अमोल जीवनमूल्ये मराठी निबंध | AMOL JIVANMOOLYA ESSAY MARATHI

 अमोल जीवनमूल्ये मराठी निबंध | AMOL JIVANMOOLYA ESSAY MARATHI

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण अमोल जीवनमूल्ये मराठी निबंध बघणार आहोत. मूल्य याचा अर्थ आहे 'श्रेय' किंवा 'हित'. मूल्य हे काय असावे, हे मूल्याच्या कल्पनेशी निगडित आहे. व्यक्तिजीवन, समाजजीवन, आदर्शवादी कल्पनांकडे हा शब्द संकेत करतो. 


मूल्य या संज्ञेची व्याख्या करायची झाल्यास ज्याची आकांक्षा धरावी वा पाठपुरावा करावा, अशी गोष्ट म्हणजे मूल्य' किंवा 'मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वामधील ज्या ज्या गोष्टींना समाजामध्ये मूल्य आहे, ती गोष्ट म्हणजे 'मूल्य' समायोजनाला उपयुक्त ठरणारी मार्गदर्शक जीवनतत्त्वे म्हणजे मूल्य होय. 


थोडक्यात काय, तर मानवी जीवनातील उत्तम, सुंदर, आदर्श यांची निर्मिती. घर, शाळा यांतून संस्कारक्षम वयात जे संस्कार मुलांच्या मनावर रुजवता येतात, ते संस्कार म्हणजे मूल्य.


'अहिंसा सत्यमस्तेय शौचमिन्द्रियनिग्रहः।

दानं दमो दया क्षान्ति: सर्वेषां धर्मसाधनम्॥ 


याज्ञवल्क्य मुनींनी अहिंसा, सत्य, अस्तेय, अंतर्बाह्य शुचिता, इंद्रियनिग्रह, दान, निषिद्ध विषयांचे चिंतन न करणे, दया आणि शांती ही सर्व धर्माची साधने आहेत, असे सांगितले आहे. ही आहेत अमोल जीवनमूल्ये. गांधीजींनी सत्य, अहिंसा ह्या मूल्यांचा अंगीकार केला होता. 


त्याचमुळे ते अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवायचे असे सांगत, हिंसा म्हणजे क्रूरपणा, पशुवत् व्यवहार ! माणसालासदसद्विवेकबुद्धी असते. त्याचा वापर करून मानवाने माणसासारखा व्यवहार करावा, असे त्यांनी सांगितले. फार पूर्वीच गौतमबुद्धांनी अहिंसेचे महत्त्व विशद केले होते. 


अहिंसा म्हणजे सभ्यता, शांती, सत्य. हे अगदी तेजस्वी मूल्य. सदा सत्य बोला, असाच संस्कार लहानपणापासून केला जातो. अस्तेय म्हणजे चोरी. चोरी करणे म्हणजे पाप. असे पान न करणे, हे मूल्य. चोरी करणे म्हणजे मोहाला बळी पडणे; हाव धरणे. 


जीवनात स्वत: स्वत:ला ओळखणे, स्वत:शीच संवाद करणे फार महत्त्वाचे असते. असे करणे म्हणजे अंतर्मुख होणे. मनुष्य अंतर्मुख झाला, की त्याचा साक्षीभाव जागृत होतो. चांगले-वाईट याचा विचार तो करू शकतो. माणसाची इंद्रिये बहिर्मुख असतात. त्यांवर नियंत्रण ठेवावे लागते. म्हणून माणूस अंतर्बाह्य पवित्र असला पाहिजे.


इंद्रियनिग्रह म्हणजे शरीरावरील नियंत्रण; मनावरील ताबा. दान करण्याची वृत्ती हवी. या संकल्पनेत आपल्याला जे मिळते, त्यात समाजाचा वाटा असतो, घासातला घास देता आला पाहिजे. असे करणे म्हणजे समाजऋण फेडणे, ज्या गोष्टी निषिद्ध आहेत, त्या मनात न आणणे, वाईट विचार मनातून काढून टाकून चांगल्या गोष्टींचाच विचार करणे इ. गोष्टी येतात. उत्तम माणूस घडण्यासाठी हे आवश्यक आहे. 


“सदाचार हा थोर सांडू नको रे.” दया आणि शांती ही जीवनमूल्येदेखील तेवढीच महत्त्वाची आहेत. पशू, प्राणी, अपंग, कमजोर अशा व्यक्तींबद्दल दयाभाव असला पाहिजे. प्राणिमात्रांवर दया करा', हे संस्कारक्षम वयात मुलांवर त्याचमुळे बिंबविले जाते. शांती म्हणजे आपले वागणे असे हवे की, ज्यामुळे मन:शांती लाभेल. 


मन:शांती आयुष्यात फार मोलाची असते. ती असेल, तर छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी त्रागा केला जात नाही, कलह टाळला जातो आणि सामंजस्याचे वातावरण राखले जाते. त्याचा समाजाच्या शांतीसाठीदेखील उपयोग होतो. उत्तम चारित्र्यसंपन्न जीवनासाठी ही आहेत अमोल जीवनमूल्ये! ती स्वीकारा आणि जीवनात सुखी व्हा.


'सर्वत्र सुखिन: सन्तु, सर्वे सन्तु निरामयः। 

सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःखमाप्नुयात्।

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद