत शुश्रूषा व सेवा. एका सेवेचा आदर्श घालून देणारी ही स्त्री सुमारे १८७८ मध्ये इटलीमध्ये जन्माला आली. अतिशय सुखवस्तू घरात जन्माला येऊनही परमेश्वराने आपल्याला भूतदया व मानवतेची सेवा करण्यासाठीच जन्माला घातले आहे, 


या भावनेने प्रेरित झाली आणि जखमी सैनिकांच्या सेवेला तिने स्वत:ला वाहन घेतले. तिची 'लेडी विथ द लॅप' ही उपाधी देऊन प्रशंसा करण्यात आली. तिच्या हातातील कौशल्य व वैज्ञानिक दृष्टिकोनातून रुग्णसेवा केल्यामुळेच परिचर्याशास्त्राला नवीन दिशा प्राप्त झाली. 


तिचे चरित्र लहान वयातच वाचले होते. तेव्हापासूनच मी परिचारिका म्हणजेच नर्स होण्याचे ठरविले. ___मी परिचर्याशास्त्र पदविका उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर मला चांगल्या हॉस्पिटलमध्ये सेवाकार्य करण्याची संधी मिळाली. ज्या दिवशी मी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला, 


तेव्हाच ठरविले की, आता आपण राग, लोभ, अहंकार या भावनांचा त्याग करायचा आणि समाजसेवेविषयी आस्था, रुग्णांविषयी सहानुभूती आणि मृदू भाषा या फार महत्त्वाच्या गोष्टी आत्मसात करायच्या. प्रत्यक्ष काम करताना याचा खूप लाभ झाला. रुग्ण शारीरिक व्याधींनी ग्रस्त असल्याने त्यांचे मानसिक संतुलनही बिघडलेले असते; 



त्यामुळे ते चिडचिड करतात. त्यांचे नातेवाईकही बऱ्याच वेळा यात भर घालतात. अशा वेळी आम्हालाच नियंत्रण ठेवावे लागते. मी म्हणूनच रुग्णाच्या मानसिक स्थितीशी समरस होते. विनय, सहनशीलता, कनवाळूपणा, जिव्हाळा इ. गुण अंगी बाणविल्यामुळे माझी आदर्श परिचारिका म्हणून एक ओळख निर्माण झाली.


मला जाणीव आहे की, परिचारिका हा आधुनिक आरोग्यसेवेचा अविभाज्य व मूलभूत घटक आहे. गावपातळीपासून ते शहरी अत्याधुनिक रुग्णालयामध्ये रुग्णसेवेचा कणा असतो, परिचारिका. ती केवळ औषधे देऊन रुग्ण बरा करत, नसते तर तिचे कौशल्य, सौजन्य व समर्पित भावनेने केलेली सेवाच समर्थ ठरते. 


रुग्णांचे आजारपण हे परिचारिकांच्या प्रेमळपणामुळेच दूर होते. बऱ्याच वेळा लहान मुले रुग्ण म्हणून येतात, तेव्हा ती औषध घेण्यास तयार नसतात, इंजेक्शनला घाबरत असतात आणि सलाइनच्या बाटल्या, नळ्या या सगळ्याच गोष्टींची त्यांना भीती वाटत असते. 


अशा वेळी परिचारिकांची खरी कसोटी असते. मी लहान मुलांत लहान होऊन त्यांच्याशी बोलते, वागते. गोड बोलून, वेळप्रसंगी अभिनय करून, कधी छोटीशी गोष्ट सांगून त्यांचा विश्वास संपादन करते. त्यामुळे माझे काम सोपे होते व तो रुग्णदेखील लवकर बरा होतो.


या काळात आमच्यात एक वेगळेच नाते निर्माण होते. मग तो रुग्ण घरी जाताना खूप हळवा बनतो. आंटी, मावशी, ताई अशी अनेक नाती जुळतात. हा धागा तोडताना खूप जड जाते. मित्रांनो, अशा प्रकारे आमचे काम तसे जिकिरीचे व खडतर आहे. त्यांच्या सेवेचे मोल पैशात होऊ शकत नाही. 


बऱ्याच वेळा समाजात परिचारिकांना मान मिळत नाही; दुय्यम दर्जाचे समजले जाते, हेच आमचे दु:ख आहे. तेव्हा समाजाने आमच्या कार्याची ओळख करून घ्यावी, जाणीव ठेवावी, अशी अपेक्षा आहे. आपत्कालीन काळात परिचारिकांचा सहभाग फार महत्त्वाचा असतो. 


म्हणूनच परिचर्या परिषद, भारत सरकार यांच्या सौजन्याने परिचारिका दिनाच्या संदर्भात 'समुदायाच्या आरोग्यासाठी परिचारिकांचा सहभाग' हे घोषवाक्य घोषित केले आहे. साथीच्या रोगांमध्ये धोका पत्करून आम्ही रुग्णांची सेवा करतो. 



अपेक्षा एवढीच, की लोकांनी आम्हाला समजून घ्यावे. चला, निघते मी. रुग्णांना औषधे देण्याची वेळ झाली. लवकर बरे झाले पाहिजेत ना ते? त्यांच्यासाठी प्रार्थना करू या.सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः।मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद