अंधश्रद्धा मराठी निबंध | Andhashraddha Marathi Nibandh

 अंधश्रद्धा मराठी निबंध | Andhashraddha Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण अंधश्रद्धा  मराठी निबंध बघणार आहोत. श्रध्दा हा गुण आहे. पण श्रध्देचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा तो अवगुण बनतो आणि जेव्हा श्रध्दा आंधळी होते तेव्हा तो दुर्गुण बनतो. सत्यासत्यता पडताळून न पाहता, शक्याशक्यता, संभाव्य - असंभाव्य पारखून न घेता, बुध्दी, तर्क आणि विज्ञान या निकषावर घासून न घेता, जो एखाद्या गोष्टीवर श्रध्दा ठेवतो त्याला अंधश्रध्द म्हणतात. 


अंधश्रध्देचा धूर जेव्हा मनात कोंडून राहतो तेव्हा विचार आणि विवेक यांचे डोळे आपोआप मिटतात. मुलाला देवी आल्या म्हणजे हा कुणा देवतेचा कोप आहे असं समजून माणूस देवाच्या कोपशमनार्थ- भगताकडे धावतो. वैद्याकडे जाण्याचा विचार त्याच्या मनात येत नाही.


खिश्चनांची क्रिस्तावर व मुसलमानांची अल्लावर श्रध्दा असते. ते असे मानतात की परधर्मियांना आपल्या धर्मात खेचायचं, अशी खिस्ताची आज्ञा आहे. अल्लाचा आदेश आहे. म्हणून धर्मान्तर घडवून आणताना कोणत्या थराला जायचं याबाबत खिश्चनांचा आणि मुसलमानांचा विवेक सुटतो. 


सर्व धर्मात माणसं अंधश्रध्देला बळी पडतात. बुध्दिमंतांची बुध्दीसुद्धा अनेकवेळा असल्या अंधश्रध्देमुळे लुळी व पांगळी बनते. 'माझ्या बुद्धीला आणि तर्काला जे पटणार नाही, ते प्रत्यक्ष देव जरी मला सांगायला आला तरी ते मी मानणार नाही' असं परखडपणे सांगणारा आगरकर एखादाच.


ही अंधश्रध्दा प्राणवायूप्रमाणे सर्व क्षेत्रात भरून राहिली आहे. ती धार्मिक क्षेत्रात आहे, राजकीय क्षेत्रात आहे, सामाजिक क्षेत्रात आहे. म्हाताऱ्यांना अडगळीत टाकायचं, त्यांच्या सेवेत आणि औषधोपचारात हेळसांड करायची आणि ते मेले की यथासांग क्रियाकर्मान्तर करायचं. 


ही झाली धार्मिक अंधश्रध्दा. मुहूर्त पाहून निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडायचा. फायलीखाली जन्मपत्रिका ठेवायची आणि ज्योतिषांचे पाय धरायचे. ही झाली राजकीय अंधश्रध्दा; आणि माझीच जात श्रेष्ठ आहे असं मानून इतर जातीनां नीच लेखायचं ही झाली सामाजिक अंधश्रध्दा. अंधश्रध्दा सर्वव्यापी आणि जीवनव्यापी असते. 


मांजर आडवे गेले की काम होत नाही, इथपासून ते पिंडाला कावळा शिवला नाही तर मृताला शांती मिळत नाही इथपर्यंत. माणसाचं जीवन अंधश्रध्दाग्रस्त असतं. अंधश्रध्दा माणसाला एक प्रकारचं समाधान मिळवून देते. पण विचारान्ती दिसून येईल की, 


अंधश्रध्दा, अंधश्रध्द माणसांच्या आणि इतर लोकांच्या जीवनात दुःख, तणाव निर्माण करते. अंधश्रध्देमुळे अनेक निष्पाप अर्भकांचे बळी गेलेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत आणि अनेकांच्या जीवनाची माती झालीय. तेव्हा असल्या अंधश्रध्देला मूठमाती दिलीच पाहिजे.


अंधश्रध्दा समाजाचा आणि पर्यायाने राष्ट्राचा घात करते. अंधश्रध्दा माणसाच्या मनात अनेक दुर्गुण निर्माण करते. माणूस क्रूर बनतो. मृत पतीच्या चितेवर जिवंत पत्नीला जाळताना किंवा तिचे वपन करताना, त्याचं हृदय द्रवत नाही. हुंड्यासाठी अगतिक कोवळ्या पोरींना छळताना, त्यांच्या पाषाणी हृदयाला पाझर फुटत नाही. तो दूराग्रही बनतो.


आपल्या आग्रहांच्या रणगाड्याखाली, किती जीव चिरडले जातात याची तमा तो बाळगीत नाही. विशेषतः तो दुबळा बनतो, संकटाशी सामना करण्याऐवजी देवाची करुणा भाकतो. आपल्या भरभराटीसाठी एखाद्या ग्रहाच्या खड्याची आंगठी घालतो. नाहीतर एखाद्या बाबाला शरण जातो. 


पुराणातल्या भाकडकथा आणि साधुसंतांच्या जीवनातले चमत्कार त्याच्या मनाला खतपाणी घालीत असतात. वारा घालून निखारे फुलवावे त्याप्रमाणे त्यांची अंधश्रध्दा फुलवीत असतात. याला उपाय एकच. त्याला अंधश्रध्देच्या जाळ्यातून बाहेर काढणे. 


त्याला सांगणे की तुझ्या जीवनाचा स्वामी तू आहेस. तुझ्या भवितव्याचा कारागीर तू आहेस. जे तुझ्या बुध्दीला आणि तर्काला पटणार नाही, ज्याला शास्त्रीय सिध्दांताचा आधार नाही. जे सर्वथैव असंभाव्य आहे, त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. कुणीही भिंत चालवू शकणार नाही. 


कुणीही सदेह स्वर्गाला जाऊ शकणार नाही आणि मातीबरोबर तुडवून ठार मारलेलं मूल जिवंत होणार नाही. अंगारा - धुपारा आपले रोग बरे करू शकणार नाही. आपली संकटं नाहीशी करू शकणार नाही. एखादा बुवा किंवा बाबा तुझं कल्याण करू शकणार नाही.


सारांश, या अंधश्रध्देच्या अजगर विळख्यातून माणूस जेव्हा सुटेल, तेव्हाच खऱ्या व्यक्तीचा, समाजाचा आणि राष्ट्राचा अभ्युदय होईल, अन्यथा हासच हास ! विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे १) विश्वाचा देव आणि मानवाचा देव २) दोन शब्द - दोन संस्कृती (श्रुतिस्मृतिपुराणोक्त - up to date अद्ययावत्) ३) विज्ञाननिष्ठ निबंध या निबंधांचे पारायण केले पाहिजे. 


हा स्वातंत्र्यवीर कसा समाजवीर आणि विज्ञानवीर होता याचा प्रत्यय येईल. अशा महा-मानवाची, केवळ गलिच्छ राजकारणामुळे उपेक्षा व्हावी, ही वस्तुस्थिती मनात काट्यासारखी सलत राहते. स्वा. सावरकरांनी आपली कुंडली अगोदरच मांडून ठेवली होती. 


'प्रतिकूल तेच घडेल आणि ते जिवंत होते तोपर्यंत आणि मेल्यानंतरही प्रतिकूल तेच घडले. त्याचे काही विचार खाली देत आहे, विद्यार्थ्यांनी ते हृदयावर कोरून ठेवले पाहिजेत. आजच्या वैज्ञानिक युगात आमच्या हिंदुराष्ट्रातील टाकाऊ असणाऱ्या खुळचट रूढी, व्रते, मते ही लोकांनी सोडावी, हे वारंवार सांगणे आमचे कर्तव्य आहे. 


एका जुनाट मागासलेल्या संस्कृतीलाच असे घट्ट बांधून घेऊन कालाच्या मार्गात आडवे पडाल तर विज्ञानाच्या टाचेखाली तुम्ही चिरडून जाल. गाय, एक उपयुक्त पशू. माता नव्हे आणि देवता तर नव्हेच नव्हे. पशूला मंदिरात देव म्हणून स्थापता तरी पशूचा देव न होता मंदिराचा मात्र गोठा होतो.


प्लेगच्या संकटातून मनुष्य जातीचा बचाव करण्यासाठी हिंदु-मुसलमान देवलसी संस्कृतीने अनुष्ठाने, कोंबडा कापणे, बोकड कापणे, ताईत-गंडे असे नाना उपाय करून पाहिले. पण प्लेगचा केसही वाकडा झाला नाही. तिकडे युरोपच्या विज्ञानलसी संस्कृतीने मात्र अशी एक लस शोधून काढली की जिच्यापुढे प्लेगसारखा भयंकर रोगही दाती-तृण धरू लागला. 


लस देवाला नमस्कारून घ्या किंवा धिक्कारून घ्या. लसीच्या गुणधर्मात लेशमात्र फरक नाही. सृष्टिनियम तो. प्रत्यक्ष प्रयोगार्ह, प्रत्यक्षसिध्द, प्रत्यक्षनिष्ठ. पोथीनिष्ठ नव्हे. टीप : अधोरेखित शब्द किती उत्तम आहेत पहा. मेंदूत टिपून ठेवा. 'नमस्कारून' हा शब्द पहा त्याला नामधानु असे म्हणतात. प्रसिध्दून' 'बर्फाळली उंचटोके


- कुसुमाग्रज काको न गरूडायते ।

 श्वानवत् गुरगुरायते ।। 



अशी संस्कृत धर्तीवर नामापासून बनवलेली क्रियापदे च्चि रूपे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद